स्वामी

ध्येयाला जो कवटाळील,
प्रेमा निर्मळ मिठी मारील
दु:खी भारत जो हसवील
निज बलिदानें | त्या अनंत माझी नमनें||

अमळनेर गांवांत आज विश्वधर्ममंडळाच्यावतीने थोर, पैगंबर महंमद यांची पुण्यतिथि साजरी होणार होती. विश्वधर्ममंडळ तेथे नवीनच स्थापन झालें होते. नवीन जीवनाचा तो एक लहानसा अंकुर होता. हजारों वर्षे जो विशाल भारत बनत आहे, त्याच्याच सिद्धीसाठी तें लहानसें मंडळ होते. जें महाभारताचें महान वस्त्र परमेश्वर अनंत काळापासून विणीत आहे, त्या वस्त्रांतील एक लहानसा भाग म्हणजे तें मंडळ होतें.

हिंदुस्थानभर हिंदुमुसलमानांचे दंगे सुरू असताना असे मंडळ स्थापण्याचा बावळटपणा कोणीं केला? ही स्वाभिमानशून्यता कोणाची? या दंग्याच्या आगीत तेल ओतल्याचें सोडून हे नसते उपद्व्याप कोण करीत होते?

काय सर्व हिंदुस्थानभर दंगे आहेत? नाहींत. ती एक भ्रांत कल्पना आहे. हिंदुस्थानांतील दहावीस शहरांत मारामारी झाली असेल. परंतु ही दहावीस शहरे म्हणजे कांही हिंदुस्थान नव्हे. लाखों खेड्यापाड्यांतून हिंदुमुसलमान गुण्योगोविंदानें नांदत आहेत. त्यांचे संबंध प्रेमाचे व जिव्हाळ्याचे आहेत. शेंकडो प्रामाणिक मुसलमान नोकर हिंदूंची मुलें खेळवीत आहेत. एकमेकांच्या ओटीवर हिंदुमुसलमान पानसुपारी खात आहेत. हिंदुमुसलमानांत सलोखा आहे.

परंतु वर्तमानपत्राना हे खपत नसते. एक्याचे व प्रेमाचे वारे पसरविण्याऐवजी वर्तमानपत्रे द्वेषमत्सराचे विषारी वारेच सोडत असतात. हिंदुमुसलमानांच्या दग्यांची, तिखटमीठ लावून विषारी केलेली वार्ता वर्तमानपत्रे जगभर नेतात, आणि कोट्यवधि हिंदुमुसलमानांची मने अशांत केली जातात! आग नसेल तेथे आग उत्पन्न होते. प्लेग नसेल तेथे प्लेगाचे जंतु जातात. हिंदुस्थानची दैना झाली आहे तेवढी पुरे, असें या वर्तमानपत्रांना वाटत नाही. भडक काहीतरी प्रसिद्ध करावें, पैसे मिळावे, अंक खपावे हें त्यांचे ध्येय! मग भारत मरो कां तरो. समाजाला आग लागो कीं समाजाची राखरांगोळी होवो.

मुंबईला एका इमारतीस आग लागते! परंतु आपण त्याच गोष्टीस महत्त्व देतो. मुंबईतील लाखो इमारती देवानें सुरक्षित ठेविल्या होत्या हे आपण विसरतो. त्याप्रमाणे एके ठिकाणी दंगा झाला तर त्यालाच आपण महत्त्व देतो. इतर लाखो ठिकाणी प्रेमळ शांतता आहे, ही गोष्ट आपण डोळ्याआड करून उगीच आदळआपट करु लागतो. प्रत्येक धर्मांतील संकुचित वृत्तीचे लोक अशा प्रकारे आपल्या श्वासोच्छवासाबरोबर अश्रद्धा घेऊन जात असतात. जगाची होळी पेटत ठेवतात.

परंतु ईश्वरी सूत्र हळूहळू हलविली जात असतात. हा विश्वाचा विणकारी कसे कोठून धोटे फेंकील ते कोणाला कळणार ? अमळनेरसारखे लहानसे शहर आणि तेथे हिंदुमुसलमानांनी अन्योन्य संस्कृति समजून स्थान! संसाराला निर्मळ करणारी संस्था तेथे स्थापन न व्हावी तर कोठे व्हावी?

ती संस्था म्हणजे एक सुचिन्ह होते तो लहान बिंदु-जीवनदायी बिंदु होता. त्या बिंदूची उपेक्षा नका करु त्या बिंदूचाच उद्या सिंधु होईल आपण नदीचा उगम पवित्र मानतो. गोदावरीच्या मोठ्या प्रवाहापेक्षा त्र्यंबकेश्वराजवळील दगडाधोंड्यातील गुंतवळासारखा तिचा लहान प्रवाह ती करांगुळीएवढी धार - तिलाच आपण पवित्र मानतो. मंगलकर्मांचे सारे आरंभ पवित्र आहेत. मग ते किती कां लहान असेनात.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel