“लोक खादी वापरीत नाहींत, कोर्टकेचरी सोडीत नाहीत, श्रेष्ठनिष्ठपणा टाकीत नाहीत, घाण दूर करीत नाहीत, मग महात्माजींना कसें आणू? थोर पुरुषाला आणावयाचें तर आपल्या घरांत घाण असता कामा नये, आपल्या गांवात घाण असता कामा नये, आपल्या मनांत घाण असता कामा नये. अंतर्बाह्य स्वच्छ व्हावें व मग महात्म्याचें दर्शन घ्यावें,” स्वामी म्हणाले.

“पण सूर्य आल्याशिवाय अंधार दूर होत नाही, जागृति येत नाही,” तुकाराम मास्तर म्हणाले.
“हिदुस्थानांत सूर्य आला आहे, तो उभा आहे. अंधार दूर होत आहे. जागृति येत आहे,” स्वामी म्हणाले,
“प्रत्यक्ष दर्शनानें निराळाच परिणाम होतो,” मगन म्हणाला.

“ते खरें आहे. परंतु महात्माजी कोठे कोठे जातील? आपण त्यांची विचाररुप भेटच घेतली पाहिजे. फार तळमळ असेल तर ते जेथे असतील तेथें गेले पाहिजे, तुम्हाला फार तळमळ लागली तर महात्माजीहि येथे येतील, कोणी सांगावे?” स्वामी म्हणाले.

जेवणखाण झालें, गांवांतील कांही मंडळी जमली होती. त्याच्याशी निरनिराळ्या गोष्टींवर चर्चा झाली. तेथे जवळच खादी पडली होती.

“ही खादी महाग असते. कशी काय घ्यावी?” एकानें प्रश्न विचारला.

“स्वतंत्र होऊ पाहाणा-या लोकांनी स्वस्त व महाग हे प्रश्न करून चालणार नाही. इतर हजारो फालतू गरजा कमी करूं व खादीच घेऊ असे निर्धार झाले पाहिजेत. स्वातंत्र्य स्वस्त नाही. त्याच्यासाठी अपरंपार त्याग करावयास जनतेनें उठलेंच पाहिजे. तुम्ही आपापल्या गांवांतच खादी तयार कां करीत नाही? तुमच्या गांवचा शेतसारा किती आहे?” स्वामीनीं प्रश्न विचारला.

“सात हजाराच्या आसपास आहे,” एक पाटील म्हणाले.

“इंग्रज सरकार तुमच्या गांवांतून शेतसा-याचे दरसाल सात हजार रुपये नेते. परंतु इतर त-हांनी आपण किती संपत्ति गांवांतील दवडतों, याचा जरा विचार करा. तुमच्या गांवची वस्ती पंचवीसशें आहे. प्रत्येक माणसाला कमीतकमी पाच रुपयांचे कापड वर्षाला धऱलें तर साडेबारा हजार रुपये होतात. तुमचा गांव कपड्यांसाठी केवळ बारा पंधरा हजार रुपये बाहेर पाठवतो. हे आपल्या गावांत वाचवता आले तर? जाडें भरडें कसेंहि असो, गावांतच कापड तयार करावयाचे असा संकल्प सर्वांनी करावा. गांवचें स्वरुप बदलून जाईल. तुमच्या बायका शेतांतून कामाला जात नाहीत. काढा म्हणावें सूत, फिरू दे रहाट! इच्छाशक्ति पाहिजे. गांवांतील पुढा-यांनी याचा विचार केला पाहिजे. खादीनें स्वराज्य, याचा अर्थ हा आहे की गांवचे पंधरा हजार रुपये गांवांतच ठेवावयाचे,” स्वामी म्हणाले.

“हे सारें कठीण आहे,” एकजण म्हणाला.
“मग गुलामगिरीत राहाणें सर्वांत सोपें आहे. तेंच आपण करूं या आपणांस सारेंच कठीण वाटतें. रस्त्यांतील घाण उचलणे कठीण, हरिजनांस जवळ घेणें कठीण, हिंदुमुसलमानांचे ऐक्य कठीण, स्वदेशी व्रत कठीण. ज्या लोकांना सारें कठीण वाटतें, त्यांना मरणें एवढेंच सोपें आहे पुरुषार्थ कठीणच असतो. आपण उठले पाहिजे. गांवांतील गाईम्हशीचें शेण उचलावयास माणसें धावतात, परंतु माणसांचे शेण का फक्त डुकरांनी येऊन खावें? मांजरेसुद्धां आपल्या विष्ठेवर माती टाकतात. आणि आम्ही माणसें! सनातन सस्कृतीचीं ! घाण, रोग, आळस, दंभ यांचा प्रचार व प्रसार म्हणजे सनातन संस्कृति नाही. सनातन संस्कृति विषाचें अमृत करणारी आहे, विष्ठेचें सोनें करणारी आहे. शेतांत शौचास जाऊन त्यावर माती टाकावी असें धर्मांत सांगितले आहे. परंतु शेंडींत व गंधांत धर्म राहिला. बाकी सारें कठीण होऊन बसलें. गांवची घाण दूर करण्याचा तुम्ही कधी विचार केला का? रोज सकाळी भाग्यलक्ष्मी तुमच्या गांवांत शिरू पाहाते, परंतु घाण पाहातांच नाकाला पदर लावून ती दूर जाते. भाग्यलक्ष्मी तुमच्या गांवच्या सीमेजवळ घुटमळत आहे. घाण दूर करा व तिला घेऊन जा. ‘हात फिरे तेथें लक्ष्मी फिरे.’ जेथें हात हलतील, सदैव उद्योगांत राहातील, घाण दूर करतील तेथें लक्ष्मी नांदल्याशिवाय राहाणार नाही.”

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel