“नामदेव! येथेंच वाचीत बैस. तुझा वेळ नको गमावू. आजचें दैनिक बंद! कितीतरी दिवसांत दैनिकाला खंड पडला,” स्वामी खेदानें म्हणाले.

“रघुनाथनें दैनिक लिहिलें आहे. पहाटे उठून त्यानें लिहिलें,” नामदेव म्हणाला.
“खरेंच? जा घेऊन ये मला पाहू दे,” स्वामी आनंदाने म्हणाले.

नामदेव वाचनालयांतून अंक घेऊन आला. स्वामीनीं तो पाहिला. सारा अंक त्यांनी वाचून काढिला. त्यांना कृतार्त वाटलें.
“सुरेख लिहिलें आहे. जणु मींच लिहिल्यासारखें वाटत आहे,” स्वामी म्हणाले.

डॉक्टर आले. ताप वाढला होता. डॉक्टरांनी तपासलें. डोक्यावर बर्फाची पिशवी धरण्यास त्यांनी सांगितलें. उठून देऊं नका असेंहि त्यांनी बजाविलें. डॉक्टर गेले. औषधोपचार सुरू झाले. पाळीपाळीनें मुलें तेथें बसत होती. दिवस गेला. दिवे लागले. छात्रालयांतील जेवणें झाली. मुलें आपापल्या खोल्यांतून अभ्यास करीत होती. रात्री स्वामींजवळ कोणी कोणीं बसावयाचे त्यांच्या पाळ्या ठरविण्यांत आल्या.

गोपाळरावांनी स्वामींना थोडा मोसंब्यांचा रस दिला. थोडा वेळ तेथें ते बसले व मग निघून गेले. मुलांच्या खोल्यांतून ते हिंडले. स्वामीच्यांजवळ नामदेव व रघुनाथ बसले होते ते त्यांचे पाय चेपीत होते. हिंदुस्थानभर ते पाय भटकले होते. त्या पायांना विश्रांति माहीत नव्हती. ते पाय चुरताना त्या दोन मुलांची कोमल मनें भरून आली होती. ते पाय हृदयाशी धऱावे, अश्रूंनी न्हाणावे असें त्यांना वाटत होतें.

हे कांय? एकदम स्वामीजी रडू लागले.
“काय होते?” मुले विचारू लागली.
काय बोलणार? तो भऱलेला सागर काय उत्तर देणार?

“ अरे नामदेव! माझी सेवा करता, परंतु गरिबांची सेवा करावयास कोण जाईल? त्या दिवशींची ती धर्मांची स्थिती माझ्या डोळ्यासमोर येत आहे. कोण आहे त्यांची काळजी घ्यायला? ना दवा, ना हवा. ना मोसंबे, ना डाळिंब, ना अंथरूण ना पांघरुण. ना डोकें चेपायला कुणी, ना पाय दाबायला कुणी. तुम्ही माझ्यासाठी गाद्या पसरल्यात, डॉक्टर आणलेत, धांवाधाव केलीत. त्यांच्यासाठी कोँण? कोण त्यांचे डोळे पुशील, कोण त्यांची चौकशी करील? कोण गोड बोलेल, कोण गोड हंसेल? नामदेव! मी रडू नको तर कार करु? कोट्यवधि लोकांची पशूहून हीन स्थिती आपण केली आहे, आणि पुन्हा संस्कृतीच्या गप्पा मारतात! बेशरम लोक! तोंडाने ‘सर्व सुखिन: सन्तु | सर्वे सन्तु निरामया || असे पुटपुटतात व हतांनी दगड मारतात, पायांनी लाथा मारतात! दांभिक बगळे बेटे! लाखों मुलांची सुकलेली तोंडे, त्यांच्या हातापायांच्या काड्या-त्यांच्या भुकेसाठी किंकाळ्या मला ऐकू येत आहेत आणि मी ही मोसंबी खाऊ? कोल्हाकुत्रा बरा अशी हरिजनांची स्थिती आहे, अशी मजुरांची दशा आहे. मला हें नाही सहन होत!”

स्वामी जरा शांत झाले. त्यांनी डोळे पुसले. त्यांना लाज वाटली. ते गंभीर झाले. अंथरुणावर शांत पडून राहिलें. थोड्या वेळानें पुन्हां म्हणाले, “नामदेव, रघुनाथ, तुम्ही पुढें देशाच्या कामाला वाहून घ्या. पेटवा खानदेश, उठवा खानदेश, मी तुमच्या आशेवर जगत आहे. तुम्ही मला येथे धरुन ठेविलें आहे. महाराष्ट्रात मला कुठेंहि आशा दिसत नव्हती. निराशेनें मी झगडत होतो, भटकत होतों, थोडी फार जीवंत जागा येथे मिळाली. मऊ जागा मिळाली. येथें मला नवजीवन मिळालें. तुमच्यासारखी सोन्यासारखी भावगंभीर मुले येथे पाहून मी मनांत मनोरथांचे मनोरे बांधू लागलों. तुम्ही माझे पाय, तुम्ही माझे हात, तुम्ही माझे हृदय, तुम्ही माझे प्राण, तुम्ही माझी आशा, तुम्ही माझें सारें काहीं. मारुतीच्या हृदयांत प्रभु रामचंद्र होते,  म्हणून मारुति जगत होता. माझ्या हृदयांत तुम्हांला कोण दिसेल? माझ्या हृदयांत मध्यभागी तुम्हाला भारतमाता दिसेल. तिच्याभोवती नामदेव, रघुनाथ, यशवंत, मुकुंदा, किसन, जनार्दन, राम, राजा,सुभान, रामदास सारे बसलेले आहेत. आपली जीवनफुलें भारतमातेंला ते वाहात आहेत. मला हे दिसत आहे. तुम्ही जर मला दगा द्याल, तर माझे हृदय शतभंग होईल. मुळे तोंडलेल्या तरूप्रमाणें मी उन्मळून पडेन.” असें म्हणून स्वामींनी नामदेव व रघुनाथ यांचे हात हातांत घेतले. त्यांनी ते दोन्ही मुलांचे हात आपल्या हृदयावर ठेवले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel