अमर नेताजी

केवढें भव्यदिव्य जीवन. लहानपणापासूनच ते बाणेदार. विद्यार्थी असतांना भारताचा अपमान करणा-या गो-या प्राध्यापकाच्या त्यांनीं तोंडांत मारली. ते विवेकानंदांचे भक्त. हिमालयांतहि निघून गेले होते. परंतु तेथें एका साधूनें त्यांना सांगितलें, “ भारताची सेवा कर, गरिबांची सेवा कर, तेंच प्रभूचें दर्शन.” ते हिमालयांतून भारतमातेच्या मुक्तीसाठीं आले. विलायतेंत गेले. परंतु परत आले तों असहकाराचा यज्ञ पेटलेला. महात्माजी राष्ट्राला त्याग-दीक्षा देत होते. देशबंधु चित्तरंजन दास एका क्षणांत फकीर झाले. तसेच ते मोतीलाल. ते दिवस तेजाचे, पुण्याचे होते. सारें राष्ट्र उठलें, पेटलें. सुभाषबाबू देशबंधूंना मिळाले. आणि तेव्हापासून जीवनयज्ञ सुरु झाला. स्वयंसेवक संघटना बेकायदा झाल्या. हा तरुण तुरुंगांत गेला. हजारो गेले. पुढे सुटका. देशबंधु १९२५ मध्यें अकस्मात् मरण पावले. राष्ट्र हादरलें. सुभाषबाबू तरुणांची संघटना करुं लागले. ते महाराष्ट्रांत आले होते. जवाहरलाल, नेताजी व जयप्रकाश म्हणजे भारताचे तीन पृथ्वीमोलाचे हिरे.

१९२८ मध्यें कलकत्ता काँग्रेस झाली. सुभाषबाबू स्वयंसेवकांचे मुख्य होते. १९३० साल उजाडलें. सत्याग्रह संग्राम सुरु झाला. सुभाषबाबू कितीदां तुरुंगांत गेले. त्यांची प्रकृती बिघडली. ते युरोपांत गेले. त्याच वेळीं विठ्ठलभाई पटेलहि युरोपांत आजारी होते. सुभाषचंद्रांनी त्यांची सेवा केली. १९३० मध्यें हरिपुरा काँग्रेसचे ते अध्यक्ष होते. परंतु त्यांचे व काँग्रेसचे मतभेद झाले. अध्यक्षहि चुरशीच्या निवउणुकीने ते झाले. गांधीजी म्हणाले, “ माझा हा पराजय आहे.”

कोणते मतभेद होते ? जगांत महायुध्द पेटणार दिसत होते. त्याबाबतींत सुभाषबाबूंची काही निश्चित योजना होती. त्यांचें धोरण काँग्रेस नेत्यांना पटलें नाही. पुढें त्यांना राजिनामा द्यावा लागला. पंडितजींना अति दु:ख झालें. “ पृथ्वीने दुभंग होऊन मला पोटांत घ्यावे  ” म्हणाले. सुभाषबाबूंनीं पुरोगामी पक्ष काढला. देशभर संघटना केली. आणि १९३९ मध्यें महायुध्द आले. सरकार सुभाषबाबूंवर सक्त पहारा करीत होते. ते आजारी आहेत. बातमी आली. आम्ही ४१ सालीं वैयक्तिक सत्याग्रहांत तुरुंगांत होतों. नेताजी निसटल्याची बातमी आली. पठाणी वेषात संकटांतून ते शेवटीं अफगाणिस्थानातून इटलीत व जर्मनींत गेले. इकडे देशांत चलेजाव लढा पेटला. नेताजींनीं जर्मनीच्या ताब्यांतील हिंदी सैनिकांना आझाद सैनिक बनविलें. हिंदी लोकांची प्रतिष्ठा राखली. आणि पाणबुडींतून अटलांटिक व हिंदी महासागर ओलांडून धैयमूर्ति आली. ब्रम्हदेश जिंकित जपान आलेला. हजारों हिंदी सैनिक युध्दकैदी झालेले. नेताजींनीं आझाद सेनेची आधींच सुरु झालेली चळवळ व्यवस्थित केली. अंदमान-निकोबार ‘ शहिद ’ बेटें झाली. एकेक चमत्कार. ‘ अर्जी-ए-हुकुमते-हिंद’ स्थापन झाले नाणें पाडलें. खाती पाडलीं. अक्षराष्ट्रांनी, स्वतंत्र हिंदी व्यापा-यांनीं कोटी कोटी खजिने दिले. गळयांतील हार लाखों रुपयांस जात. स्त्रियांच्या पलटणी उभ्या राहिल्या.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel