भीम: प्रमोद: आमोद: सुरानन्द: मदोत्कट: ।
हेरम्ब: शम्बर: शम्भु: लम्बकर्ण: महाबल: ॥८॥
१८) भीम---दृष्टांच्या संहारासाठी भयदायक होणारा.
१९) प्रमोद---इच्छित वस्तू प्राप्त झाल्यानंतर होणारा आनंद म्हणजे प्रमोद. तत्स्वरूप असणारा. भक्तांना प्रमोद देणारा.
२०) आमोद---मनाचे संकल्प विकल्प जिथे संपतात त्या निर्विकल्प अवस्थेला आमोद म्हणतात. अशी अवस्था भक्तास प्राप्त करून देणारा.
२१) सुरानन्द---देवांना आनंद देणारा.
२२) मदोत्कट ---गण्डस्थळापासून पाझरणार्‍या मदामुळे उत्कट झालेला. किंवा ब्रह्मरसमृत पाझरत असल्यामुळे आत्मसुखात रममाण झालेला.
२३) हेरम्ब---‘हे’ म्हणजे जगत्‌. ‘रम्ब’ म्हणजे संचालक. जगत्संचालक. मायामोहामध्ये गढून गेलेले जीवेश्वरादी सर्वजण सर्वथा पराधीन असतात. म्हणून त्यांना दीन म्हणावे. हेरम्ब नावातील ‘हे’ पदावरून तो बोध जाणता येतो. तसेच मायिक स्वरूपाच्या ज्या ब्रह्मस्थिती त्या मोहरहित अतएव स्वाधीन व समर्थत्वामुळे त्या ईशरूप असल्या तरी मायामोहित दीनाविषयी अनुकंपा म्हणजे दया त्यांच्या ठिकाणी अवश्य संभवते ! म्हणून ‘रंब’ पदाने उल्लेखित अशा त्या पराधीनच ठरतात. थोडक्यात, दीनांना आणि सामर्थ्यवंतांनाही आपल्या इच्छेनुरूप परस्पराधीन करून खेळविणारा परमात्मा तो ‘हेरंब’ गणेश होय.
२४) शम्बर---‘शं’ म्हणजे कल्याण. ‘बर’ मधील ब चा व होतो आणि वर असा शब्द तयार होतो. कल्याणप्रद वर देणारा. किंवा ज्याच्यापाशी श्रेष्ठ सुख असते तो.
२५) शम्भु---ज्याच्यापासून कल्याण किंवा मंगल उत्पन्न होते तो.
२६) लम्बकर्ण---भक्तजनांची आर्त हाक दूरवरूनही ऐकण्याची क्षमता असणारा.
२७) महाबल---शक्तिशाली. सकल शक्तींचे आधारस्थान असलेला. किंवा ज्यांचे बळ महान्‌ आहे असा.
नन्दन: अत्नम्पट: अभीरु: मेघनाद: गणञ्जय: ।
विनायक: विरूपाक्ष: धीरशूर: वरप्रद: ॥९॥
२८) नंदन---आनंददायक
२९) अलम्पट---‘अलम्‌’ म्हणजे परिपूर्ण. ‘पट’ म्हणजे वस्त्र. वस्त्रप्रावरणांनी समृद्ध. लम्पट म्हणजे हाव. अलम्पट्त म्हणजे हाव नसणारा. परिपूर्ण. आत्मपूर्ण असणारा. पूर्णकाम असणारा.
३०) अभीरु---भयहीन, भयशून्य.
३१) मेघनाद---मेघाप्रमाणे घनगंभीर ज्याचा ध्वनी आहे असा. मेघांना आवाज करायला लावतो तो.
३२) गणञ्जय---शत्रूगणांवर जय मिळविणारा किंवा कामक्रोधादी गणांवर ज्याने जय प्राप्त केला आहे असा. सैन्यातील व्यूहरचना अनायासेन छेदणारा.
३३) विनायक---सर्व देवदेवतांचा नायक किंवा ज्याचा कोणीही नायक नाही, जो सर्वांचा नायक आहे असा. श्रीगजाननांनी स्वर्ग-मृत्यू व पाताळ या तीनही लोकी अवतार घेतलेले आहेत. त्यातील विनायक हा मृत्युलोकस्थाच्या घरी झालेला अवतार. मृत्युलोकवासी मानव, त्यांचा मूळ पुरुष कश्यप महामुनि. त्यांच्या घरी अदितीच्या पोटी ‘श्रीविनायक’ अवतार झाला. रौद्रकेतू नावाच्या ब्राह्मणाला देवान्तक आणि नरान्तक असे दोन पुत्र झाले, ते दैत्य प्रकृतीचे असल्यामुळे व शंकराच्या वरप्रसादाने फार मोठे सामर्थ्य मिळवून, समग्र ब्रह्माण्डालाच त्यांनी जिंकल्यामुळे त्यांचा नाश करण्यासाठी गणेशांना अवतार घ्यावा लागला. त्रिगुणोद्‌भव व त्रिगुणविहारी अशा कोणापासूनच त्यांना भय नव्हते. जो सर्वांचाच नायक - शास्ता आहे आणि ज्याला कोणी नायक नाही अर्थात्‌ स्वतंत्र सत्ताधीश आहे, तो विनायक. तो परंब्रह्म, स्वयंभू व अज आहे आणि विशेषकरून जगदीश्वरांचा व समग्र ब्रह्मस्थितीचाही जो नायक म्हणजे नियंता आहे. त्याच्याच इच्छेने व सत्तेने सर्वांचे सर्व व्यवहार चालत आहेत. निरंकुश म्हणजे सर्वस्वतंत्र सत्ताधारी व स्वेच्छेने सर्व काही देणारा आणि सर्वथा स्वसंवेद्यमहिमास्वरूप असणारा तो ‘विनायक’ होय.
३४) विरूपाक्ष---विरूप म्हणजे पाहण्यास कठीण असे अग्नी व सूर्य हेच ज्याचे नेत्र आहेत असा. किंवा सामान्य डोळ्यांना न दिसणारा किंवा ज्ञानरुपी विशेष डोळ्यांनीच ज्याचे स्वरूप कळते असा. ज्याच्या डोळ्यांना रूप नाही असा म्हणजे सर्वसामान्यांसारखे डोळे नसलेला (म्हणजेच अदृश्य डोळ्यांनी सर्वांना तो पाहतो.)
३५) धीरशूर---परम धैर्यशाली आणि वीर असा. धीरांमध्ये शूर असा.
३६) वरप्रद---भक्तांना वरप्रदान करणारा. सूर्याच्या छायेपासून तामिस्रासुर निर्माण झाला. तो अंधकाररूपी होता. सूर्याच्याच वराने तो अमोघ सामर्थ्यवान्‌ झाला आणि नेहमी सूर्याच्या आड येऊन त्याला आच्छादू लागला. अर्थात्‌ सूर्याचा कारभार चालेनासा झाला. सर्वत्र सारखी रात्रच सुरू झाली. कर्मनाश झाला. सूर्याचा उपायही चालेना. दुःखित झालेल्या सूर्याने गणेशाचे ध्यान करून तप चालविले. गणेशाने वरदान दिले. त्याच्या स्मरणापासूनच एक अवतार धारण केला. तोच ‘वरप्रद’ नामा सूर्यपुत्र. गणेशाचा एक अवतार होय. या अवतारातील वरप्रद नावाचा विशेष महत्त्वसूचक अर्थ असा की जो सर्वांनाच वर देतो पण ज्याला कोणीही वरदाता नाही तो ‘वरप्रद’.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel