स्तबक-आकार-कुम्भ-अग्र: रत्नमौलि: निरङ्कुश: ।
सर्पहारकटीसूत्र: सर्पयज्ञोपवीतवान्‌ ॥४१॥
२२८) स्तबकाकारकुम्भाग्र---ज्याच्या मस्तकाचा अग्रभाग (गंडस्थळ) फुलांच्या गुच्छा (स्तबक) प्रमाणे आकर्षक व प्रफुल्लित आहे.
२२९) रत्नमौलि---ज्याने मस्तकावर (मौलि:) रत्नजडित मुकुट धारण केला आहे.
२३०) निरङ्कुश---ज्याच्या मस्तकावर कधीही अंकुशस्पर्श झालेला नाही. होत नाही. म्हणजेच ज्याच्यावर कोणाचीही सत्ता चालत नाही. अमर्याद.
२३१) सर्पहारकटीसूत्र---ज्याने कमरेस सर्पहाराची मेखला धारण केलेली आहे.
२३२) सर्पयज्ञोपवीतवान्‌---ज्याच्या गळ्यात सर्परूपी जानवे आहे.
सर्प-कोटीर-कटक: सर्प-ग्रैवेयक-अङ्गद: ।
सर्प-कक्ष्य-उदराबन्धः सर्पराज-उत्तरीयकः ॥४२॥
२३३) सर्पकोटीरकटक---कोटीर म्हणजे मुकुट आणि कटक म्हणजे हस्तभूषण. मुकुट आणि हस्तभूषण म्हणून सर्प धारण करणारा.
२३४) सर्पग्रैवेयकाङ्गद---ग्रैवेयक म्हणजे कंठहार आणि अङ्गद: म्हणजे बाजूबंद म्हणून सर्प धारण करणारा.
२३५) सर्पकक्ष्योदराबन्ध---कंबरपट्टा म्हणून ज्याने सर्पाला बांधले आहे.
२३६) सर्पराजोत्तरीयक---उत्तरीय (उपरणे) म्हणून ज्याने नागराज वासुकीला धारण केले आहे.
रक्त: रक्ताम्बरधर: रक्त-माल्य-विभूषण: ।
रक्तेक्षण: रक्तकर: रक्ततालु-ओष्ठपल्लव: ॥४३॥
२३७) रक्त---जो रक्तवर्ण आहे.
२३८) रक्ताम्बरधर---लालवस्त्रे परिधान करणारा.
२३९) रक्तमाल्यविभूषण---माल्य म्हणजे फूल किंवा माळ. लालपुष्पांच्या माळांनी अलंकृत झालेला.
२४०) रक्तेक्षण---रक्त ईक्षण: म्हणजे लाल डोळे असणारा.
२४१) रक्तकर---ज्याचे हात लाल आहेत असा.
२४२) रक्तताल्वोष्ठपल्लव---तालू आणि दोन्हीही ओठ लाल असणारा.
श्वेत: श्वेताम्बरधर: श्वेतमाल्यविभूषण: ।
श्र्वेत-आतपत्र-रुचिर: श्वेत-चामर-वीजित: ॥४४॥
२४३) श्वेत---ज्याचा वर्ण शुभ्रधवल आहे. (परब्रह्मरूपात उपासना करताना रक्तवर्णात तर विद्याधीशरूपात श्वेतवर्णात गजाननाची उपासना करतात म्हणून या श्लोकात गजाननाची श्वेतवर्णरूपाने नावे आलेली आहेत.)
२४४) श्वेताम्बरधर :--­- शुभ्र वस्त्र परिधान केलेला.
२४५) श्वेतमाल्यविभूषण---पांढर्‍या फुलांच्या माळांनी विभूषित असलेला.
२४६) श्वेतातपत्ररुचिर---आतपत्र - आतप म्हणजे ऊन आणि आतप-त्र म्हणजे उन्हापासून संरक्षण करणारी छत्री. जो पांढर्‍या छत्रीने शोभून दिसतो.
२४७) श्वेतचामरवीजित---पांढर्‍या शुभ्र चवर्‍यांनी ज्याला वारा घातला जातो असा.
सर्व-अवयव-सम्पूर्ण-सर्वलक्षण-लक्षित: ।
सर्व-आभरण-शोभाढय: सर्वशोभासमन्वित: ॥४५॥
२४८) सर्वावयवसम्पूर्णसर्वलक्षणलक्षित---(सामुद्रिक शास्त्राप्रमाणे) ज्याच्या शरीराचे सर्व अवयव शुभलक्षणसंपन्न आहेत असा. सामुद्रिक शास्त्राप्रमाणे शरीराची ३२ शुभलक्षणे होत. ती पुढीलप्रमाणे
पाच ठिकाणे सूक्ष्म म्हणजे बारीक असावी -
१.त्वचा, २.केस, ३.अंगुली, ४.दात, ५.बोटाची पेरे.
पाच ठिकाणे दीर्घ म्हणजे लांब असावी -
६.भुजा, ७.नेत्र, ८.हनुवटी, ९.जांघ व १०.नाक.
सात ठिकाणे आरक्त असावीत -
११.हातांचे तळवे, १२.पायांचे तळवे, १३.अधरोष्ठ, १४.नेत्र, १५.तालू, १६.जीभ व १७.नखे.
सहा ठिकाणे उन्नत असावीत.-
१८.वक्ष:स्थळ, १९.कुक्षी, २०.केस, २१.खांदे, २२.हात, २३.तोंड.
तीन ठिकाणे विस्तीर्ण म्हणजे रुंद असावीत.
२४.वक्ष:स्थळ, २५.कटी, २६.ललाट.
तीन ठिकाणे आखूड असावीत.
२७.ग्रीवा, २८.जंघा व, २९.शिश्न.
तीन ठिकाणे गंभीर म्हणजे खोल असावीत.
३०.स्वर, ३१.कर्ण, ३२.नाभी.
२४९) सर्वाभरणशोभाढय---जो सर्व आभूषणांनी विभूषित आहे असा.
२५०) सर्वशोभासमन्वित---सर्व प्रकारच्या लावण्यांनी शोभायमान असा.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel