चला, समाजसुधारणेचं एक पाऊल टाकूया!
आत्महत्या आणि स्त्रीभ्रुण हत्या थांबवूया..!

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माझ्या मुलाचा पूर्वनियोजित असलेला विवाह सोहळा सरकारी आदेशानुसार पन्नास लोकांच्या मर्यादित उपस्थितीत नुकताच संपन्न झाला. अगदी अचानकपणे विवाहाची तारीख ठरवण्यात आली. आवश्यक ती सुरक्षितता देवू शकणारे एक मंगल कार्यालय बुक केले. जवळच्या म्हणजे अगदी कुटूंबातील म्हणता येतील अशा फक्त सतरा -अठरा व्यक्ती आमच्या बाजूने या सोहळ्यास उपस्थित राहू शकणार होत्या.

(इथे हे लक्षात घ्यायला हवं की परवानगी मिळालेल्या पन्नास लोकांपैकी आमच्या वाट्याला पंचवीस लोक आले होते. स्वयंपाकी व त्याची माणसे, फोटोग्राफर, व्हीडीओ शुटर, कार्यालयाचे स्वच्छता कर्मचारी आणि एखादा ड्रायव्हर अशा सर्वांचा समावेश या पंचवीस लोकांमध्ये होता.)

साहाजिकच विवाह सोहळयात उपस्थित राहू शकणाऱ्या या सतरा -अठरा व्यक्ती नेमक्या कोण असाव्यात? हे ठरविणे कठीण झाले होते. कुणाची नाराजी न पत्करता हे काम करता येणे केवळ अशक्य वाटत होते. तरीही मनाचा हिय्या करुन पुढे पाऊल टाकणे आवश्यक होते.

नवरदेव मुलाचे मामा, मावशी, आत्या, भावकीतली तीन कुटूंबे, नवरदेव मुलाचे निवडक दोन मित्र आणि आमचे कौटुंबिक मित्र असणारे एक कुटूंब एवढ्याच लोकांना विवाह सोहळयाचे निमंत्रण देवून कमीत कमी संख्येने व केवळ निरोगी व्यक्तीनेच विवाहासाठी उपस्थित राहावे अशी नम्र सूचना सर्वांना करण्यात आली.

प्रत्यक्ष विवाहाच्या दिवशी नियोजनाप्रमाणे मर्यादित लोकांच्या उपस्थितीत सारे विवाह विधी साग्रसंगीत पार पडले. वधूवरांच्या मनासारखे फोटोसेशन देखील झाले. एकंदरीत विवाह सोहळा छानच पार पडला. कार्यालयात कोणत्याही क्षणी कोणत्याही प्रकारची लगबग दिसली नाही, त्यामूळे कुणालाही दगदग झाली नाही. सारे वऱ्हाडी आनंदातच होते. वधूचा निरोप ( बिदाई ) झाल्यावर सगळे जण आपापल्या घरी निघून गेले. लॉक डाऊनमूळे कुणीही पाहूणे मुक्कामी राहण्याचा प्रश्नच नव्हता. थोडक्यात अगदी शांत आणि निवांतपणे हा विवाह सोहळा पार पडला. गर्दी टाळली गेली आणि त्यामूळे आणखी बऱ्याच गोष्टी टाळता आल्या. लग्नप्रसंगी एरवी दिसणारी, आपल्याला विनाकारण दमवणारी धावपळ, पाहुण्यांच्या गर्दीत एखाद्या पाहुण्याकडे नकळत होणारे दुर्लक्ष, त्यामूळे त्या पाहुण्यांचे रुसणे - फुगणे, अशावेळी यजमानांना करावी लागणारी मिनतवारी, जेवणाच्या पंगतीत नेहमी होणारा आकलनाबाहेरचा गोंधळ, लहान मुले व वृद्धांचे होणारे हाल यातील प्रत्येक गोष्ट टाळता आली आणि त्यामूळे खूप मोठे समाधान आमच्या सर्वांच्याच चेहऱ्यावर झळकले. आहेराच्या शेकडो साड्यांचे वाटप करावे लागले नाही. कुणाला टोपी -टॉवेल घालण्यासाठी मंडपात शोधीत बसावे लागले नाही. कार्यालयात उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाची नीट विचारपुस करता आली. त्यातून वातावरण आणखी प्रसन्न व मंगलमय झाल्याचा अनुभव याचि देही याचि डोळा घेता आला!

हे सारं लक्षात घेता यापुढे नेहमी असेच छोटेखानी विवाह झाले पाहिजेत असं मला वाटू लागलं.

मोठे सेलिब्रिटी मंडळी अशाच प्रकारे कमी लोकांच्या उपस्थितीत त्यांचा विवाह सोहळा करुन घेतात. तशा बातम्या आपण अनेकदा वाचल्या व पाहिल्या आहेत.

सध्या कोरोनाच्या भीतीने माणसांची गर्दी टाळण्यासाठी म्हणून शासनाने विवाह, कार्यक्रम, अंत्यविधी अशा कार्यक्रमांतील माणसांच्या उपस्थिती संख्येवर मर्यादा घातल्या आहेत. त्यामूळे असे सर्व कार्यक्रम मर्यादित स्वरुपात संपन्न होताना दिसते आहे. हीच मर्यादा यापुढेही कायम ठेवण्याची नवी प्रथा आपण सुरु करायला हवी.

विविध कारणांमूळे शेतीचे उत्पन्न कमी होत आहे. शेती मालाला पुरेसा भाव मिळत नाही. पूर्वीसारख्या सरकारी नोकऱ्या आता राहिलेल्या नाहीत. खाजगी नोकरीची शाश्वती नाही. आपल्या कित्येक पिढ्या कर्जात जन्मल्या, कर्जात वाढल्या आणि कर्जातच मरण पावल्या आहेत. निदान आता तरी आपले डोळे उघडले पाहिजेत.

विवाह हा केवळ सोहळा नाही तर तो सोळा संस्कारातील एक अत्यंत महत्त्वाचा संस्कार आहे. या संस्काराचे आपल्या समग्र जीवनावर अनुकूल व सकारात्मक परिणाम व्हायला हवेत. दुर्दैवाने तसं होत नाही. समाजातल्या तथाकथित प्रतिष्ठितांचे अंधानुकरण केल्यामूळे आपला विवाह सोहळा हा संस्कार सोहळा राहीला नसून वधु पित्यांसाठी तो संकट सोहळा ठरला आहे. अलिकडच्या काळात वर-पित्यांचीही यात चांगलीच गळचेपी होऊ लागली आहे. खोट्या प्रतिष्ठेला बळी पडून आपण आपल्या कुवतीपेक्षा अधिक खर्च या सोहळ्यांसाठी करु लागल्याने एका बाजूलाआपण कर्जबाजारी होत आहोत तर दुसऱ्या बाजूला व्यापारी वर्ग याच पैशांवर अधिक मोठा होत चालला आहे.

आपण हे लक्षात ठेवायला हवं की, आपण कितीही मोठं लग्न केलं तरी लोकं सगळं विसरून जातात. लग्नातल्या आहेरांचे कपडे कोणीच वापरीत नाही. ते कपाटातली किंवा पेटीतली जागा व्यापून बसतात. जेवणावळीतले पदार्थ लोक चार दिवसात विसरुन जातात. आपण मात्र पुढची चाळीस वर्ष कर्जाच्या खाईत अडकत जातो. शेती, घर किंवा इतर अनेक कारणांसाठी आपण कर्ज घेत असलो तरी लग्नाच्या कर्जाचा बोजा हा सर्वांसाठीच नेहमीच जड असतो. या बोजाखाली अडकून जीव गुदमरु लागतो. एक दिवस एखाद्या क्षणी आपल्याला जीव नकोसा वाटू लागतो आणि आपल्यापैकी काहीजण परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरले की आत्महत्येचा मार्ग निवडतात. कर्जापायी आपला जीव जातो. मागे राहिलेल्या कुटूंबातल्या इतरांच्या जीवाला घोर लावून आपण असं दिगंताच्या प्रवासाला निघून जाणं बरं आहे का? याचा सर्वांनीच बारकाईनं विचार करायला हवा. इर्षा सोडून द्यायला हवी. भावकीसोबत कोणतीच जीवघेणी स्पर्धा करायला नको. लग्नाच्या बाबतीत तर नकोच नको. वधु -वरानेसुध्दा भविष्यात उपयोगी पडतील असेच पोशाख खरेदी केले पाहिजेत. वरमाईनेही आपले रुसवे फुगवे सोडून द्यावेत. आपल्यालाही मुलगी आहे ही बाब लक्षात ठेवून सून ही देखील आपली काळजी घेणारी आपलीच दुसरी मुलगी आहे ही भावना मनात रुजवली पाहिजे. जेवणावळी आणि मान-पानावरील खर्च कमी करुन त्यातून वधू -वरांच्या भावी आयुष्यातील प्रगतीला हातभार लावता आला तर किती छान होईल? मेहंदी, वैदिक लग्न, हळदीचा कार्यक्रम, स्वागत समारंभ या सगळयांत नेटका साधेपणा आणण्याचा प्रयत्न करायला हवा. पाहता पाहता पाच दिवसांचं कसोटी क्रिकेट एक दिवशीय झालं आणि आता तर क्रिकेटचा सामना फक्त वीस षटकांवर आला. असं इतकं स्पष्ट सगळं दिसत असताना आपणही विवाहसुद्धा वन डे सोहळा करायला काय हरकत आहे ?

मोजक्या लोकांत सगळ्या पाहुण्यांशी निवांत संवाद साधता येतो. कार्यक्रमाचा आनंद लुटता येतो. खर्चातही मोठी बचत होऊ शकते. करोनामुळे उद्भवलेली मंदी ही आपल्याला कुंटूब, समाज व शासन पातळीवर सुधारण्यासाठी मिळालेली एक चांगली संधी आहे. सरकारने आता सुमोटो निर्णय घेऊन विवाह व तत्सम कार्यक्रमांसाठी मर्यादित उपस्थितीचे बंधन घालणारा कायदाच निर्माण करायला हवा! बहुतांश शेतकऱ्यांच्या आत्महत्या त्यामूळे टाळता येतील असा मला ठाम विश्वास वाटतो. अर्थातच आणखी एक पैलू आपण विचारात घेतला पाहिजे, ज्यामूळे मला वाटणारा हा विश्वास सर्वानांच वाटू शकेल !  मुलीच्या लग्नात खूप मोठा खर्च करावा लागतो. या एका विचारानं मुलीच्या जन्मानंतर आपल्या आयुष्याची होरपळ होणार याची आई - वडीलांना भीती वाटते. आपल्या आयुष्याची अशी होरपळ होऊ नये म्हणून मुलीची गर्भातच हत्या करण्याचा अघोरी पर्याय त्यांना अधिक सोपा वाटतो. यातून स्त्रीभ्रुण हत्या होतात. समाजात आणखी नव्या आणि गंभीर प्रश्नाचा उगम होतो.

या लेखात सुचवल्याप्रमाणे लग्नात अर्थात मुलीच्या लग्नात होणारा खर्च आपणास कमी करता आला तर कदाचित स्त्रीभ्रुण हत्येच्या प्रश्नाचेही उत्तर मिळू शकेल!
या बाबतीत श्रीमंत व तथाकथित प्रतिष्ठित व्यक्तींना अधिक लोकांची उपस्थिती आवश्यकच आहे असे वाटत असल्यास अधिकच्या उपस्थितीसाठी प्रतिमाणसी फी आकारून तशी परवानगी देण्याचा एक मार्ग खुला ठेवणे सरकारला सहज शक्य आहे.

शेवटी एकच नम्र आवाहन सरकार, समाज आणि कुटूंबातील प्रत्येकाच्या विवेकबुद्धिला...

चला, समाजसुधारणेचं एक पाऊल टाकूया!
आत्महत्या आणि स्त्रीभ्रुण हत्या थांबवूया..!

© श्री अनिल उदावंत
ज्येष्ठ प्रशिक्षक व समुपदेशक
सावेडी, अहमदनगर
संपर्क: ९७६६६६८२९५

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel