गरिबी ही जवळपास जगभरातल्या सर्व राष्ट्रांमध्ये कमी अधिक प्रमाणात आढळून येणारी समस्या आहे. गरिबीबाबत अनेक विचारवंतांची अनेक प्रकारची मते आहेत. कुणाला गरीबी ही आर्थिक समस्या वाटते, कुणाला ती सामाजिक समस्या वाटते तर कुणाला ती मानसिक समस्या वाटते. खरेच गरिबी ही समस्या आहे का? असा प्रश्न विचारणारे सुध्दा अनेक जण आहेत. माझ्या मते गरिबी ही व्यक्ती, कुटूंब, समाज किंवा राष्ट्राच्या गरजांविषयीची स्थिती दर्शवणारी समग्र स्थितीदर्शक अशी एक संकल्पना आहे. गरिबी म्हणजे काय? आपण गरिब कुणाला म्हणावे?गरिबीची नेमकी कारणे काय आहेत? आणि आपणास आपली गरिबी दूर करता येईल काय? अशा काही प्रश्नांचा उहापोह या लेखात आपण करणार आहोत.

आपले आर्थिक उत्पन्न व आपण खात असलेल्या आहारातून मिळणाऱ्या उष्मांकावर आधारलेल्या गरिबीच्या अनेक व्याख्या आपण आजवर ऐकल्या व वाचल्या आहेत. बदलत्या काळानुसार या व्याख्या बदलतानाही आपण पाहिल्या आहेत. सदा सर्वकाळ आणि सर्वांसाठी वापरता येईल अशी गरिबीची सार्वकालिक व्याख्या करायची झाल्यास मी असं म्हणेन की, जेव्हा एखादी व्यक्ती, कुटूंब, समाज किंवा राष्ट्र आपल्या मूलभूत गरजांची पूर्तता करु शकत नाही तेव्हा अशा परिस्थितीला गरिबी असे म्हणावे. याचाच अर्थ जी व्यक्ती, कुटूंब, समाज किंवा राष्ट्र आपल्या मूलभूत गरजांची पूर्तता करु शकत नाही ती व्यक्ती, कुटूंब, समाज किंवा राष्ट्र गरिब असते. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण, रोजगार आणि माहिती या आपल्या सर्वांच्या म्हणजे व्यक्ती, कुटूंब, समाज आणि राष्ट्राच्या मूलभूत गरजा आहेत. या मूलभूत गरजा भागविण्याची ताकद, क्षमता प्राप्त करणे म्हणजे आपली गरिबी दूर करणे होय. यालाच आपण विकास असेही म्हणू शकतो. माझ्या मते, आपल्या मूलभूत गरजा भागविण्याची ताकद किंवा क्षमता म्हणजे विकास होय.

अलिकडच्या काळात गरिबी इतकाच विकास हा एक परवलीचा शब्द बनला आहे. भारतासारख्या खंडप्राय देशात लोकशाही चांगली रुजली आहे असं म्हणत आपल्या देशात होणाऱ्या सर्व प्रकारच्या निवडणूका गरिबी आणि विकास याच दोन शब्दांभोवती फिरत असतात. विकासाच्या नावाखाली भौतिक सुविधांवर  आणि गरिबांच्या नावाखाली विविध सवलत योजनांवर प्रचंड पैसा खर्च केला जातो. प्रत्यक्षात ना आपला विकास होताना दिसतोय ना आपली गरिबी कमी होताना दिसतेय! सरकारी पैसा खर्च करण्याचे हे दोन मार्ग विकासाचे नव्हे तर भ्रष्टाचाराचे मार्ग ठरत असल्याचे अनुभवाला येते. देशातली गरिबी कमी होत नाही याचा स्पष्ट अर्थ असा आहे की आपला गरिबी दूर करण्याच्या प्रयत्नांची दिशा चुकते आहे. नेमकं काय चुकतंय? हे तपासलं तर असं लक्षात येतं की, गरिबीच्या नेमक्या कारणांवर उपाययोजना केलीच जात नाही. गरिबीची नेमकी कारणं शोधून त्यावर उपाययोजना करण्याऐवजी गरिबीच्या केवळ परिणामांवर उपाययोजना करण्यात आपण आपला वेळ श्रम आणि पैसा खर्च करतो आहोत. उदाहरणच द्यायचं झालं तर असं म्हणता येईल की एखाद्या रुग्णाच्या नेमक्या आजाराचा शोध घेवून त्या आजारावर उपचार करण्यापेक्षा त्या आजारामुळे रुगणाला येणाऱ्या तापावरच फक्त औषध दिले जाते. अशा उपचार पद्धतीला लक्षणाधारित उपचार Symptomatic Treatment असे म्हणतात. त्याने संपूर्ण तापही जात नाही आणि आजारही बरा होत नाही.

आपली राजकीय सत्ता टिकविण्यासाठी देशातील गरिबी कायम टिकवून ठेवणे ही सत्ताधाऱ्यांची प्राथमिक गरज असते. सत्तेवर असणारी मंडळी कोणत्याही पक्षाची असली तरी त्यांच्या या प्राधान्यतेमध्ये तसुभरही फरक पडत नाही. देशातील जनता अर्थात मतदार गरीब राहीले तरच या सत्ताधाऱ्यांना सत्तेचा माज करता येईल. देशातील गरिबी कमी झाली आणि सर्वांची आर्थिक व सामाजिक स्थिती सुधारली तर आपल्याला सत्तेवर राहणे कठीण होईल हे सत्ताधारी मंडळीस पुरते ठाऊक आहे. त्यामुळे गरिबीच्या मूळावर घाव न घालताही गरिबी कायम टिकवून ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न प्रत्येक सरकारकडून पूर्ण ताकदीने केले जातात!
माझे हे विधान अनेकांना चुकीचे किंवा अतिशहाणपणाचे म्हणजेच अगदी बावळटपणाचे वाटण्याची शक्यता आहे. याची मला जाणीव आहे. मी मात्र पूर्ण अभ्यास केल्यावरच माझे हे मत बनवले आहे. माझ्या मते गरिबीची मूळ कारणे फक्त चार आहेत. भेदभाव, नैसगिर्क संकटे, मानवी संकटे आणि निवासाचे ठिकाण ही गरिबीची खरी कारणे आहेत. देशातील गरिबी दूर करायची असेल तर व्यक्ती, कुंटूब, समाज आणि शासन या चारही स्तरांवर या चार कारणांचा समूळ नायनाट करण्यासाठी पुढीलप्रमाणे विचारपूर्वक उपाययोजना करणे आवश्यक आहे.

१) भेदभाव हे गरिबीचे सर्वात मोठे कारण आहे. धर्माच्या आधारावर भेदभाव केला की अल्पसंख्यांक असलेल्या धर्माच्या लोकांना मिळणाऱ्या संधी कमी होतात. जातीच्या आधारे भेदभाव केल्यामूळे मागास ठरवलेल्या निम्न जातीच्या लोकांना मिळणाऱ्या संधी कमी होतात. लिंगाच्या आधारे भेदभाव केल्यामूळे स्त्री पुरुषांमध्ये स्त्री दुर्बल किंवा दुय्यम दर्जाची ठरते. तिला मिळणाऱ्या संधी पुरुषांपेक्षा कमी असतात. आणि संधीच मिळाली नाही की व्यक्ती, जात, व धर्म व समाज या पातळ्यांवर माणूस गरीब होतो.
अमेरिकेतला वंशभेद आणि युरोपातला वर्णभेद संपूर्ण नष्ट झाला आणि तिथे आर्थिक सुबत्ता आली. याउलट आफ्रिकेत अजुनही वर्णभेद सुरूच राहील्याने तिथली गरिबी अजुन कायम आहे. म्हणूनच मा. नेल्सन मंडेला यांनी या वर्णद्वेषाविरुद्ध लढा पुकारला आहे.
२) नैसर्गिक संकटे हे गरिबीचे दुसरे महत्वाचे कारण आहे. दुष्काळ, अतिवृष्टी, महापूर, प्रलय, त्सुनामी, ढगफुटी, ज्वालामुखी, भूकंप, जमिनीच्या भुपृष्ठाचे स्खलन, आग, वडवानल ( जंगलात लागलेली आग ) या सारख्या संकटात दरवेळी जीवीतहानी होत नाही मात्र प्रत्येक वेळी मोठया प्रमाणात वित्त व संपत्तीची हानी होऊन त्या त्या ठिकाणचा प्रदेश आणि त्या प्रदेशातील माणुस नक्कीच गरीब होतो.
३) मानवनिर्मित संकटे हे गरिबीचे तिसरे कारण आहे. लढाई, झगडे, युद्ध, दंगली, चोऱ्या, दरोडे, लुटमार, भ्रष्टाचार, खून, मारामाऱ्या इ. मानवनिर्मित संकटे आहेत. या संकटात सापडणारी कोणतीही व्यक्ती अथवा कुंटूब गरिब होते.
४) आपले निवासाचे ठिकाण हे गरिबी निर्माण होण्याचे किंवा आपण गरिब राहण्याचे चौथे आणि महत्वाचे कारण आहे. दास डोंगरी राहतो हे विधान आपणास याच गोष्टीचा प्रत्यय देते. डोंगरदऱ्यांत राहणारी माणसे व त्यांची कंटूंबे कायम गरिब राहतात. त्यांना पुरेशा संधी मिळत नाहीत.
वाडीतला माणूस गावात, गावातला शहरात आणि शहरातला देश परदेशात जातो, काम मिळवतो, व्यवसाय अथवा नोकरी करतो हे चित्र पुरेसे बोलके आहे. ज्या कुटूंबांतील एक तरी माणूस अशा रितीने बाहेर पडतो ती कुटूंबे सधन होताना दिसतात मात्र ज्या
कुटूंबांतील एकही माणूस अशा रितीने बाहेर पडत नाही ती कुटूंबे तशीच गरिबीत खितपत पडलेली दिसतात.

गरिबीच्या या चार मूळ कारणांवर व्यक्ती, कुंटूंब, समाज आणि शासनाच्या पातळीवरून कोणतेच काम प्रभावीपणे होत नाही. वाढती लोकसंख्या, अशिक्षितपणा, बेरोजगारी, अंधश्रद्धा, अनिष्ठ प्रथा हे खरे तर गरिबीचे परिणाम असल्याचे माहित असूनही हीच गरिबीची कारणे आहेत असे वारंवार सांगून सत्ताधारी वर्गाने आपली आजवर दिशाभूल केलेली आहे. समाज कायम गरिब रहावा या हेतूने गरिबीच्या मूळ कारणांकडे संपूर्ण डोळेझाक करण्यात आली आहे. किंबहूना ही कारणे आणखी बळकट करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न धर्म, संस्कृति, शिक्षण, न्याय आणि बाजार व्यवस्थेमार्फत सातत्याने व पूर्ण ताकदीने केला जात आहे. या जळजळीत वास्तवाकडे गांभिर्याने पहाणे व ते समजून घेणे हे गरिबीमुक्त होऊ पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्ती व कुटूंबाचे कर्तव्य आहे. एकदा या वास्तवाचे योग्य आकलन झाले की आपणास गरिबी दूर करण्यासाठीचे पुढील उपाय दृष्टीपथात येतील-

१) धर्म, जात व लिंगाच्या आधारे केला जाणारा सर्व प्रकारचा भेदभाव समूळ नष्ट करून सर्वधर्म, सर्व जाती व स्त्री -पुरुष यांच्यात सर्व पातळ्यांवर समानता प्रस्थापित करणे.
२) नैसर्गिक संकटांमध्ये होणाऱ्या जीवीत व वित्तहानीची भरपाई मिळण्यासाठी प्रत्येक व्यक्ती व कुटूंबाला जीवन विमा, अपघात विमा, आरोग्य विमा व त्यांच्या मालमत्तेला संपूर्ण विमा संरक्षण देणे.
३) गावागावात व शहरांमध्येही धार्मिक, जातीय,वंशीय अथवा वर्गीय तेढ निर्माण होऊ नये, सर्वत्र शांतता व सुरक्षितता प्रस्थापित व्हावी यासाठी सामाजिक सलोख्याचे, एकात्मतेचे व सामंजस्याचे वातावरण निर्माण करून ते कायम टिकविणे.
४) अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण, माहिती व रोजगार या मूलभूत मानवी गरजांच्या पूर्ततेसाठी लागणाऱ्या विविध सेवा सुविधांचे जाळे सर्वदूर पसरवून त्याद्वारे मानवी गरजांच्या पूर्ततेची काळजी घेणे.

उपरोक्त उपाययोजनांच्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी परिपक्व विचारांच्या आधारे अनेक  नवोन्मेषी कार्यक्रम व उपक्रम सरकार व समाजाच्या पातळीवर विविध संस्थांच्या मदतीने राबवायला हवेत. असे झाले तरच भारतातील गरिबी नक्कीच दूर करता येईल!

© अनिल उदावंत
ज्येष्ठ प्रशिक्षक, समुपदेशक व साहित्यिक,
सावेडी, अहमदनगर संपर्क: ९७६६६६८२९५

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel