"मिस्टर अविनाश, काम पूर्ण झालं नाही म्हणजे काय? मी आधीच तुम्हाला आणि तुमच्या टीम ला बजावलं होतं की आज सकाळी माझ्या समोर सगळं file work पूर्ण हवंय, thats it!! पण वेळेचं महत्व म्हणजे काय किंवा ते कशाशी खातात ठाऊक आहे का तुम्हांला?" रीमा  ,अविनाश आणि त्याच्या टीम वर नुसती 'बरसत 'होती. 

तिचीही चूक नव्हती च म्हणा! गेले चार दिवस ती ऑफिस मध्ये हे काम वेळेत व्हावं म्हणून धडपडत होती , एरवी ती बॉस असूनही कधी  तिच्या सोबत काम करणार्यांना ह्याची जाणीव करून देत नसे पण जेव्हा गोष्ट ऑफिस च्या कामाची यायची तेव्हा मात्र तिच्यातली' बॉस 'जागी व्हायची.

वेळेत आणि योग्य काम झाले की सर्वांसमोर भरभरून कौतुक आणि नाही झाले तर चारचौघात असा 'महाप्रसाद' द्यायला ती मागे पुढे पहायची नाही.

आज तर तिच्या patience चा कडेलोट झाला होता , 'अविनाश' सर्वच दृष्टीने तिच्यासाठी खास;त्यात

तो टीम मध्ये असला की अर्धं टेन्शन असंच कमी व्हायचं तिचं; पण आज त्याच्याच टीम ने वेळ पाळली नव्हती,म्हणून दोन शब्द जास्त च बोलले गेले तिच्याकडून!!

तिच्या केबिन मधून जाताना त्यानं खाली मान घालून म्हटलेलं 'सॉरी' तिला जास्तच बेचैन करून गेलं.

अविनाश बाहेर गेल्यावर ती फार अस्वस्थ  पणे फेऱ्या मारत राहिली.

संध्याकाळ झाली, ऑफिस ची वेळ टळून गेली तरी अविनाश आणि त्याचे एक दोन सहकारी कामातच होते.

रीमा नं ऑफिस मधून निघताना एक तिरपा कटाक्ष टाकला त्यांच्याकडे आणि ती घरी जाण्यासाठी निघाली.

कार मध्ये बसली खरी आणि रीमा ने स्वतः ला switch off केलं बॉस च्या भूमिकेतून!!

तिनं घाईने गाडी मार्केटच्या दिशेने घेत तिथल्या प्रसिद्ध अशा ' श्रीराम खाऊवाले ' इथे थांबवली.

पटकन दुकानात शिरत तिनं गुलाबजाम, मक्याचा चिवडा , बालूशाही असे चार पाच हमखास 'हिट आयटम 'घेतले.

जाताना न विसरता रजनीगंधा आणि लाल गुलाब ह्या आवडीच्या combination चा गुच्छ घेतला.

शिवाय तिच्या सोसायटीच्या दारातल्या रणजित भैय्याचं फेमस' मगई पान' ही घेतलं.

हुश्श करत ती घरी पोहोचली.

जरा श्वास घ्यायला म्हणून सोफ्यावर टेकली तोच कामाच्या मावशी हजर झाल्या.

तिनं त्यांना ' आवडीच्या जेवणाच्या' सूचना दिल्या आणि ती स्वतः फ्रेश होण्यासाठी बाथरूम कडे धावली.

थंडगार शॉवर घेऊन तिचं मन, डोकं दोन्ही शांत झालं.

तिनं बाहेर येऊन छान आवरलं.

'आवडीचा' सॅंडल perfume फवारला आणि केस मोकळे करत बाहेर आली तोच दाराची बेल वाजली.

मावशी काम आटोपून निघाल्या च होत्या म्हणून त्यांनीच दार उघडले.

तो आत आला आणि थेट बेडरूममध्ये गेला.

नंतर पाच दहा मिनिटं कसलाच आवाज आला नाही आणि मग जोरात शॉवर चा आवाज!

तोवर रीमान वरणाला फोडणी दिली ती थेट बेडरुम पर्यंत दरवळली आणि तो बेडरूम चं दार उघडत थेट जेवणाच्या टेबल वर धावत आला. 

समोर खास गुलाबजाम, बालूशाही, भरलं वांग,  चुरचुरीत फोडणीचं वरण आणि त्यात कमी म्हणून की काय टेबलावर सजवलेली रजनीगंधा आणि गुलाब!!

त्याचा मूड क्षणात change झाला," रीमा, हा छळवाद चालणार नाही हा दरवेळी!! ऑफिसात धडाधड कामं लावतेस, झापतेस आणि घरी येऊन हा असला सरंजाम!! कितीही चिडू म्हटलं तरी जमत नाही यार!!"

" अवि, ऑफिसमध्ये बॉस असले तरी घरी तुझी बायको आहे म्हटलं मी!! आणि आपल्या नवऱ्याची सर्वतोपरी काळजी घेणं हे काम च आहे माझं!! आणि ऑफिस चं म्हणशील तर तिथे मला स्ट्रिक्ट राहावच लागतं. तुझ्यासारखा कलीग आणि इतका समजूतदार जोडीदार  मिळणं हे भाग्य च आहे माझं, पण हे switch on ,switch off बटन आपण दोघांनीही लावून घेतलंय ना आपल्या डोक्यात त्यामुळं हा आपला संसार असा छान सुरू आहे रे!! नाहीतर एव्हाना' अभिमान' झाला असता आपला ही!!

ह्याचं सगळं श्रेय तुला आहे अवि; एकाच वेळी ऑफिसमध्ये join झालो पण तुझ्यापेक्षा जास्त जलद माझी प्रगती झाली आणि मी वरच्या पायऱ्या चढत गेले पण किती सहज स्वीकारलं तू हे सगळं! ऑफिस मध्ये ही चर्चा होत असणार ह्या सर्व गोष्टींची तरीही तू आणि मी तिकडे मस्त दुर्लक्ष करू शकतोय ते केवळ ह्या स्विच ऑन-स्विच ऑफ बटनांमुळे! "

" आता हे आभारचं भाषण थांबवणार आहेस का? पोटात कावळे ओरडत आहेत माझ्या, सकाळपासून  काही खाल्लं नाहीये मी , बॉस फार खडूस आहे माझी, जेवू सुद्धा दिलं नाहीये काम पूर्ण होईपर्यंत, एक तूच आहेस जी माझं मन जाणते!! नाहीतर काय झालं असतं माझं!"

"अवि पुरे ह, सकाळचा बदला किती घेशील!" 

रमा आणि अवि सोबत टेबलावरची रजनीगंधा आणि गुलाब ही हसत होते अगदी स्वच्छ!! 

अजब कॉम्बिनेशन असलं तरी सुगंध मात्र घरभर पसरला होता दोघांचा!

सौ बीना समीर बाचल
21मे2021

(तळटीप- १फार पूर्वी ह्या आशयाची एक जाहिरात पहिली होती त्यावरून सुचली ही कथा.

२ इथे कोणाचाही इगो दुखवण्याचा मुळीच विचार नाही.

खरं तर स्त्री किंवा पुरुष कोणीही प्रगती केली तर दोघांनी एकमेकांना पूरक वागणं अपेक्षित आहे पण आपण अजूनही ' विकसनशील' आहोत त्यामुळे असा बदल / असं वागणं पुरुषाकडून झालं तर त्याचं जास्त अप्रूप वाटतं.

आशा करू यात की हे चित्र लवकरात लवकर पालटेल आणि स्त्री/पुरुष संबंध हे एकमेकांना  जास्तीत जास्त प्रोत्साहन देणारे,सन्मान देणारे आणि एकमेकांची बौद्धिक,मानसिक वाढ करणारे होतील )

धन्यवाद

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel