(१-२) (हे मार) इंद्रियांना सुखविणारे चैनीचे पदार्थ ही तुझी पहिली सेना होय, अरति (कंटाळा) ही तुझी दुसरी सेना, तिसरी भूक आणि तहान, चवथी विषयवासना, पांचवी आळस, सहावी भीती, सातवी कुशंका आणि आठवी गर्व ही तुझी सेना होय.
(३) (याशिवाय) लाभ, सत्कार, पूजा ही तुझी (नववी) सेना आहे, आणि खोट्या मार्गानें मिळालेली कीर्ति ही दहावी; या कीर्तीच्या योगानें मनुष्य आत्मस्तुति आणि परनिंदा करीत असतो.
(४) हे काळ्याकुट्ट नमुचि (मार), (साधुसंतांवर) प्रहार करणारी ही तुझी सेना आहे. तिला भ्याड मनुष्य जिंकूं शकत नाहीं. परंतु जो शूर मनुष्य तिला जिंकतो तोच सुख लाभतो.

बोधिसत्व पुढें ह्मणतात:-

पगाळ्हा थेत्थ न दिस्सन्ति एते समणब्राह्मणा।
तं च मग्गं न जानन्ति येन गच्छन्ति सुब्बता।।१।।

“(हे मार) हे सगळे श्रमण आणि ब्राह्मण तुझ्या सेनेंत बुडून गेले आहेत; त्यामुळें ते ( शीलदि गुणांनीं) प्रकांशात नाहींत, व त्यांस ज्या मार्गानें महर्षि जातात तो मार्ग ठाऊक नाहीं.

यं तेतं नप्पसहन्ति सेनं लोको सदेवको।
तं ते पञ्ञाय गच्छमि आमं पत्तवं अम्हना।।२।।

ह्या तुझ्या सेनेपुढें देव आणि मनुष्य उभे राहूं शकत नाहींत. तिचा, दगडानें कच्या मातीचें भांडें फोडून टाकावें त्याप्रमाणे मी प्रज्ञेनें पराभव करून टाकतों.”

येथें हा मार कोण, हें आपणांस सांगण्याची आवश्यकता नाहीं. मार ह्मणजे मारणारा. तो वर सांगितलेल्या सेनेच्या साह्यानें मनुष्याच्या सद्वासनांचा नाश करितो. त्याचा जय करणें ह्मणजे आत्मजय करणें होय. हा जय बाह्य शत्रूंवर मिळविलेल्या जयापेक्षां कितीतरी पटीनें श्रेष्ठ आहे.

याप्रमाणें बोधिसत्वाचा माराशीं सारखा झगडा चालला होता. पुढें वैशाख शुद्ध पौर्णिमेच्या दिवशीं सुजाता नांवाच्या कुलीन स्त्रीनें दिलेला दुधाचा पायस सेवन करून तो एका बोधिवृक्षाखालीं (पिंपळाच्या झाडाखालीं) गेला. त्या रात्रीं त्यानें माराचा पूर्णपणें पराभव करून जगदुद्धाराचा धर्ममार्ग शोधून काढला. तेव्हां मार ह्मणाला:-

सत्त वस्सानि भगवंतं अनुबंधिं पदापदं।
ओतारं नाधिगच्छिस्सं संबुकद्धस्स सतिमतो।।१।।

सात वर्षेंपर्यंत सतत भगवंताच्या मागें सारखा लागलों होतों; परंतु या विवेकी (स्मृतिमान्) बुद्धाचें कांहींच वर्म सांपडलें नाहीं.

तस्स सोकपरेतस्स वीणा कक्खस अभस्सथ।
ततो सो दुम्मनो यक्खो तत्थवंतरधायथाति ।।१।।
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel