अतिसीतं अतिउण्हं अतिसायमिदं अहु।
इति विस्सठ्ठकम्मंते अत्था अच्चेन्ति माणवे।।

फार थंडी, फार उन्हाळा, फार सांज झाली ह्मणून जे तरूण काम करणें सोडून देतात त्यांनां संपत्तिहि सोडून जातात.परंतु,

योध सीतंच उण्हंच तिणा भीयो न मञ्ञति।
करं पुरिसकिच्चनि सो सुखा न विहायति।।

जो थंडीची आणि उन्हाळ्याची गवतापेक्षां जास्त किंमत समजत नाहीं आणि उद्योग करित राहतो तो सुखापासून दूर होत नाहीं.

“ हे गृहपतिपुत्र। (१) घरीं आल्यावर कांहींना कांहीं घेऊन जाणारा, (२) शब्दांनींच उपकार करूं पहाणारा, (३) हांजी हांजी करणारा व (४) पापकर्मांत साहाय्य करणारा, हें चार आपले हितशत्रु आहेत असें समजावें व त्यांचा बिकट मार्गाप्रमाणे दुरूनच त्याग करावा. (१) उपकार करणारा, (२) दुःखानें दुःखी व सुखानें सुखी होणारा, (३) सदुपदेश करणारा, व (४) अनुकंपा करणारा, असे हे चार आपले खरे मिज्ञ आहेत असें समजावें, व आई जशी आपल्या मुलाची जोपासना करित तशी य मित्राची जोपासना करावी.

“हे गृहपतिपुत्र। हें पूर्वकृत्य झाल्यावर तरूण गृहस्थानें सहा दिशांच्या पूजेस लागावें. त्या सहा दिशा कोणत्या तें सांगतों. आईबापांनां पूर्वदिशा समजावें; गुरूला दक्षिणदिशा समजावें; पत्नीला पश्चिमदिशा समजावें; आप्तमित्रांस उत्तर दिशा समजावें; सेवकांनां खालची दिशा समजावें; आणि श्रमण ब्राह्मणांला ह्मणजे साधुसंतांला वरची दिशा समजावें. पूर्वदिशा जे आईबाप त्यांची पांच गोष्टींनीं पूजा करावीः- (१) त्यांचें काम करावें; (२) त्यांचे पोषण करावे; (३) कुलांत चालत आलेलीं सत्कार्यें चालू ठेवावीं; (४) त्यांच्या वचनांत वागून त्यांच्या संपत्तीचे वांटेकरी व्हावें, आणि जर त्यांपैकीं कोणी जिवंत नसेल तर त्यांच्या नांवें दानधर्म करावा. ह्या पांच गोष्टींनीं जर आईबापांची पूजा केली तर ते पांच प्रकारांनीं मुलांवर अनुग्रह करितातः- (१) पापापासून निवारण करितात; (२) कल्याणकारक मार्गास लावितात; (३) कलाकौशल्य शिकवितात; (४) योग्य स्त्रीशीं लग्र करून देतात, व (५) योग्य वेळीं आपली मिळकत स्वाधीन करितात. याप्रमाणें केलेली पूर्वदिशाची पूजा कल्याणकारक होते.

“दक्षिणदिशा जे गुरू त्यांची शिष्यानें पांच गोष्टींनीं पूजा करावीः- (१) गुरू जवळ आले तर उठून उभें राहावें; (२) ते आजारी असले तर त्यांची सेवा करावी; (३) श्रद्धापूर्वक ते शिकवितील तें समजावून घ्यावें; (४) त्यांचें कांहीं काम पडल्यास तें करावें; आणि (५) ते शिकवितील तें उत्तम रीतीनें शिकावें. ह्या पांच गोष्टींनीं जर शिष्यानें गुरूची पूजा केली, तर ते पांच प्रकारांनी शिष्यावर अनुग्रह करितातः- (१) चांगला आचार शिकवितात; (२) चांगल्या रीतीनें कलाकौशल्य शिकवितात; (३) जें कांहीं त्यांनां येत असेल तेवढें सारें ते शिष्याला शिकवितात; (४) आपल्या आप्तमित्रांत त्याची स्तुति करितात; आणि (५) त्याला कोठें गेला तरी पोटापाण्याची अडचण पडूं नये अशी विद्या शिकवितात. याप्रमाणें पांच गोष्टींनीं शिष्यानें केलेली गुरूंची पूजा पांच प्रकारांनी फलप्रद होते.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel