सर्व दु:खापासून मुक्त अशा निर्वाणाचा साक्षात्कार करण्याकरितां हीं काषायवस्त्रें घेऊन अनुकंपा करून मला संन्यास द्या.

नंतर त्यांतील एक भिक्षु त्याला ‘बुध्दं सरणं गच्छामि धम्मं सरणं गच्छामि, संघं सरणं गच्छामि’ हीं वाक्यें त्रिवार उच्चारावयास लावतो व त्यानें पाळावयाचे दहा नियम त्याला शिकवितो. (१) प्राणघातापासून विरत होणें (२) चोरीपासून विरत होणें (३) ब्रह्मचर्य धारण करणें, (४) खोटें न बोलणें. (५) सुरादि मादक पदार्थाचें सेवन न करणें. (६) माध्यान्हकालापूर्वी जेवणें. (७) नृत्य, गीत, वादित इत्यादिक कामविकार उत्पन्न करणार्या गोष्टींपासून दूर राहणें. (८) मालागंधादि (चैनीच्या) पदार्थांचे धारण न करणें. (९) उंच आणि मोठ्या शय्येवर निजणें. (१०) सोनें आणि रुपें यांचा स्वीकार न करणें, हे दहा नियम श्रामणेरानें पाळले पाहिजेत.

भिक्षुसंघानें महिन्यांतून पौर्णिमा आणि कृष्णचतुर्दशी या दोन दिवशीं एकत्र जमून उपोसथकर्म केलं पाहिजे. त्या दिवशीं भिक्षुच्या निषिद्धशीलांत समाविष्ट झालेल्या २२७ नियमांचा पाठ सर्व संघासमोर म्हटला जातो. त्यापैकीं कोणत्याहि भिक्षूकडून एखाद्या नियमांविरुद्ध आचरण झालें असेल, तर तो दोष त्यानें तेथल्या तेथें कबूल केला पाहिजे, व त्याला जें प्रायश्र्चित्त सांगितलें असेल तें केलें पाहिजे. २२७ नियमांला प्रातिमोक्ष असें म्हणतात, व त्यांच्या पाठाला प्रातिमोक्षोद्देश असें म्हणतात.

बुद्धाच्या ह्यातीत आणि बुद्धानंतर कांही वर्षे भिक्षुसंघ पावसाळ्याचे चार महिने एके ठिकाणी राहत असे व बाकी आठ महिने चोहोंकडे उपदेश करीत फिरत असे. ही स्थिती अशोककाळापर्यंत टिकली असावी. अशोकाच्या वेळीं जरी पुष्कळ भिक्षु धर्मोपदेशासाठी इतर देशांत गेले, तरी एकंदरीत भिक्षुसंघाला स्थायिक स्वरूप येऊं लागलें. त्याच्यायोगें बौद्ध वाङमयाची बरीच वाढ झाली. परंतु भिक्षुसंघाचा पूर्वीचा जोम कायम राहिला नाहीं.

संघभेद


बुद्धाचा संघ आणि कीर्ति हीं दोन्ही सारखीं वाढत चालली होतीं. त्या वेळीं भद्दिय नांवाचा तरुण, शाक्यांच्या राज्याचा अध्यक्ष होता. त्याचा परम मित्र अनुरुद्ध शाक्य याच्या आग्रहानें त्यानें राज्य सोडून भिक्षुसंघांत प्रवेश करण्याचा विचार केला. या दोघांबरोबर आनंद, भगु, किम्बिल आणि देवदत्त हे चार शाक्यकुमार व त्यांचा न्हावी उपालि यांनी भिक्षुसंघांत प्रवेश केला. उपालीला सर्वांत प्रथम उपसंपदा देण्यांत आली. हा पुढें विनयधर म्हणजे भिक्षुसंघाच्या कायद्यांत प्रवीण झाला;  आनंद धर्मधर म्हणजे बुद्धोपदेशांत प्रवीण झाला; आणि देवदत्त संघभेदक म्हणजे बौद्धसंघांत भेद उत्पन्न करणारा झाला.

बुद्ध भगवान् राजगृहांतील वेळुवनविहारांत राहत असतां देवदत्त त्याजकडे गेला आणि त्याला हात जोडून म्हणाला- “भगवन् आपण आतां वृद्ध झालां आहां, आतां स्वस्थ बसण्याचा आपला काळ आहे. आतां आपण संघाला माझ्या स्वाधीन करावें. मी भिक्षुसंघाचें नायकत्व स्वीकारितों.” यावर बुद्ध भगवान् म्हणाला, “देवदत्त, सारिपुत्त आणि मोगल्लान यांच्या स्वाधीन सुद्धां भिक्षुसंघ करायास मी तयार नाही. मग तुझ्यासारख्या असमंजस सामर्थ्यहीन माणसाच्या स्वाधीन मी भिक्षुसंघ कसा करीन?” हें ऐकून देवदत्त मनांतल्यामनांत फारच संतापला, आणि तेव्हांपासून तो बुद्धाचा सूड उगविण्याच्या दुष्ट वासनेला बळी पडला.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel