पण अमेरिकेला एक दुष्ट रोग जडलेला होता, तो म्हणजे गुलामगिरीचा. तो मारून टाकण्यासाठीं अनिच्छेनें तिला एका यादवी युध्दांत--भावांभावांमधल्या निर्दय आणि निष्ठुर युध्दांत-भाग घ्यावा लागला. ती इतिहासांतील अत्यंत दुर्दैवी व दु:खदायक घटना होती. असें घडलें नसतें तर काय झालें असतें, असल्या चर्चा आतां काय कामाच्या ? इतिहासांत टाकलेलीं पावलें पुन: बदलून टाकण्यांत काय अर्थ ? ही यादवी टाळता आली असती असा युक्तिवाद करण्यांत येतो. ती नि:संशय टाळतां आली असती. हेंच काय, पण जगांतलें कोणतें युध्द, त्यांतील पुढारी वेगळे असते तर, टाळतां आलें नसतें ? त्या त्या युध्दांतील सूत्रधार व प्रमुख पात्रें वेगळीं असतीं तर प्रत्येक युध्द टळलें असतें. पण ते सूत्रधार व प्रमुख पात्रें वेगळीं असतीं तर प्रत्येक युध्द टळलें असतें. पण ते सूत्रधार मानवीच होते. त्यांच्या ठायीं मानवांचे क्रोध-मत्सर व स्वार्थ-दंभ भरपूर होते. त्यांची दृष्टि संकुचित व मर्यादित असल्यामुळेंच, ते जराहि दूरचें बघत नसल्यामुळेंच, इतिहास जसा घडावाचें आपणांस वाटतें तसा तो घडला नाहीं. भूतकाळाचें पुस्तक पुरें झालें आहे. आतां कितीहि काथ्याकूट केला, त्यांतील कितीहि घोडचुका दाखविल्या तरी भूतकाळांतलें एक अक्षरहि बदलणें आतां शक्य नाहीं. पोप म्हणे, 'जें आहे तें योग्यच आहे.'  भूतकाळाला हेंच वचन आपण लावूं तर तें बरोबरच ठरेल. भूतकाळांत जें जें घडलें तें तें तसतसें घडण्यावांचून गत्यंतरच नव्हतें. प्राप्त परिस्थितींत तसेंच व्हावयाचें. १८६१ सालचें अमेरिकेंतील अंतर्युध्द टाळणें अशक्य होतें. पण त्या युध्दानेंहि भूतकाळांतील इतर प्रत्येक युध्दाप्रमाणें भविष्यकाळासाठीं मात्र रक्तानें संदेश लिहून ठेवला आहे,  धोक्याची सूचना देऊन ठेवली आहे. भूतकाळ बदलतां येणार नाहीं, भविष्यकाळ मात्र बदलतां येईल. कोणती ती सूचना ? कोणता तो संदेश ? ती सूचना, तो संदेश, हाच कीं, 'कांहीं युध्दें टाळतां येतात, मानवजातीच्या सुधारणेसाठीं युध्द ही अवश्यक गोष्ट नाहीं. अमेरिकेंतील गुलामगिरी अंतर्गत युध्दामधील रक्तपाताशिवाय रद्द करतां आली असती.' हा संदेश नीट ध्यानीं यावा म्हणून अमेरिकेंतील गुलामगिरीचा इतिहास जरा पाहूं या.

- २ -

कोलंबस प्रथम अमेरिकेंत आला तेव्हां तो तीन वस्तूंच्या शोधांत होता : सोनें, बाटविण्यासाठीं माणसें व गुलाम म्हणून विकावयाला मानवी शरीरें. त्याच्या पाठोपाठ स्पॅनिश लोक येऊन इंडियनांना गुलाम करूं लागले. पण इंडियनांना तो ताण सहन होईना आणि म्हणून (व्हॅन लून् म्हणतो,) 'एका दयाळू धर्मोपदेशकानें-लॅस कॅससनें-आफ्रिकेंतून नीग्रो आणावे असें सुचविलें. इंडियन गुलामांची जागा भरून काढावी असा त्याचा मथितार्थ. नीग्रो अमेरिकेस बर्‍याच वर्षांपूर्वी आले होते. पहिले पांढरे यात्रेकरू मॅसेच्युसेट्स मध्यें १६२० सालीं प्लायमाउथ येथें व गुलामांचे पहिले यात्रेकरू व्हर्जिनियामध्यें जेम्स टाउन येथें उतरले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel