''अरेरे! देवाला हे हृदय फाडून टाकणारे दृश्य पाहून काय वाटेल? स्वत:च्या सा-या आशा; आकांशा धुळीत मिळालेल्या पाहून त्या जगदीश्वराला काय वाटेल? निराशेने तो वेडापिसा होईल. त्याची अनंत आशा संपेल. त्याच्या सहनशीलतेचा शेवटचा क्षण येईल. तो मानवाकडे संतापाने पेटलेल्या डोळ्यांनी पाहील. मानवाचे भस्म होऊन जाईल. तो मानवाला सृष्टीतून साफ पुसून टाकील. हा प्रयोग फसला असे तो ठरवील. कदाचित दुसरा प्रयोग तो करील. कोणाला माहीत?''

बर्नार्ड शॉल देव मानवाला पुसून टाकील असे वाटत आहे. परंतु तसे देव करणार नाही. कारण या मानवी प्राण्यांत काय शक्ती आहे ते त्याच्या अनुभवास आले आहे. याच राक्षसी व मुर्दाड मानवांतून भगवान बुध्द जन्माला आले, भगवान ख्रिस्त जन्माला आले. याच सेंट फ्रॅन्सिस बाहेर पडले, तुलसीदास बाहेर पडले. याच मानवी प्राण्यांतून महात्माजी प्रगट झाले आहेत, रवीन्द्रनाथ जन्मले आहेत. देवाला आशा आहे. फळाचा त्याग करू नये. ती आंबट कच्ची कैरी एक दिवस पिकेल. तिच्या आबंट रसाचे मधुर रसात परिवर्तन होईल. त्याप्रमाणे मानवप्राणी पिकतील. काही पिकलेली फळे फारच मधुर निघाली. देवाने हे पाहिले आहे. तो आशेने अनंत काळ वाट पाहात बसेल.

रामतीर्थ म्हणत असत, ''ज्ञानाची शिडी चढणारी आपण सारी बाळे आहोत. कोणी सर्व पाय-या चढून वरच्या दिवाणखान्यात गेली, कोणी वरच्या शेवटच्या पायरीवर आहेत. कोणी मध्ये आहेत, कोणी शिडीकडे येत आहेत. एक दिवस सारी बाळे दिवाणखान्यात येतील व अपूर्व सोहळा होईल. मधुरतम संगीत होईल. ''

मानवी यात्रा सुरू झाली आहे. आपण सारे यात्रेकरू आहोत. मांगल्याकडे जाणारे यात्रेकरू. नदी सागराकडे जाते, ती का सरळ जाते? ती का एकाच गतीने, एकाच वेगाने जाते? नदी कधी वाकडी जाते, कधी कड्यावरून नि:शंकपणे उडी घेते, कधी उच्छृंखल होते, कधी गावेच्या गावे उद्ध्वस्त करते. कधी गंभीर तर कधी उथळ, कधी हसते तर कधी रडते, कधी भरलेली तर कधी रिती, कधी रानावनांत, काट्याकुट्यात शिरते, तर कधी प्रसन्नपणे मैदानातून जाते;  परंतु शेवटी सागराच्या पायावर जाऊन पडते आणि नदीची वाट पाहणारा, त्या सहस्त्र सरितांची रात्रंदिवस वाट पाहणारा तो सागर सहस्त्र हस्तांनी त्यांना हृदयाशी धरतो, स्वत:शी एकरुप करतो.

ते पर्वत, ते सरितांचे जन्मदाते! ते आपल्या मुलींवर संतापत नाहीत. ते आशेने मुलींकडे पाहात असतात. ते आपले आशीर्वाद पाठवीत असतात. ते जीवनाचा पुरवठा करीत असतात. माझ्या मुली शेवटी अनंत सागराकडे जातील, वेड्यावाकड्या गेल्या तरी ध्येयाला जाऊन गाठतील, अशी पर्वताला अमर आशा असते. स्वत: वितळून तो हिमालय त्यांना पाणी पुरवतो. ''जा, बाळांनो जा, मी श्रध्दावान आहे. गंगे; यमुने जा, माझा तुमच्यावर विश्वास आहे. '' असे तो भव्य हिमालय मुकेपणाने सांगत असतो.

परमेश्वराची अशीच आशा आहे. मानवी प्राणी शेवटी माझ्याकडे येईल. प्रेमाकडे, सहकार्याकडे, ऐक्याकडे, मांगल्याकडे, पवित्र्याकडे येईल. अशी त्याला श्रध्दा आहे. या श्रध्देनेच तो चंद्र; सूर्य पेटवीत आहे, धान्य पिकवीत आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel