सप्तपदीचा विधी सर्वांत महत्त्वाचा. सात पावले बरोबर चाल. परंतु सात पावले म्हणजे का सात पावलेच ? आपण नेहमी बरोबर राहू. बरोबर चालू.
संत म्हणति सप्तपदें सहवासें सख्य साधुशीं घडतें

जो साधू असेल, त्याच्याबरोबर चार पावले चल. तो तुमचा होतो; तो तुम्हाला विसरणार नाही. सात पावले चालणे म्हणजे कायमचे सांगाती होणे. वार सात आहेत. आठवड्यातील सातही दिवशी आपण बरोबर आहोत. प्रत्येक दिवशी आपले पाऊल बरोबर पडत आहे. सप्तपदी म्हणजे जीवनयात्रेत आपण दोघे बरोबर राहू. बरोबर चढू. बरोबर पडू. सुखदु:खांत एकरूप राहू असा भाव. सप्तपदीच्या वेळेस अग्नीस सात प्रदक्षिणा घालीत असता वधूवरांस सूत्राने वेढवितात. वधूवरांभोवती सूत गुंडाळले जाते. वधूवर एकत्र बांधली जातात. वधूवरांचा जीवनपट आता एकत्र गुंफला जाणार. आता प्रत्येकाचा अलग जीवनपट नाही. दोघांनी मिळून सुखाचे वा दु:खाचे एकत्र वस्त्र विणावयाचे. बरे-वाईट जे काय होईल ते दोघांचे. त्या सूत्रामध्ये एकसूत्रीपणाही संदर्शिला जातो. आपण संसारात एकसूत्रीपणाने राहू, आततायीपणा अन्योन्यांनी दाखवावयाचा नाही, असाही अर्थ त्या सूत्रवेष्टनात पाहता येईल.

वरातीच्या वेळेस झाल असते. वराच्या घरी वधू येते, त्या वेळेस सोळा दीपांनी त्यांना ओवाळण्यात येते. झाल प्रत्येकाच्या माथ्यास लावण्यात येते. हे सोळा दिवे काय दाखवितात ? हे सोळा दिवे म्हणजे चंद्राच्या षोडश कला असाव्यात. चंद्र ही मनाची देवता. 'चंद्रमा मनसो जात:' असे श्रुतिवचन आहे. चंद्राला मनाची देवता मानण्यात महान काव्य आहे. चंद्राला सदैव कृष्णपक्ष व शुक्लपक्ष. चंद्र कधी अर्धा, कधी पाव, कधी अजिबात नाहीसा होतो. आपल्या मनाचे असेच आहे. कधी ते अत्यंत उत्साही असते, कधी अगदी निराश, कधी सात्त्विक वृत्तीने उचंबळलेले, तर कधी द्वेषमत्सरांनी बरबटलेले. कधी मनांत अंधार, तरी कधी प्रकाश. मन क्षणात रडते, तर क्षणात हसते. या क्षणी उंच आकाशात, दुस-याच क्षणी खोल अनंत दरीत !

असे जे हे चंचल मन, त्या चंचल मनाचा संपूर्ण रीत्या तुम्हा वधूवरांच्या संबंधात विकास होवो. मनाच्या षोडश सत्कलाविकासात, अशा ह्या षोडश दीपांनी एकमेकांस ओवाळण्यात, हे षोडश दीप वधूवरांस दाखविण्यात असा अर्थ असेल. विवाह का आहे ? विवाह हा शेवटी परस्परांच्या विकासासाठी आहे. एकमेकांनी एकमेकांस हात देत, एकमेकांस शिकवीत, एकमेकांस सांभाळीत; उत्तरोत्तर अधिकाधिक विकास करून घ्यावयाचा. केवळ पुरुष अपूर्ण आहे; केवळ स्त्री अपूर्ण आहे; परंतु दोघांनी एकत्र येऊन जीवनाला पूर्णता आणावयाची, इत्यादी कितीतरी भाव त्या झालीमध्ये असतील. फारच पवित्र व सुंदर तो देखावा असतो. रात्रीची वेळ असते. वधू माहेराहून सासरी आलेली. नवीन जीवनाला प्रारंभ. वधूचे नाव बदलण्यात येते. जणू पूर्वीच्या आयुष्याचा तिने संन्यास घेतला. संन्यासाश्रमात पूर्वीचे नाव बदलतात. जणू नवीनच जन्म सुरू. पूर्वीचे संबंध, पूर्वीच्या आसक्ती, पूर्वीचे सारे पुसून टाकावयाचे. पतीच्या नवीन घरी नवीन संसार सुरू करावयाचा. हृदयाची गजबज झालेली असते. अशा वेळेस ते षोडश दीपदर्शन असते. त्या झालीतील दिव्यांच्या ज्योती झळाळत असतात. तुमच्या आत्मचंद्राचा असाच प्रकाश पडो.
नजर न आवे आतमज्योति
तैल न बत्ती बुझ नहिं जाती
जैसे माणिकमोती ॥
झिलमिल झिलमिल निशिदिन चमके
जैसी निर्मल ज्योति ॥
कहत कबीर सुनो भाई साधू
घरघर वाचत पोथी ॥

'रात्रंदिवस आत चमकणारे हे दिव्य स्वरूप, त्याची ओळख करून घ्या. घरोघर पोथ्या वाचतात; परंतु आत्मतत्त्व, जी कधी न विझणारी आत्मज्योती, माणिकमोत्यांप्रमाणे, निर्मळ ता-यांप्रमाणे अखंड तेवत आहे, ती कोणाच्या नजरेस येते ?' कोणाच्याही नाही. परंतु वधूवरांनो ! तुम्ही या आत्म्याची ओळख करून घ्या. हळूहळू शांतविषय होऊन मनाची प्रसन्नता, संपूर्ण प्रसन्नता, चिरंजीव प्रसन्नता प्राप्त करून घ्या.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel