'भगवन् अत्यंत असमाधान मला वाटत आहे. जीवन विफल वाटत आहे. मला शांति द्या.  तुमच्या अपार शांतींतील एक बिंदु मला मिळाला तरी पुरे. अमृताचा सागर मिळाला आहे आपणांला. एक थेंब मला द्या.' परीक्षिति अत्यंत नम्रतेनें म्हणाला.

'राजा, मी होतां होईतों फार बोलत नाहीं. परंतु एकदां गंभीर वस्तूंवर मी बोलूं लागलों कीं मी मला आवरूं शकत नाहीं. मग खाणेंपिणें, झोंपणें -- कशाचीहि मला आठवण राहात नाहीं. राग पुरा केल्याविना गवई थांबत नाहीं, तसें माझें ब्रह्मज्ञान सुरू झालें, माझा ब्रह्मवीणा सुरू झाला, कीं मनांतील सर्व ओतल्याशिवाय मला थांबता  नाहीं येत. तुझी आहे सिध्दता बसण्याची, श्रवण करण्याची ?' शुक्राचार्यांनी विचारिलें.

'भगवन्, आपण ज्यांत रंगाल त्यांत मीहि रंगूनच जाईन. आपण सांगांल तें असेंच असेल कीं, मला पामरालाहि इतर गोष्टींचा तें विसर पाडील. केव्हांपासून आपण बसावयाचें ? मीच एकटा आपणांजवळ बसेन. म्हणजे अपार शांति राहील. व्यत्यय येणार नाहीं.  तें पाहा समोर शांतिमंदिर ! कमलाकृति असें तें निर्मिलें आहे.  पुष्करिणींतील कमलांचा गंध व शीतल वारा तेथें येतों. सभोंवतीं प्रसन्न वातावरण आहे--' परीक्षिति म्हणाला.

'बरें तर. उद्यां सूर्योंदयापासून आपण बसूं.' शुक्रदेव म्हणाले.

लोक लांबून दर्शन घेत. राजपुरुष ठिकठिकाणीं उभे होतें. 'अशांति निर्मूं नका, कलकलाट करूं नका,' असें सांगत होतें.  तेथें महान् यात्राच सुरू झाली जणूं ! अजारों नरनारी येत व जात. परंतु शुक्राचार्यांचे अन्यत्र लक्ष नसे. राजाला सांगण्यांत ते रंगलेले असत. राजा सर्वेंद्रियांचे कान कून ऐकत होता. तहानलेला पाण्यासाठीं, भुकेलेला अन्नासाठीं, तसा परीक्षिति शुक्रचार्यांच्या शब्दांसाठीं उत्सुक असें.

दोघांची तहानभूक हरपली होती. ज्ञानामृताचें भोजन चाललें होतें. ना विश्रांति, ना निद्रा. शुक्राचार्यांच्या डोळयांतून मधून मधून आनंदाश्रु घळघळत ! कोणत्या दिव्य गोष्टी ते सांगत होते ? तें पाहा एक पांखरूं  शुक्राचार्यांच्या मांडीवर बसून त्यांच्या डोळयांतून गळणारें अश्रु पीत आहे. मोतीं गिळीत आहे. धन्य तें पांखरूं !

असे सात दिवस झालें. सातवा दिवस संपायला थोडासा अवधि राहिला होता. पहाटेचा प्रसन्न वारा वाहात होता. आकाश अधिक गंभीर दिसत होतें. ठळक तारे दिसत होते. पांखरांचा मंजुळ आवाज थोडाथोडा ऐकूं येऊं लागला होता. शुक्राचार्य समारोप करीत होते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel