राजानें आपल्या नोकरांला पाठवून पुरोहिताला तेथें आणिलें. तो पहिल्यानें घोटाळ्यांत पडला खरा. पण आपल्यासमक्ष श्रेष्ठी हार आपल्या स्वाधीन केला असें म्हणतो, तेव्हा गुन्हा नाकबूल करण्यापासून कांहीं फायदा होणार नाहीं असें जाणून तो म्हणाला, ''महाराज श्रेष्ठीनें मला हार दिला खरा पण तो मजपाशीं राहिला नाहीं. मी तो आपल्या दरबारच्या गवयाला देऊन टाकिला.''

झालें ! बिचार्‍या गवयावर पाळी आली ! पुरोहितासारखा साक्षीदार असतांना गुन्हा नाकबूल करण्यांत अर्थ काय ? त्यानें सांगितलें कीं, ''मी पुरोहित महाराजापासून मुक्तहार घेतला खरा पण तो दरबारच्या दासीला देऊन टाकला.''

या चौकशीच्या गडबडीत संध्याकाळ झाली. तेव्हां राजा म्हणाला, ''सध्यां या पांच जणांला अटकेंत ठेवा. उद्यां यांची चौकशी करितां येईल.''

बोधिसत्त्व राजाच्या जवळच होता. तो म्हणाला, ''महाराज, आपण या पांच इसमांला माझ्या स्वाधीन करा. मी या खटल्याची चौकशी करतों.''

राजाला बोधिसत्त्वच या कामीं योग्य वाटला, व त्यानें हा खटला निवडण्याचें काम बोधिसत्त्वावर सोंपविलें. बोधिसत्त्वानें या पांचजणांला एका ठिकाणीं अटकेंत ठेविलें व ते काय बोलतात हें ऐकण्यासाठीं त्या स्थानाच्या आसपास आपल्या गुप्‍त हेरांची योजना केली. रात्रीं सामसूम झाल्यावर श्रेष्ठी या गांवढळ मनुष्याला म्हणाला, ''अरे मूर्खा, तूं मला सार्‍या जन्मांत कधीं पाहिलें होतेंस काय ? मग माझ्याजवळ दागिना दिला असें खोटें कां बोललास ?''

''श्रेष्ठी महाराज, माझ्यासारख्या गांवढळ मनुष्यानें चांगला मंचक सुध्दां कधीं पाहिला नाहीं व मग मोत्याचा हार कोठून पाहिला असणार ! परंतु माराच्या भयानें, व कशीतरी माझी सुटका व्हावी या उद्देशानें मी आपलें नांव सांगितलें. मेहेरबानगीकरून माझ्यावर रागावूं नका.''

इतक्यांत पुरोहित श्रेष्ठीला म्हणाला, ''अहो महाश्रेष्ठी ? तुम्ही माझ्यावर हा भलताच आळ कां म्हणून घातलात ?''

श्रेष्ठी म्हणाला, ''आम्ही दोघेही वजनदार पडलों तेव्हां एका ठिकाणीं राहिल्यानें दोघांचीहि लवकर सुटका होईल अशा कल्पनेनें मी आपणाला देखील या खटल्यांत ओढलें. याबद्दल क्षमा असावी.''
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel