४५. परोपकाराचें फळ.

(अंबजातक नं. १२४)

एकदां आमचा बोधिसत्त्व ब्राह्मणकुलांत जन्मला होता. वयांत आल्यावर ॠषिवेषानें तो हिमालयावर रहात असे. तेथें त्याचे पुष्कळ शिष्य होते. एका वर्षी हिमालयावर भयंकर उन्हाळा सुरू झाला व त्यामुळें पाण्याचे झरे वगैरे आटून गेले. मृगादिक प्राण्यांना पाणी मिळण्याची फार अडचण पडूं लागली. तेव्हां बोधिसत्त्वाच्या शिष्यांपैकीं एका तपस्व्यानें एक लांकडाची मोठी दोणी करून तेथील पशूंला पाणी पाजण्यास सुरुवात केली. पण त्यामुळें त्याला फलमुलें आणण्यासाठीं अवकाश मिळेनासा झाला, व उपाशीं पोटींच पशूंना पाणी पाजण्याची पाळी आली. तथापि त्यानें आपला प्रयत्‍न न सोडतां सर्व श्वापदांची तृप्ति करण्याचा क्रम तसाच पुढें चालविला. तें पाहून पशूंनीं ''हा तपस्वी आमच्यासाठीं फार कष्ट सहन करितो. तेव्हां याचे उपकार फेडणें अत्यंत आवश्यक आहे.'' असा विचार करून सर्वानुमतें हा ठराव पास केला, ''आजपासून जो प्राणी येथें पाणी पिण्यास येईल त्यानें रिकामें न येता आपल्या सामर्थ्याप्रमाणें एकतरी मनुष्योपभोगाला योग्य असें फळ घेऊन यावें. रिक्त हस्तें येऊं नये.''

दुसर्‍या दिवसापासून बोधिसत्त्वाच्या आश्रमांत फळांचे नुसते ढीग पडूं लागले. पांचशें तपस्व्यांला दुसर्‍या ठिकाणीं फलमूलांचा शोध करण्यास गेल्यावांचून तेथल्या तेथें आहार मिळूं लागला. व त्यामुळें त्यांच्या तपश्चर्येला मोठी मदत झाली. त्या तपस्व्याच्या कृत्यानें बोधिसत्त्व खूष होऊन आपल्या शिष्यगणाला म्हणाला, ''तपस्वी हो, परोपकाराचें हें फल लक्षांत ठेवण्यासारखें आहे. आमच्यापैकीं एकानें परोपकरार्थ आपला देह झिजविल्यामुळें आमच्या तपश्चर्येला पुष्कळ मदत झाली आहे. म्हणून परोपकार करण्यास आपण सदोदित झटलें पाहिजे.''
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel