४६. परदेशीं जाऊन डौल मारणें सोपें असतें.

(कटाहकजातक नं. १२५)

आमचा बोधिसत्त्व एका जन्मीं वाराणसी नगरींत अत्यंत धनाढ्य श्रेष्ठी झाला होता. वयांत आल्यावर त्याला एक सुस्वरूप मुलगा झाला. त्याच दिवशीं त्याच्या दासीलाहि एक मुलगा झाला. या दासीपुत्राचें नांव कटाहक असें ठेवण्यांत आलें. तो आपल्या धन्याच्या मुलाबरोबरच वाढला. लहान मूल असल्यामुळें त्याला कोणी आडकाठी करीत नसत. पुढें बोधिसत्त्वाच्या मुलाला अक्षर ओळख करून देण्यासाठीं एक शिक्षक ठेविला. तेव्हां कटाहक देखील त्या शिक्षकाजवळ जाऊन आपल्या मित्राबरोबर लिहिण्यावाचण्यास शिकला. त्याची हुषारी पाहून पुढें वयांत आल्यावर बोधिसत्त्वानें त्याला आपल्या तिजोरीचा अधिकारी नेमिलें. तें काम तो मोठ्या दक्षतेनें करीत असे. तथापि त्याला अशी शंका आली कीं, ''कितीहि झालें तरी मी पडलों दासीपुत्र, माझा लहानसहान दोष देखील सर्वांना मोठा वाटेल; व कदाचित् माझा छळहि करितील आणि पुनः माझ्याकडून दासकर्म करवून घेतील. तेव्हां येथें रहाणें सुरक्षित वाटत नाहीं.''

दिवसें दिवस दुसर्‍या कोठेंतरी दूरच्या गांवी पळून जावें हा कटाहकाचा विचार दृढ होत गेला. पण परक्या गांवीं निर्वाह कसा करावा याची त्यास पंचाईत पडली. शेवटीं त्यानें एक युक्ति शोधून काढली. ती अशी- '' दूरच्या एका लहानशा शहरांत श्रेष्ठीच्या ओळखीचा व्यापारी रहात असे. त्याचा आणि बोधिसत्त्वाचा व्यापारासंबंधानें वारंवार पत्रव्यवहार होत असे. बोधिसत्त्वाच्या तर्फे बहुधा कटाहकच हीं पत्रें लिहीत असे, व त्यांवर बोधिसत्त्वाचा शिक्का मारून तीं रवाना करीत असे. अशाच एका प्रसंगीं त्यानें आपल्या संबंधानें त्या व्यापार्‍याला पत्र लिहून त्यावर श्रेष्ठीचा शिक्का मारून तें बंद करून आपल्या पदरीं ठेविलें व दोन चार दिवसांनीं वाराणसींतून पळ काढला. त्याच्याजवळ जें द्रव्य होतें तें खर्चून वाटेंत त्यानें आपला निर्वाह चालविला आणि बरेंच दिवस प्रवास करून व्यापारी रहात होता तें शहर गांठलें. व्यापार्‍यानें 'कोठून आलांत' असा प्रश्न केल्यावर तो म्हणाला, ''वाराणसी नगरींतील प्रसिद्ध श्रेष्ठीचा मी पुत्र आहें. माझ्या थोरल्या भावामध्यें आणि मजमध्यें तंटा होऊं नये म्हणून माझ्या पित्यानें मला आपणापाशीं पाठविलें आहे. आपणाला मुलगा नाहीं असें आम्हीं ऐकतों. तेव्हां आपण माझें पुत्रवत् पालन करून आपल्या कन्येशीं माझा विवाह करून द्याल अशी माझ्या पित्याला दृढ आशा वाटत आहे, व याचसाठीं मला त्यानें हें पत्र दिलें आहे.'' असें म्हणून कटाहकानें तें पत्र त्या व्यापार्‍यासमोर टाकिलें. त्यांत हाच मजकूर होता. श्रेष्ठीनें आपला मुलगा बुद्धिमान असून व्यापारांत दक्ष आहे, तेव्हां त्याला आपणाजवळ ठेऊन घेऊन आपला घरजांवई कराल अशी आशा बाळगतों इत्यादि मजकूर लिहिला होता. तो वाचून त्या व्यापार्‍याला फारच आनंद झाला. एवढ्या मोठ्या सावकाराचा मुलगा आपल्यासारख्या गरीब व्यापार्‍याचा घरजांवई होणें मोठें भूषणास्पद आहे. तेव्हां ही आपल्या घरीं लक्ष्मी चालत आली आहे असें त्यास वाटलें; व पहिल्या मुहूर्तावर त्यानें कटाहकाशीं आपल्या कन्येचें लग्न लावून दिलें.

कटाहक जात्या हुषार होता हें वर सांगितलेंच आहे. पण आगंतुक श्रीमंतीमुळें त्याच्या अंगी एक दुर्गुण शिरला होता. तो ज्याच्या त्याच्या अंगावर तोंड टाकीत असे. लहानसहान अपराधहि त्याला सहन होत नसे. भोजनसमयीं स्वयंपाकांत कांहीं कमतरता दिसून आली तर तो आपल्या बायकोवर फार संतापत असे, व त्यामुळें त्या बिचारीला उगाच त्रास सोसावा लागत असे. याशिवाय कटाहकाच्या वर्तनांत म्हणण्यासारखे दुसरे दोष नव्हते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel