तेव्हां शंखश्रेष्ठी शांतपणें म्हणाला, ''भद्रे अशी रागावूं नकोस. तुझ्या इतकीच मला त्या दुष्ट पिलियाची चीड आली; परंतु त्यानें दिलेल्या फोलाचा मी स्वीकार केला नसता तर माझें वर्तन सभ्यपणाचें ठरलें नसतें, व त्या योगें त्याच्याकडून जसा मैत्रीचा भेद झाला तसाच तो माझ्याकडूनहि झाला असता. म्हणून निरुपायास्तव हें फोलाचें गाठोडें मला येथवर आणावें लागलें.''

नीच पिलियाच्या अत्यंत कृतघ्नपणानेंहि आपल्या नवर्‍याच्या शांतीचा भंग झाला नाहीं हें पाहून त्या साध्वी स्त्रीला रडूं आलें. तिचा शोक इतका अनावर झाला कीं, तिचा रुदनस्वर धर्मशाळेंवरून जाणार्‍या लोकांना सहज ऐकुं येऊं लागला. शंखश्रेष्ठीनें पिलियाला दिलेल्या दासांपैकी एकजण त्या मार्गानें चालला असतां त्यानें धर्मशाळेंत कोणी स्त्री रडत आहे हें ऐकून काय प्रकार आहे हें पाहण्यासाठीं आंत प्रवेश केला आणि पहातो तों आपली पूर्वीची मालकीण रडत असून मालक तिचें समाधान करीत आहे ! हें पाहून तो म्हणाला, ''धनीसाहेब हा काय प्रकार आहे ? हें मला समजत नाहीं. आपण या ठिकाणीं कसें आला व या उतारूंच्या धर्मशाळेंत कां उतरला ?''

शंखश्रेष्ठीच्या पत्‍नीनें त्याला इत्थंभूत वर्तमान सांगितलें तेव्हां त्या दासाला आपल्या जुन्या मालकाची फार दया आली, व नव्या मालकाचा त्वेष आला. त्यानें आपल्या ओळखीच्या कांहीं गृहस्थांकडे जाऊन आपल्या जुन्या मालकावर आलोल्या प्रसंगाचें यथाभूत वर्णन करून त्यासाठीं त्यानें थोडीबहुत मदत मिळविली व त्याच धर्मशाळेंत कांहीं दिवस त्याची व त्याच्या पत्‍नीची जेवणाखाण्याची कशी बशी व्यवस्था लावून दिली. पुढें घरीं जाऊन शंखश्रेष्ठीनें पिलियाला दिलेल्या सर्व दासांना त्यानें हें वर्तमान कळविलें व त्यांच्या साहाय्यानें एक मोठा कट उभारला. पिलियश्रेष्ठीचे फार उपयोगी नोकर म्हटले म्हणजे शंखश्रेष्ठीकडून मिळालेले हे दासच होते. त्यांच्या स्वामीभक्तीनेंच पिलियाची सर्व कर्मे यथासांग चाललीं होतीं हें त्या दासांना माहीत होतें. त्यांनीं त्या दिवसांपासून पिलियश्रेष्ठीचें काम करण्याचें सोडून दिलें, व इतरांनाहि काम करण्याची मनाई केली. पिलियानें हें वर्तमान ऐकून त्यांच्यावर काठीचा प्रयोग करण्यास सुरुवात केली. तेव्हां त्या सर्वांनीं एकदम वाराणसीच्या राजाकडे जाऊन आपली फिर्याद दाखल केली. या फिर्यादींत पिलियाचा कृतघ्नपणा राजाला पूर्णपणें दिसून आला. शंखश्रेष्ठीची व त्याच्या पत्‍नीची साक्ष घेण्यांत आली. त्याप्रमाणें इतर नोकरांचीहि या बाबतींत साक्ष झाली.

राजा सर्व प्रकार ऐकून घेऊन पिलियाला म्हणाला, ''आजपर्यंत मी तुला मोठा प्रामाणिक माणूस समजत होतों; परंतु तुझा प्रामाणिकपणा वरपांगीं आहे असें या खटल्यामुळें दिसून येत आहे. आतां तुला विचारतों कीं, तुझ्यावर प्रसंग आला तेव्हां तूं या शंखश्रेष्ठीकडून त्याची अर्धी संपत्ती घेऊन आलास कीं, नाहींस ?''

पिलियानें ही गोष्ट कबूल केली. तेव्हां राजा म्हणाला, ''मग त्याची प्रत्युपकृती एक पायली फोलानें होईल असें तुला वाटलें काय ? तूं आमच्याकडून मिळालेल्या मानाला सर्वथैव अपात्र आहेस. तेव्हां तुझी सर्व संपत्ति शंखश्रेष्ठीला देण्याचा हुकूम देतों.''

त्यावर शंखश्रेष्ठी म्हणाला, ''महाराज, यानें जरी मला अत्यंत वाईट रीतीनें वागविलें तथापि, त्याच्या संपत्तीचा मी अभिलाष धरीत नाहीं. केवळ मी दिलेली धनदौलत आणि दासी दास त्यानें परत करावें म्हणजे झालें.''

राजानें ताबडतोब शंखश्रेष्ठीची मागणी अमलांत आणण्यास लाविली. ती सर्व दौलत घेऊन शंखश्रेष्ठी राजगृहाला गेला. पिलियश्रेष्ठीजवळ अद्यापि पुष्कळ धनदौलत शिल्लक होती. पण कीर्ति मात्र समूळ नष्ट झाली होती. आणि ''मरण कां लोकींच दुष्कीर्ति जें'' या कविवचनाप्रमाणें त्याला मरणापेक्षां जीवितच अधिक कंटाळवाणें वाटत होतें.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel