६७. नीच बोलावयाला लागला, तर थोर मौन धरतात.

(दद्दरजातक नं. १७२)


एका जन्मीं बोधिसत्त्व सिंहाचा राजा होऊन हिमालयावरील एका भव्य गुहेंत रहात असे. एके दिवशीं कांहीं कारणानें आजूबाजूचे सर्व सिंह त्याच्या गुहेच्या अंगणांत गोळा झाले होते. तेथें जमल्यावर वहिवाटीप्रमाणें त्या सर्वांनी गर्जना करण्यास सुरुवात केली. त्या टेकडीच्या जवळच दुसर्‍या एका टेकडीवर एक कोल्हा रहात होता. त्याला सिंहाची गर्जना आवडली नाहीं. आणि त्यांचें तोंड बंद करण्यासाठीं त्यानें कोल्हेकुईला सुरुवात केली. तो शब्द कानीं पडतांच सर्व सिंह चपापून जागच्याजागीं चूप बसले. सिंहराजाचा पुत्र एकाएकीं स्वस्थ बसलेले पाहून आपल्या पित्यास म्हणाला, ''बाबा, हे सगळे सिंह भीतीनें गांगरून गेले आहेत असें वाटतें. पण असा हा कोणता प्राणी बरें कीं, ज्यांचा शब्द ऐकल्याबरोबर ही दशा व्हावी ?''

बोधिसत्त्व म्हणाला, ''बाळ, तुझी अगदींच उलटी समजूत झाली आहे. हा मोठा प्राणी नसून नीच कोल्हा आहे; आणि त्याच्या कोल्हेकुईबरोबर सिंहगर्जना करणें लज्जास्पद असल्यामुळें माझे ज्ञातिबांधव चुप राहिले आहेत. नीचाबरोबर बोलण्यापेक्षां मौनव्रत चांगलें, हें तूं लक्षांत ठेव.''
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

६८. हलकटाला आश्रय देऊं नये.

(मक्कटजातक नं. १७३)


एकदां आमचा बोधिसत्त्व काशीदेशांत एका खेडेगांवीं जन्मला होता. वेदाध्ययन वगैरे झाल्यावर त्यानें विवाह केला. परंतु दुःखाची गोष्ट ही कीं, एक मुलगा जन्मल्याबरोबर त्याची बायको मरण पावली. तो मुलगा थोडा चालूं बोलूं लागल्यावर त्याला घेऊन बोधिसत्त्व हिमालयावर जाऊन राहिला. तेथें त्यानें एक सुंदर पर्णशाला बांधली, व अग्निहोत्राची उपासना करून तो कालक्रमणां करूं लागला. एके दिवशीं हिमालयावर गारांचा मोठा पाऊस पडला. त्यामुळें एक वानर थंडीनें गारठला, आणि कोठेंतरी आगीजवळ बसण्यास सांपडतें आहे कीं काय याच्या शोधास लागला. बोधिसत्त्वाच्या आश्रमांत होमकुंड जवळ असलेलें पाहून त्याला मोठें समाधन वाटलें पण दरवाजावर बोधिसत्त्वाचा मुलगा बसला असल्यामुळें मर्कटाला एकदम आंत घुसण्यास भीति वाटली. तेव्हां त्यानें एक नवी युक्ती शोधून काढली. जवळच्या एका पर्णकुटिकेंत एक तापस रहात होता. थोड्या दिवसांमागें तो मरण पावल्यामुळें त्याची वल्कलें वगैरे तापसवेषाला लागणारे सर्व पदार्थ तेथेंच पडून राहिले होते. तीं वल्कलें परिधान करून आणि कमंडलु वगैरे हातांत घेऊन तो माकड बोधिसत्त्वाच्या आश्रमापाशीं आला. त्याला पाहून बोधिसत्त्वाचा पुत्र धांवत धांवत बोधिसत्त्वापाशीं गेला आणि म्हणाला, ''बाबा, एक ठेंगू तापसकुमार आमच्या आश्रमापाशीं आला आहे. त्याचा आपण आदरसत्कार करून आपल्या आश्रमांत ठेऊन घेऊं. आपण फलमूलांसाठीं अरण्यांत गेल्यावर मी येथें एकटाच असतों त्या वेळीं त्याच्या संगतींनें मला बरें वाटेल, आणि आम्हीं दोघेहि बरोबर अध्ययन करूं.''

बोधिसत्त्व आश्रमाबाहेर येऊन पहातो तों तापस वेषधारी मर्कटमहाराजाची स्वारी त्याला दिसली आणि तो म्हणाला, ''मुला, हाचना तो तुझा तापसकुमार ?''

मुलगा म्हणाला, ''होय बाबा, हाच तो तापसकुमार. याची ओळख करून घेण्याला मी उत्सुक झालों आहें.''

बोधिसत्त्व म्हणाला, ''बाबारे जरा दम धर. हा तापसकुमार नसून तापसवेषधारी नीच मर्कट आहे. सुशील ब्राह्मणाचें किंवा तापसाचें तोंड याच्यासारखें विचित्र नसतें. याला जर आम्हीं आश्रय दिला, तर आमच्या पर्णकुटिकेची तो नासधूस करून टाकील. तेव्हां याला येथूनच घालवून द्यावें हें बरें.''

असें बोलून बोधिसत्त्वानें अग्निकुंडातील एक कोलीत त्या माकडावर फेंकली. तेव्हां वल्कलें आणि कमंडलु टाकून देऊन माकड खरें स्वरूप प्रकट करून पळून गेला.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel