वर्धकिसूकर म्हणाला, ''तर मग आजपासून तुम्ही माझ्या सांगण्याप्रमाणें वागा. मनुष्यजातींत लढाईची तयारी कशी करतात, व्यूह कसे रचतात इत्यादि सर्व कांहीं मी पाहिलें आहे तथापि, त्याच्यासारखे शस्त्रास्त्रांचे प्रयोग करणें आम्हांला शक्य नाहीं. परंतु आमच्याजवळ असलेल्या दांतांचा योग्य उपयोग केला असतां वाघाचा पराभव करणें दुष्कर नाहीं.''

त्याच दिवशीं रात्रीच्या रात्री सर्व डुकरांकडून त्यानें एक खंदक तयार करविला आणि त्याच्या बाजूला कांहीं डुकरांना पहारा करण्यास ठेविलें. आळीपाळीनें पहारा करणारें डुकर तो बदलीत असे. डुकरी आणि डुकरांचीं पोरें यांना वाघ येण्याच्या सुमारास मध्यभागीं ठेवून चारी बाजूला चांगल्या बळकट डुकरांना ठेवण्यांत आलें. वाघ आल्यावर त्यांनीं भिऊन पळून जाऊं नये म्हणून धीर देण्यासाठीं वर्धकिसूकर मधून मधून सर्व ठिकाणी फिरत स्वतः देखरेख ठेवीत असे. ठरल्याप्रमाणें सकाळच्या प्रहरीं डुकरांची शिकार करण्यासाठीं वाघ आला. पण डुकरांची ही जय्यत तयारी पाहून तो चपापला. आणि माघारा परत जाऊन आपल्या गुरूच्या आश्रमांत शिरला. वाघाला रिक्तहस्तें आलेला पाहून गुरूला फार वैषम्य वाटलें. इतक्यांत वाघ म्हणाला, ''गुरुजी, आज डुकरांची तयारी कांहीं विलक्षण दिसते. त्यांनीं जणूं काय माणसासारखाच सर्व बंदोबस्त केला आहे.''

तापस संतापून म्हणाला, ''तुझें शौर्य गलित झालें आहे असें दिसतें, नाहींतर डुकर तें काय ! आणि त्याला घाबरून तूं वाघाचा बच्चा असून पळत सुटलास हें काय ! अशा नामर्दपणानें जगण्यापेक्षां मरणें काय वाईट ? तुझ्या नुसत्या गर्जनेनें डुकरांची धुळधाण उडून जाईल. पुनः जाऊन आपलें शौर्य गाजव, आणि एका तरी डुकराला मारून घेऊन ये.''

वाघ फार खजील झाला, आणि माघारें जाऊन खंदकाजवळ पोंचल्यावर त्यानें जोरानें गर्जना केली ! पण डुकर पळून न जातां त्यांनींहि मोठमोठाली आरडा ओरड करून वाघाचेंच अनुकरण केलें ! वाघ आपली शेंपटी बडवूं लागला. तेव्हां डुकर देखील आपल्या शेंपट्या बडवूं लागले ! तेव्हां वाघ क्रोधायमान होऊन खंदकाजवळ धांवला. खंदकाच्या पलीकडच्या काठावर उभा असलेल्या वर्धकिसूकरावर त्यानें उडी टाकली. पण खंदक बराच रुंद असल्यामुळें त्याची उडी नीट पडली नाहीं. वर्धकिसूकरानें त्याला आपल्या दातांनीं धक्का मारून खंदकांत पाडलें. वाघ उताणा खंदकाच्या तळाशीं जाऊन पडला. त्या बरोबर डुकरानें त्याजवर उडी टाकून त्याच्या आंतड्या आपल्या दातांनीं बाहेर काढल्या. सर्व डुकरांना वाघाचा नाश झाल्याबद्दल फार आनंद झाला. पण वाघाचा गुरू अद्यापि बाकी आहे. हें त्याला माहीत होतें. ते वर्धकिसूकराला म्हणाले, ''तुझ्या शौर्यानें वाघाचा नाश झाला आहे. पण या वाघाचा प्रवर्तक अद्यापि जिवंत आहे, आणि आणखी दहा वाघांला शिकवून आमच्या अंगावर सोडून देण्यास तो समर्थ आहे. त्याच्या सारखा धूर्त मनुष्य विरळा. तेव्हां तो जोंपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आम्हांला या अरण्यांत सुख व्हावयाचें नाहीं.''
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel