इकडे परिव्राजकानें हवनद्रव्यें घालण्यासाठीं कांहीं चामड्याच्या पिशव्या शिवून घेतल्या, आणि एके दिवशीं राजाला तो म्हणाला, ''महाराज, हवनाची परिसमाप्ती होत आली आहे. आतां एकच काम बाकी राहिले आहे. एथून दूरच्या एका अरण्यांतून कांहीं औषधीची मुळें आणून अभिमंत्रण करून त्यांचा आपण पुरून ठेविलेल्या बरण्यांवर प्रयोग केला पाहिजे. परंतु आम्ही माघारे येईपर्यंत तुम्ही कोणत्याही मनुष्याला बागांत जाण्याची परवानगी देऊं नका. कां कीं, आम्हीं तेथे तयार केलेल्या कुंड्याचा वगैरे विध्वंस झाला असतां आमच्या श्रमांचें साफल्य व्हावयाचें नाहीं. मी माझ्या शिष्यांसह वर्तमान त्या वनस्पतीच्या शोधासाठी जातों आणि दहा दिवसांच्या आंत येथें परत येतों.''

राजानें त्याच्या सांगण्याप्रमाणें उद्यानाबाहेर पहारा ठेऊन सर्व बंदोबस्त केला.

तरुण परिव्राजक आपल्या शिष्यांना घेऊन एके रात्रीं शुभ मुहूर्तावर औषधीच्या शोधास जाण्यास निघाला. आणि तो शिष्यांना म्हणाला, ''मित्र हो, मी कोण आहें, याची आजपर्यंत तुम्हाला जाणीव नव्हती. आतां मी खरी गोष्ट सांगतों. कोसल देशाच्या राजाचा मी पुत्र आहे. माझ्या बापाला ठार मारून या राजानें आमच्या कुलांतील सर्व द्रव्य हरण करून या ठिकाणीं गाडून ठेविलें आहे. या राजाचा त्या धनावर कोणत्याहि प्रकारें हक्क नसून तें सर्व माझें आहे. आणि जातांना तें घेऊन जाण्यास आम्हांला कोणतीच दिक्कत वाटण्याचें कारण नाहीं.''

असा उपदेश करून जेवढीं सोन्याची नाणी होतीं. तेवढी चामड्याच्या पिशव्यांत भरून त्यानें त्या पिशव्या शिष्यांच्या खांद्यावर दिल्या आणि तेथून प्रयाण केलें, व एका आठवड्यात कोसल देशाची राजधानी श्रावस्ती नगरी गांठली. तेथें जाऊन आपल्या बापाला अनुकूल असलेल्या लोकांना त्यानें वश करून घेतलें; आणि त्यांच्या साहाय्यानें काशीच्या राजानें नेमलेल्या अधिकार्‍यांवर हल्ला करून त्यांचा पाडाव केला. बरोबर आणलेल्या द्रव्याच्या जोरावर त्यानें मोठी सेना उभारली व काशीराजाकडून होणार्‍या हल्ल्याचा प्रतिकार करण्यास तो तयार होऊन राहिला. इकडे काशीराजानें तरुण परिव्राजकाची पुष्कळ दिवस वाट पाहिली, आणि शेंवटीं उद्यानांत जाऊन आपल्या द्रव्याच्या बरण्या उघडून पाहिल्या. परंतु त्या सर्वांत एकही नाणें शिल्लक नसून त्या नुसत्या गवतानें भरलेल्या आढळल्या ! तेव्हां राजाला एकदम धक्का बसून तो वेड्यासारखा ''गवत ! गवत !'' असे बरळत सुटला. त्यावेळीं आमचा बोधिसत्त्व त्याचा अमात्य होता. राजाची अशी विपरीत स्थिती झालेली ऐकून तो धांवत उद्यानांत गेला आणि म्हणाला, ''महाराज गवत, गवत असें म्हणून आपण आक्रोश कां करितां ? कोणीं आपलें गवत नेलें आहे, किंवा आपणांस गवत घेऊन काय करावयाचें आहे ?''

राजा म्हणाला, ''हे पंडिता ! येथें एक तरूण परिव्राजक येऊन राहिला होता, हें तुला माहीत आहेच. त्यानें माझ्या या बरण्यांत गवत भरून ठेऊन त्यांत असलेलें सर्व द्रव्य पळवून नेलें !''

तें ऐकून बोधिसत्त्व म्हणाला, ''मंत्रतंत्राच्या बळानें कोणाला तरी फायदा होतच असतो ! थोडक्यांत जास्ती मिळावयाचें असलें म्हणजे गवत ठेऊन द्रव्य घेऊन गेलें पाहिजे !''

राजा आपली लोभी वृत्ति बोधिसत्त्वाला समजली असावी असें वाटून मनांत वरमला, आणि म्हणाला, ''परंतु जे सुशील परिव्राजक असतात ते अशी गोष्ट करीत नाहींत. पण असा दांभिक तपस्वी मला कोठून सांपडला कोण जाणें.''

बोधिसत्त्वानें राजाचें समाधान करून त्याला राजवाड्यांत नेलें. पुढें कोसल राजाच्या तरूण पुत्रानें उद्यानांतील द्रव्यबळावर कोसल देशाचें राज्य आपल्यापासून हिरावून घेतलें. असें समजल्यावर राजाला आपल्या लोभी वृत्तीबद्दल किती वाईट वाटलें असेल, आणि कसा पश्चात्ताप झाला असेल. याची नुसती कल्पनाच केली पाहिजे !
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel