मरणभयानें त्रस्त झालेल्या देवगर्भेला आणि उपसागराला कंसाचें म्हणणें मान्य करावें लागलें. आणि कंसानें दिलेली गोवध्रमान गांवाची जहागिर घेऊन तीं दोघेजणें तेथें राहिलीं. नवमास पूर्ण झाल्यावर देवगर्भेला मुलगी झाली. कंसोपकंसाला बहिणीला मुलगी झाली हें वर्तमान ऐकून फार आनंद झाला व त्यांनीं तिला गोवर्धमान गांवाची जहागिर दिली. तेव्हां पासून देवगर्भा आणि तिचा पति उपसागर त्याच गांवीं राहूं लागलीं. देवगर्भेच्या या पहिल्या मुलीला अंजनादेवी असें नांव ठेवण्यांत आलें.

कांहीं काळानें देवगर्भा गर्भावती होऊन नवमास पूर्ण झाल्यावर पुत्र प्रसवली. आपले भाऊ आपल्या मुलाला ठार मारतील या भयानें त्याच दिवशीं जन्मलेल्या नंदगोपेच्या मुलीची आणि या मुलाची देवगर्भेनें अदलाबदल केली. या प्रमाणें नंदगोपेला दहा मुली व देवगर्भेला दहा मुलगे झाले. आणि सर्वांची कंसराजाला न कळत अदलाबदल करण्यांत आली.

देवगर्भेच्या दहा मुलांची अनुक्रमें वासुदेव, बलदेव, चंद्रदेव, सूर्यदेव, अग्निदेव, वरुणदेव, अर्जुन, प्रद्युम्न, घृतपंडित आणि अंकूर अशीं नांवें होतीं. ते अंकविष्णु दास आणि नंदगोपा दासी यांचे पुत्र आहेत असें सर्व लोकांस वाटत होतें.

वयांत आल्यावर कुस्त्या खेळण्यांत व लुटालूट करण्यांत ते मोठे प्रवीण झाले. आसपासच्या गांवचे लोक त्यांना थरथरा कापूं लागले. हे दहा भाऊ आपल्या प्रजेला त्रास देतात हें वर्तमान कंसाच्या कानावर आलें. तेव्हां तो अत्यंत संतप्‍त झाला आणि अंधकविष्णूला बोलावून आणून म्हणाला, ''तुझे मुलगे माझ्या राज्यांत धुमाकूळ घालीत आहेत याला जबाबदार कोण ?''

बिचारा अंधकविष्णू राजाच्या दरडावणीला घाबरून जाऊन म्हणाला, ''महाराज, आपण अभयदान देत असाल तर खरी गोष्ट काय ती सांगतों.'' राजानें तुझ्या जिवाला धोका होणार नाहीं असें अभिवचन दिल्यावर त्यानें देवगर्भेच्या आणि आपल्या मुलांची कशी अदलाबदल करण्यांत आली ही सर्व गोष्ट राजाला सांगितली.

आपण उघड रीतीनें या उनाड जवानांशीं विरोध केला तर ते देवगर्भेचे पुत्र आहेत हें उघडकीला येईल व त्यामुळें आपली कांहीं प्रजा त्यांची तरफदारी करील या शंकेनें कंसानें त्यांना मारण्याची एक नवीन युक्ती काढली.

चाणूर आणि मुष्टिक हे दोघे असितांजन नगरांत प्रसिद्ध मल्ल होते. त्यांना बोलावून आणून राजानें असें सांगितलें कीं, मी एका उत्सवांत मल्लयुद्धासाठीं सर्व मल्लांना बोलावणार आहे. त्यांत वासुदेव, बलदेव हे देखिल येतील. त्यांच्याशीं तुम्हीच मल्लयुद्धाला सुरुवात करा व जे डावपेंच अन्यायाचे समजले जातात अशा डावपेंचांनीं दोघांना ठार मारा. तुमच्या विरुद्ध आचरणाबद्दल क्षमा करणें माझ्या हातीं आहे. एवढेंच नव्हे तर मी तुम्हांला या कृत्याबद्दल मोठें बक्षिस देईन.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel