१.

तुझा माझा भाऊपना भाऊपनाची तारीफ

रेशमाच्या गाठी कशा पडल्या बारीक

तुझा माझा भाऊपना, तुझ्यापरास माझा चढ

नारळीच झाड, चढाया अवघड

तुझा माझा भाऊपना, जन तोडिती, तुटेना

रेशमाचा दोरा, गाठ पडली सुटेना

तुझा माझा भाऊपना लाल बागेतली हवा

राजस बोलन्यान शाळू दीस गेले कवां

तुझा माझा भाऊपना, भाऊपनची महिमा मोठी

एक लवंग दोघीसाठी

तुझा माझा भाऊपना, नगं बोलत उभा राहू

हसतो सारा गांवुं

तुझा माझा भाऊपना नग हाताला हात धरु

गाव हाय निंदखोरू

तुझा माझा भाऊपना, जनालोकाची काय चोरी?

याव वाडयाला बिनघोरी

जोडिली मायबहिण, जात साळूची वायली

एका ताटी जेवायाची हौस मनात र्‍हायली

१०

जोडिली मायबहिण पराया जातीची

जीवाला जडभरी, येते मध्यान रातीची

११

तुझा माझा भाऊपना जन सांगतो गार्‍हान

जोडली मायबहीण, येव मागल्या दारानं

१२

तुझा माझा भाऊपना, हाई पराया जातीचा

जेवायाला बसू, मधी अंतर वीतीचा

१३

तुझा माझा भाऊपना, कसा पडला येताजाता

साखरेचा लाडू म्यां दिलाया खाताखाता

१४

तुझा माझा भाऊपना, झाली बारावर वर्स लई

कुनी तोडिली बागशाई, पडे पाऊल हुते सई

१५

तुझा माझा भाऊपना बारा वर्से लोटियली

गडणी सांग कशी कटियेली ?

१६

तुझा माझा भाऊपना वरिंस झाली बारा

आपुल्या चित्ताचा एक बसुन गेला दोरा

१७

तुझा माझा भाऊपना, जस डोंगरीचा झरा

अंतरीचा लोभ खरा

१८

सांगुन धाडते दूरच्या मैतराला

याव चैताच्या जतरेला

१९

दिल्या घेतल्यान पानी पुरना नईच

माझ्या मैतरणी ग्वाड बोलन सुईच

२०

गेले वाटेन जपत अंतरीच गुज

माझी मैतरीण साठयाची गज

२१

तुझा माझा भाऊपना निरशा दुधावानी

कुनी ओतल ऊन पानी

२२

गडणी म्या केल्या इसावर बारा

त्यात जीवाची एक तारा

२३

गडणी म्या केल्या इसावर दोन

सखुवाणी इमानाची कोण ?

२४

तुझा माझा भाऊपना, कुनी कालवलं तीळ ?

अबोल्यात गेला ईळ

२५

तुझा माझा भाऊपना, असा पडूं नये, पडला

तुझ्या गुणांनी जडला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel