१
समूरच्या सोप्या जान पासोडी कुनाची
सासू निजली सुनाची
२
अंतरीच गुज सांगते माझी लाडी
लेक न्हवं, ती माझी ध्वाडी
३
धाकला माझा दीर, सासूबाईच शेंडेफळ
चुडियाचं पाठबळ
४
कुंकवाचा करंडा मेनाला दुसरा
दीरभाऊजीचा चूडीयाला आसरा
५
आउक्ष चिन्तीते चुडयामागे गजर्याला
दीर राजस वजिराला
६
ननंद पाव्हनी, नका म्हनूंसा कुठली
चुड्यामागली पाटली
७
आउक्ष चिन्तीते, चुड्यामागे पाटलीला
ननंद धाकलीला
८
धाकल्या दीराची मर्जी राखुं कुठवरी
उभा पान्याच्या वाटेवरी
९
धाकला माझा दीर वैनी म्हनाया लाजतो
बंधु पाठचा साजतो
१०
धाकला माझा दीर म्हणतो वैनी अक्का
दीर राजसाची बोली ऐका
११
धाकला माझा दीर गोरा छल्लाटा नाकयेला
किती धाक मी लावू त्येला
१२
थोरलं माझे घर चौकट मोराची
करनी धाकल्या दीराची
१३
थोरलं माझं घर म्होरं लोटिता मागं केर
दोघंतिघ दीर, पान खात्यात न्हानथोर
१४
चवघी आम्ही जावा, पाचवी माझी सासू
दीर मोतियाचे घसू
१५
पारावरी सभा बैसली न्हानथोर
उंच मंदीलाचा माझा दीर
१६
ननंद पाव्हनी, सया पुसे कोन शेजारीन ?
माझ्या चुडियाची कैवारीन
१७
सासूपरायास उंच पायरी ननंदेची
कीर्त राखील, राधा अशीलाची
१८
दीर हौशाची पंगत , ननंद कामीन मधी बसे
चुडियाला शोभा दिसे
१९
जिरेसाळ तांदुळ आधनी झाली फुलं
चुडियाच्या पंगतीला, ननंद कामिनीच मुल
२०
मक्याची कणसं हाईती किती जून
ननंदबाईचे द्वाड गुन
२१
धाकली माझी जाऊ हातातलं कांकन
दीर हौशा रतन
२२
सर्व्या घरामंदी दीर भाऊजी चतुर
नांगर जुपायाला दिला सकाळचा मोतुर
२३
पाया पडू आली चोळी अंगात खुतन्याची
रानी माझ्या पुतन्याची
२४
लुगड घेतल, पदरावरी जाई
सयांनु किती सांगु ? सावकाराची मी भावजई
२५
लुगडं घेतल, पदर मोतीचुर
रत्नपारखी माझ दीर
२६
थोरला माझा दीर, दीर न्हव देवराया
वागविल्या त्येन बहिनीवानी भावजया
२७
काळी चंद्रकळा पदरावरी मोर
हौशी घेणार माझे दीर
२८
काळी चंद्रकळा कटयारी काठ वजा
दुकानी दीर माझा
२९
उंचशा ओसरीला जावाजावाचं पाळणे
हौश घरधनी बांधितो खेळणे
३०
सर्व्या गोतामंदी नन्दाबाईची आवड
कंथापाठची शालजोड
३१
भावाभावाचं भांडान जावाजावा हायती बर्या
चौसुपी वाडा नका लावूं त्याला दोर्या
३२
भावाभावाच भांडन जावाजावाच एकमत
तान्ह्या बाळीसाठी नका घालूं आडभिंत