१०१
तुळसाबाई बोले, काय रुक्मीनी तुझा तोरा ?
माझ्या मंजिर्याच तुझा इठ्ठल लेतो तुरा
१०२
ज्याला न्हाई लेक त्यानं तुळस लावावी
सभामंडपांत देव करावं जावाई
१०३
तुळसीच्या माळा पैशाला घेते चार
इठूच्या गळ्याला झाला भार
१०४
तुळसीच्या माळा पैशाला घेते नऊ
सावळ्या पांडुरंगा, हात पुरेना, खाली लऊ
१०५
तुळशीच्या माळा पैशाला घेते वारा
ल्याव्या माझ्या तालेवारा
१०६
तुळसीच्या माळा, पैशाला घेते सोळा
माझा पांडुरंग लेनार सावळा
१०७
तुळशीच्या माळा पैशाला घेते वीस
तुझ्या गळ्याला होती पैस
१०८
पंढरपुरामंदी वस्तीला खूप जागा
गल्लोगल्ली तुळसी बागा
१०९
माझ्या अंगनात तुळशीचं रोप
त्याच्या साउलीला देव गोविंद घेई झोप
११०
तुळशीला घाली पाणी, लावी कापूर आरतीला
सेवा घडली गरतीला
१११
रुक्माईला साडीचोळी, सत्तभामेला दोरवा
माझ्या तुळसाबाईला थंड पाण्याचा गारवा
११२
रूक्माईला साडीचोळी, नेऊं सत्यभामेला पातळ
तुळशीला माझ्या पानी गंगेच नितळ
११३
इठ्ठ्ल बोलती कां ग रुक्मीनी रागराग
गेलो होतो फुलबाग तिथं तुळस आली मागं
११४
इठ्ठल बोलती हिच्या रागाला करूं काई ?
आज तुळसीबागेमंदी मी गेलो न्हाई
११५
रुक्माबाई बोले, वेड लागलं इठ्ठ्लाला
माडी हवेली टाकूनी जातो जनीच्या झोपडीला
११६
रुक्माबाई पुसे, जनी कां येती जाती ?
देव बोलत्यात, माझी मावसबहीन होती
११७
रुक्मीन बोले देवा इठ्ठला कुठं होता ?
लटकी आन देतां, जनीच्या घारी जातां येतां
११८
विठ्ठल बोलत्यात, दे ग रुक्मीणी विडा
रुक्मीन बोलते, तुम्ही जनिचा संग सोडा
११९
देव जवत्यात, पोळी ठेवीती काढूनी
नेती जनीला वाढुनी
१२०
गोपाळपुरा जाया जनाबाईला झालं ऊन
देव इठ्ठ्लनं लाविलं चिंचबन
१२१
इठ्ठ्ल म्हणूनी हाक मारीते राऊळांत
इठु जनीच्या देऊळांत
१२२
चंद्रभागेचं पानी, जनी आणतां घाबरी
पीर्तीचा पांडुरंग आडव्या घेतो घागरी
१२३
देव जेवत्यात लाडू ठेविती शेल्या आड
रुक्माई बोले, देवा जनीचं किती वेड
१२४
रुक्माई बोले देवा तुमचा येतो राग
जनीच्या काजळाचे, तुमच्या शेलीयाला डाग
१२५
रुक्माईच्या पलंगावर गाद्यागिरद्या बख्खळ
देवला आवडे, जनाबाईची वाकळ