नाम कुठवर घ्यावे? आपला श्वासोच्छवास चालू आहे, किंवा स्वत:ची स्मृती आहे, तिथपर्यंत नाम घ्यावे. आपण श्वासोच्छवास जसा मरेपर्यंत घेतो, तसेच नामाचे आहे. बरोबर भाषेत बोलायचे झाले तर असे म्हणता येईल की, श्वासोच्छवास थांबला म्हणजे मरण येते, त्याचप्रमाणे नामाशिवाय जगणे हे मेल्यासारखेच आहे, असे वाटले पाहिजे. अक्षरश: जीव जाईपर्यंत, म्हणजे मीपणाने मरेपर्यंत नाम घेत सुटावे. शेवटी ‘ मी ’ जातो आणि नाम शिल्लकच उरते. नाम घेऊन कधी पुरे होऊ शकत नाही. मुक्ती मिळाली की सर्व पुरे झाले असे म्हणतात, पण मुक्तीनंतरही जर काही कर्तव्य उरत असेल तर ते नामस्मरणच.
माणसाला गुंगीचे औषध दिले म्हणजे त्याला गुंगी आली की नाही हे पाहण्यासाठी अंक मोजायला सांगतात. अंक मोजता मोजता तो थांबला की, तो देहभानावर नाही असे ठरते. तसे, नाम घेता घेता ‘ मी नाम घेतो ’ हेही स्मरण जेव्हा राहात नाही, तेव्हाच त्या नामात रंगून गेलेल्या माणसाचे पर्यवसान ‘ एकान्तात ’ होते. एकान्त म्हणजे नाम घेणारा मी एक, ह्या एकाचाही अंत होणे, म्हणजेच देहबुध्दीचा विसर पडणे, देहबुध्दीच्या पलीकडे जाणे. नाम घेता घेता अशी स्थिती प्राप्त झाली, म्हणजे त्याचे चित्त भगवंताकडे आहे की नाही असा प्रश्न करायला वावच कुठे राहतो? निद्रानाशाचा रोग झाला तर झोप लागेपर्यंत झोपेचे औषध आपण घेतो, तसे आपल्याला स्वाभाविक समाधान मिळेपर्यंत आपण नाम घेतले पाहिजे. नाम उपाधिरहित असल्याने आपणही उपाधिरहित झाल्याशिवाय नामाचे प्रेम आपल्याला येणार नाही. नामाने आनंदमय अशा भगवंताचे सान्निध्य लाभून त्याची कृपा व्हायला वेळ लागत नाही; किंबहुना, ज्याच्यावर भगवंताची कृपा होते त्याच्याच मुखात नाम येते.
नामजपाची संख्या नोंद करुन ठेवावी का? अमुक एक संख्येपर्यंत जप करण्याचा संकल्प केला असेल, किंवा रोजचा काही कमीत कमी जप करण्याचे ठरविले असेल, तर जपसंख्येची नोंद करुन ठेवणे जरुर आहे. जपाची सवय होण्याच्या दृष्टीने, आणि नेमाने काहीतरी किमान जप झाल्याशिवाय दिवस जाऊ नये या दृष्टीनेही, जपसंख्येची नोंद करावी. मात्र असे करताना एका बाबतीत खबरदारी घ्यावी; ती म्हणजे, आपली आजची नामसंख्या पुरी झाली, आता उद्यापर्यंत आपला आणि नामाचा काही संबंध नाही, अशा तर्हेची वृत्ती होण्याचा संभव असतो, त्याला जपावे; आणि नेमाची संख्या पुरी झाली तरी होईल तेवढे आणखी नाम घेण्याची सवय ठेवावी.