तिला त्या दोघांची पहिली भेट आठवली…

हॉरर सिरीयल्सचे टीव्हीवरील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि प्रोड्युसर डी. पी. सिंग यांच्या, रागिणी काम करत असलेल्या  "डर का सामना" या सिरीयलचे शंभर एपिसोड्स पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी "द शिप" नावाच्या (जमिनीवरच असलेल्या) एका हॉटेलमध्ये पार्टी आयोजित केली होती. सुप्रिया आणि सोनी या दोघींना रागिणीने पार्टीला बोलावले होते पण शूटिंगच्या डेट्स असल्यामुळे त्या येऊ शकल्या नव्हत्या. त्या पार्टीला सिरियलचे प्रायोजक, कलाकार, तंत्रज्ञ, पत्रकार आणि बॉलीवूडमधील काही कलाकार सुद्धा उपस्थित होते. सुभाष भट सुद्धा त्यात होते.

त्यांचे लक्ष रागिणी कडे होते. रागिणीच्या त्या सिरियलचे काही एपिसोड्स त्यांनी बघितले होते. तिची अॅक्टींग त्यांना आवडली होती. सुभाष भटनी तिला आणि डी. पी. सिंग यांना जवळ बोलावून काही गप्पा मारल्या. त्यांच्या मनात हॉलीवूडच्या तोडीचा हॉरर चित्रपट भारतात बनवायची इच्छा होती. अजून कथा निश्चित झाली नव्हती पण त्यांचा शोध सुरू होता. रागिणीला त्यांनी चित्रपटात घेण्याविषयी तसे स्पष्ट सांगितले नाही पण त्यांनी स्वतः रागिणीला एवढा वेळ देणं हीच एक मोठी बाब सगळेजण मानत होते. मात्र सुभाष भटच्या मनातले हे सगळे प्लान रागिणीला माहिती नव्हते. पार्टीतील काही जणांच्या हातात सॉफ्ट ड्रिंक्स तर काहींच्या हातात हार्ड ड्रिंक्सचे ग्लासेस होते.

थोड्या वेळानंतर पार्टीत डी. पी. सिंग यांचा मुलगा सूरज सिंग हासुद्धा हजर झाला. त्याने त्याचा स्वतंत्र बिझिनेस सुरू केला होता. डी. पी. सिंग यांनी रागिणी आणि इतरांशी त्याची ओळख करुन दिली. सूरज शक्यतो अशा सिरियल्स वगैरेच्या पार्ट्यांना येत नसे. पण आज अपवाद होता. कारण कदाचित सूरजच्या त्या पार्टीला पार्टीला येण्याने रागिणीच्या पुढच्या आयुष्याला त्यामुळे एक वेगळी कलाटणी मिळणार होती का?

रागिणीने घातलेले चमकदार निळे टॉप आणि निळा मिनी स्कर्ट तिला त्यादिवशी खूप शोभून दिसत होता. तर सूरजने करड्या रंगाचा पार्टी वियर शर्ट आणि निळी जीन्स घातली होती. रागिणी शक्यतो निळ्या रंगाचे कपडे घालायची.

डी. पी. सिंग म्हणाले,  "रागिणी, मिट माय सन सूरज! आणि सूरज, धिस इज रागिणी! अवर ग्रेट अॅक्टर अँड सेवींग ग्रेस ऑफ अवर सिरियल!"

 हाय हॅलो झाले. शेक हँड झाले. रागीनीचे लक्ष सूरजच्या व्यक्तीमत्वाकडे गेले आणि ती भारावून गेली. सूरजने जिम मध्ये जाऊन बॉडी कमावली होती. त्याने डोक्यावर अगदी कमी केस ठेवले होते. हाफ स्लीव्ह शर्टातून त्याचे हातावरचे आणि मनगटावरचे पिळदार हिरवे स्नायू दिसून येत होते आणि त्याने व्यायाम करून शरीर चांगलेच कमावलेले असेल हे त्यातून अधोरेखित होत होते. त्याचे रुंद खांदे आणि बोलण्यात एका प्रकारची जंटलमनची अदब, स्त्रियांशी आदराने वागण्याची पद्धत यावर रागिणी भाळली. आजच्या पार्टीत तो अगदी आक्रमक आणि प्रभावशाली वाटत होता.

सूरज सुद्धा रागिणीच्या ठळक, उठावफदार स्त्रीत्वाकडे आणि एकूणच तिच्या रूपाकडे आणि व्यक्तिमत्वाकडे आकर्षला गेला.

सूरजचे वडील पुढे म्हणाले, "सूरज त्याचा स्वतःचा बिझिनेस करतो आहे. फार कमी वयात त्याने खूप प्रगती केली. तो आणि त्याचे मित्र मिळून भारतात अल्पावधीत एक मोठी फूड चेन सुरू केली. अजून त्यांना बरीच मजल गाठावयाची आहे. पण सो फार आय एम हॅप्पी विथ हिज प्रोग्रेस! देशात आणि परदेशात अनेक ब्रांचेस आहेत आणि एशियन फूड जगाच्या सगळ्या काँटिनेंटमध्ये पोचवायचे आहे त्याला! हॉटेल मॅनेजमेंट मध्ये त्याने करीयर करायचं आधीच ठरवलं होतं आणि त्याप्रमाणे त्याने केलं, देश विदेशात अनेक प्रकारचे कोर्सेस केले, अनेक संशोधन केले, अनुभव घेतला आणि आज हा यशस्वी सूरज आपल्यासमोर उभा आहे!"

सूरजने ही प्रशंसा स्वीकारत रागिणीकडे बघून डोळे मिचकावले.

"नाईस टू हियर धिस सूरज. ग्रेट! अँड बेस्ट लक फॉर युवर फ्यूचर! मे ऑल युवर विशेश कम ट्रू!" रागिणी म्हणाली.

सिंग पुढे म्हणाले, "आणि रागिणी बद्दल काय बोलायचं? जेम आहे, हिरा आहे हिरा! अगदी मनापासून आणि समरसून ती अभिनय करते. बरेच लोक म्हणतात, हॉरर सिरियल्स मधील अॅक्टींग ही खरी अॅक्टींग नाही, पण तिने ते खोटे ठरवले. तिने या सिरियल मध्ये जान आणली जान! हॉरर सिरियल्सला एका ठराविक प्रकारचे प्रेक्षक मिळतात असे मानले जाते पण रागिणीने ते खोटे ठरवले. या सिरीयलला खूप प्रेक्षकवर्ग लाभला आहे! "

तेवढ्यात तेथे त्या सिरियल मधील मुख्य पुरूष पात्र (मेल लिड) प्रतिक श्रीवास्तव आला आणि पुन्हा ओळखपाळख सुरू झाली. पण नंतर सूरज आणि रागिणी एकमेकांशी बराच वेळ बोलत बसले. या दोघांना एकमेकांशी बोलायला आवडायला लागले होते. का कोण जाणे, त्यांच्यात पहिल्या भेटीपासूनच एक सुप्त आकर्षण निर्माण झाले आणि दोघांकडून सारखाच साद आणि प्रतिसाद मिळत होता.

पार्टीत मग म्युझिक, डान्स सुरू झाले. सूरजची सोबत नाचण्याची विनंती रागिणीने मान्य केली…ती पार्टी रागिणी कधीही विसरू शकणार नव्हती, कारण त्यानंतरच तर त्यांनी एकमेकांच्या भेटीगाठी घेणे सुरु केले. डेटिंग सुरु झाले..

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel