बामियानचे बुद्ध हे चौथ्या आणि पाचव्या शतकात बनवलेल्या बुद्धांच्या दोन उभ्या मूर्त्या होत्या ज्या अफगाणिस्तान मधील बामियान शहरा जवळ स्थित होत्या. या काबुलच्या २३० किलोमीटर (१४० मैल) वायव्य दिशेवर आणि २५०० मीटर (८२०० फुट) उंचीवर होत्या. यातील, लहान मूर्ती इ. स. ५०७ मध्ये बांधली होती आणि मोठ्या आकाराची मूर्ती इ. स. ५५४ मधील होती. ह्या अनुक्रमे ३५ मीटर (११५ फूट) आणि ५३ मीटर (१७४ फूट) उंचीच्या होत्या. ह्या मूर्त्यांची गणना जगातील भव्य बुद्ध मूर्त्यां मध्ये होत असे.
मार्च २००१ मध्ये अफगाणिस्तानच्या जिहादी संस्था तालिबानच्या मुल्ला मोहम्मद उमरच्या सांगण्यावर या मूर्त्या डायनामाइटने उडवल्या गेल्या. काही आठवड्यात संयुक्त अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना अफगाणिस्तानच्या इस्लामिक अमीरात चे दूत सईद रहमतुल्लाह हाशमी म्हणाले की त्यांनी मूर्त्या राखण्यासाठी मिळणाऱ्या आंतरराष्ट्रीय निधीच्या विरोधात हे केले आहे जेव्हा अफगाणिस्तान दुष्काळाला तोंड देत आहे.