“मी करून त्यांना पाठवीन.” मालती म्हणाली.
“तुम्हांला कशाला त्रास?” रामदास म्हणाला.
“तो त्रास नसून आनंद आहे.” मालती म्हणाली.
“आम्ही तर तुम्हा दोघांची खाणावळीत व्यवस्था केली होती.” तो म्हणाला.
“खाणावळीत नको. वेळ आहे. येथे सारे सामानही आहे. भाऊ भाजी वगैरे घेऊन येईल. तुम्ही वाईट नका वाटून घेऊ. कंटाळाच आला तर खाणावळीत जेवून येऊ.” ती म्हणाली.
रामदास गेला. मालतीने शेगडी पेटवली. सखाराम काहीतरी लिहीत होता. थोड्या वेळाने रामदासने भाजी आणून दिली. मालतीने भाकरी-भाजी केली. सुटसुटीत स्वयंपाक. पसारा त्या दोघांना आवडत नसे. तिने घनासाठी डबा भरला. घरून आणलेले पदार्थही दिले. करंडीही दिली. रामदास ते सारे घेऊन गेला.
“चिठ्ठी त्यांना द्या.”सखाराम म्हणाला.
रामदास लॉकपमध्ये असलेल्या घनाभाऊंना डबा देण्यासाठी गेला. घना टकळीवर कातीत बसला होता. रामदासला पाहून तो आनंदला. शिपायाने कोठडीचे दार उघडले. तो डबा देण्यात, आला. फळांची करंडीही.
“ही फळे कशाला?” त्याने विचारले.
“मालतीताईंनी ती बरोबर आणली होती. तुम्हांला देण्यासाठी म्हणून.” रामदासने सांगितले.
घनाने जेवण केले, आणि त्याने ते रामफळ फोडले. शिपायाला व रामदासलाही त्याने दिले.
“सखारामभाऊंनी ही चिठ्ठी दिली आहे.” रामदास म्हणाला.
“पोलिसदादांना विचारून दे.” घना म्हणाला.
“द्या. त्यात दुसरे काय असणार? तुम्ही साधी सरळ माणसे. बाँब फेकणारी थोडीच आहात?” शिपाईदादा म्हणाला.