(ही गोष्ट काल्पनिक आहे यदाकदाचित स्थळ नाव  इत्यादीबद्दल साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.)            

दोघांनाही आपल्या छातीची धडधड एखाद्या मोटारीच्या इंजिनप्रमाणे जाणवत होती .

सर्वत्र सामसूम होताच आपली पडशी(सॅक) पाठीवर टाकून येथून वाटेल तो धोका स्वीकारून पळून जायचे असे त्यांनी मनोमन निश्चित केले .

तात्यांनी अंगणातील दिवा मालविला होता .अजून घरातील दिवे चालू होते .जाग होती तोपर्यंत त्यांना पळता येणार नव्हते.भुते असोत किंवा माणसे असोत .या माणसांना निदान जादू माहीत होती.जादूने ते कुठूनही कुठे क्षणात जाऊ शकत होते .लाकडे न पेटविता चुलीत जाळ करू शकत होते .चुलीत पाय घालून तो जाळू शकत होते .निदान दृष्टिभ्रम तरी निर्माण करू शकत होते .ते गोड गोड बोलत होते .त्यांनी आपल्याला आसरा दिला होता .जेवण दिले होते .त्यांच्यात तसे धोकादायक काहीच दिसत नव्हते .तरीही का कोण जाणे इथे थांबू नये असे दोघांनाही वाटत होते .त्यांना माहीत असताना आपण जाण्याचा प्रयत्न केला तर ते आपल्याला जाऊ देणार  नाहीत याची त्यांना खात्री होती .

अकरा वाजता सर्वत्र सामसूम झाली .दोघे जण त्याचीच वाट पाहत होते .त्यानी आपल्या पडशा (सॅक)पाठीवर चढविल्या आणि तार्‍यांच्या अंधुक प्रकाशात जसे जमेल तसे पलायन करण्याचे ठरविले.ते त्या घराच्या कंपाउंडच्या बाहेर जावू शकले नाहीत.बेड्याच्या(एक प्रकारचे फाटक .दोन चिरे दोन बाजूला पुरलेले असतात.चिर्‍यांना सारख्या अंतरावर मोठी छिद्रे केलेली असतात.त्या छिद्रातून बांबूच्या काठ्या घातलेल्या असतात. काठी सरकवून आंत बाहेर येताजाता येते.)  बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांना असे आढळून आले की ते बाहेर जावू शकत नाहीत .त्यांना कुणीतरी अडवून धरत आहे . त्यांना कुणीतरी पकडून ठेवले आहे.दोन चारदा त्यांनी जोर करून बाहेर जाण्याचा प्रयत्न केला .बाहेर जाणे अशक्य आहे असे त्यांना आढळून आले .कोणती तरी अदृश्य शक्ती त्यांना बाहेर जावू देत नव्हती .

शेवटी हताश होऊन ते दोघे आपआपल्या बाजल्यावर  आडवे झाले.रात्रीचे बारा वाजले .तात्यांच्या घरात ठोक्यांचे घड्याळ होते.त्याचे बारा टोल पडलेले  ऐकायला आले.

रात्री बारा ही बऱ्याच वेळा अशुभ वेळ असते .अदृश्य अशुभ प्रतिकूल अमानवी शक्ती या वेळी कार्यरत होतात.या वेळी त्यांची शक्ती जास्तीत जास्त असते .(सगळ्या अमानवी शक्ती प्रतिकूल अशुभ असतात असे नाही )दोघांनाही वातावरणात बदल झालेला आढळून आला. अकस्मात तिघेजण बाहेरून चुडीच्या (पलित्याच्या)प्रकाशात बेडे ओलांडून आत आले .ते जणू काही बेड्याबाहेरच अवकाशातून प्रकट झाले होते.त्याअगोदर दूरवरून प्रकाश येताना दिसला नव्हता.चुडीच्या प्रकाशात ते भयाण दिसत होते.त्या तिघांपैकी प्रत्येकाच्या हातात वेगवेगळे शस्त्र होते .तलवार कुर्‍हाड बंदूक अशी ती तीन शस्त्रे होती .

त्या तिघांनी तात्यांना बाहेर ये दरवाजा उघड म्हणून ललकारले . बाहेरच्या आरडाओरडीने तात्या व घरातील मंडळी जागी झाली.घरात सर्वत्र  दिवे लागले .तात्या ओटीवर आले त्यांनी अंगणातील दिवा लावला .प्रकाशात ते तिघे कळी काळासारखे दिसत होते.तात्यांनी त्या तिघांना ओळखले.  तात्यांकडून त्यांनी कर्जाऊ पैसे घेतलेले होते .तात्यांनी त्यांची जमीन कर्ज फेडू न शकल्यामुळे कायदेशीररित्या ताब्यात घेतली होती .ते तिघेही त्यामुळे चिडले होते .खोताने पूर्वीही त्यांना बरेच छळले असावे. खोताशी  त्यांचे जुने वैर असावे.  तात्यांना जिवंत सोडायचे नाही. घरातील सर्वांना नामशेष करायचे.असा इरादा त्यांच्या बोलण्यातून दिसत होता.तात्यांना वाटेल त्या शिव्या ते देत होते .तात्या चिडतील आणि रागाने दरवाजा उघडून बाहेर येतील असा त्यांचा प्रयत्न होता .

तात्या तसे विचारी होते.आपण या वेळी बाहेर पडता कामा नये याची त्यांना पुरेपूर जाणीव होती.सुधाकर व तात्या त्यांच्या हातात त्यांच्या जवळ असलेली शस्त्रे घेऊन तयार होते. आता समर प्रसंग ओढवणार हे दोघेही समजून चुकले .आपण पुढे होऊन काहीतरी केले पाहिजे असे दोघांनाही वाटत होते . निशस्त्र पुढे जाण्यात काहीच अर्थ नव्हता .दोघेही काय होत आहे ते मुकाटपणे  पाहू लागले 

तात्या दरवाजा उघडून बाहेर यायला तयार नव्हते .तात्या व सुधाकर दोघेही आत शस्त्रसज्ज झाले होते .तात्या दरवाजा उघडत नाहीत असे पाहून त्यातील कुऱ्हाडधारी व्यक्तीने दरवाज्यावर  कुऱ्हाड चालविली.तीन चार घावांमध्ये दरवाजा तुटून पडला . 

सुधाकर व तात्या तलवारी घेऊन त्यांच्याशी लढण्यास सज्ज होते .तिथे एक छोटेसे युद्ध झाले .तात्या व सुधाकर यांची शक्ती कमी पडली .दोघांनाही ठार मारण्यात आले .सुधाकरचे मुंडके उडविण्यात आले.तात्यांच्या छातीचा वेध कुऱ्हाडीने घेतला .थोड्याच वेळात काकू, सुधाकरची पत्नी व बंड्या यांनाही ठार मारण्यात आले.पाच प्रेतांचा खच पडला .जिकडे तिकडे रक्तच रक्त झाले .एवढ्यात तात्या उठून उभे राहिले .त्यांच्या छातीत रुतलेली कुऱ्हाड तशीच होती.तरीही त्यांचा आवेश उल्लेखनीय  होता .त्यांच्या अंगात कसला तरी अमानवी  संचार झाल्यासारखे दिसत होते.    

बंदूकधारी इसमाच्या हातातील बंदूक त्यांनी ओढून घेतली.  दुसऱ्याच क्षणी त्यांनी त्या बंदुकीने  गोळ्या घालून दोघांचा वध केला.दुनळी बंदूक होती .तिसरी गोळी असती तर त्यांनी तिसऱ्यालाही गोळी घातली असती.  बंदुकीचा दस्ता डोक्यात घालून तिसऱ्याला ठार मारले . ते तिघे आडवे झाल्यावर तात्यांच्या अंगातील संचार लुप्त झाला . तात्याही अकस्मात जमिनीवर कोसळले .

सर्व दिवे ढणाढणा जळत होते.सर्वत्र भयाण स्मशान शांतता पसरली होती .थोड्या वेळापूर्वींचे आरडाओरडीचे आवाज आता थांबले होते .

या सर्व गोष्टी इतक्या भराभर घडत गेल्या की त्यामध्ये हस्तक्षेप करण्याचे दोघांनाही सुचले नाही .सुचले तरी त्याचा काही उपयोग नाही असे त्यांच्या लक्षात आले होते .कदाचित भीतीने त्यांची बोबडी वळली असावी .दोघेही बाजल्यावर बसून एखाद्या चित्रपटाप्रमाणे सर्व घटना धडधडत्या हृदयाने पाहात होते .

सर्वत्र सामसूम झाल्यावर ते घरात गेले.ओटीवर तात्या व सुधाकर, तर माजघरात  काकू व सुधाकरची पत्नी आणि स्वयंपाक घरात बंड्या यांची प्रेते पडलेली होती.सर्वत्र रक्ताचा शिडकावा झाला होता .

दोघेही भीतीने थरथर कापत होते .दोघेही प्रसंगावधानी होते .त्यांच्या निरनिराळ्या ठिकाणच्या प्रवासात त्यांनी अनेक विचित्र, भयानक अनपेक्षित अनाकलनीय घटना पाहिल्या होत्या .परंतु या घटनेला तुलना नव्हती.

एवढा आरडा ओरडा होऊनही ,बंदुकीचे आवाज होऊनही, गावातील कुणीही इकडे फिरकले नव्हते.ही गोष्ट थोडी विचित्र वाटत होती .भीतीमुळे सुरुवातीला नसेल, पण सर्वत्र शांतता पसरल्यावर गावातील काही जण यायला हवे होते . कुणीच आले कसे नाही असा विचार त्यांच्या मनात येत होता .ते आल्यापासून सर्व काही अनपेक्षित व विचित्र घडत होते. 

दोघांपुढे आता काय करावे असा प्रश्न निर्माण झाला .बाजल्यावर आडवे होईपर्यंत  आपल्याला दिसत होते, ते सर्व भास असावेत अश्या  निर्णयावर ते दोघेही आले .घर झपाटलेले नव्हते.घरात भुते राहात नव्हती.आपण उगीचच घाबरत होतो .आपण त्यांना मदत करायला हवी होती.वगैरे गोष्टी आता त्यांच्या मनात येवू लागल्या होत्या .आपले चुकलेच असे त्यांना  वाटत होते .अापण धावून गेलो असतो तर कदाचित तात्यांच्या कुटुंबातील काही मंडळी तरी आपण वाचवू शकलो असतो .आपण एवढे शूर ,प्रसंगावधानी, आपल्याला त्या प्रसंगी काहीच कसे सुचले नाही .ते त्यांना कळेना .ते स्वत:ला दोष देऊ लागले .

आपण पळण्याचा प्रयत्न केला तेव्हा बेड्याच्या बाहेर जावू शकत नव्हतो ते कां हा विचार आता त्यांच्या डोक्यात आला नाही .

एकदा त्यांना आपण या लफड्यात न पडता सकाळ झाल्यावर सरळ निघून जावे असे वाटले.परंतु असे करणे योग्य होणार नाही .एक जबाबदार नागरिक म्हणून पोलिस चौकीवर जाऊन आपण रिपोर्ट केले पाहिजे .आपली ही जबाबदारी आहे .याची जाणीव त्यांना झाली .

आणखी एक विचार  त्यांच्या मनात आला.आपण तसेच पळून गेलो तर आपणच अपराधी खुनी म्हणून आपल्याला पकडले जावू शकते .अर्थात पोलीस आताही आरोप ठेवून पकडणार नाहीत असे नाही .

तुम्ही कुठून आलात ?कुठे निघालात? त्या घरात का आणि कसे पोचला?तुम्हीच त्यांचा खून केला नसेल कशावरून?हा प्रश्न पोलीस विचारातील. पहिले संशयित म्हणून आपल्याला जाऊ देणार नाहीत .हे त्यांच्या लक्षात आले .

एकूण अापण मोठ्या चक्रव्यूहात  गुंतलो आहोत.  काहीही केले तरी आपली सुटका नाही .हे त्यांना कळून चुकले .

*पहाटे त्यांनी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला.त्यांना बेड्याच्या बाहेर जाता आले नाही.*

*रात्रीचा सापळा अजूनही मजबूत होता.*

*सूर्योदय झाल्याबरोबर बंध सुटला.सापळा उघडला . ते दोघे बाहेर पडू शकले.*

*बाहेर पडल्याबरोबर त्यानी लगेच  जवळच्या पोलिस स्टेशनची चौकशी केली .*

*दोघेही पोलिस स्टेशनमध्ये पोहोचले .*

(क्रमशः)

८/२/२०२०©प्रभाकर  पटवर्धन 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
हमारे टेलिग्राम ग्रुप से जुड़े। यहाँ आप अन्य रचनाकरों से मिल सकते है। telegram channel