त्या रात्री ती झोपू शकली नाही आणि रात्रभर तळमळत राहिली. पुन:पुन्हा डामरनाथ कापालिक याची गंभीर मुद्रा तिच्या नजरेसमोर येत होती.डामरनाथाची अवस्था काही वेगळी नव्हती.त्यालाही रात्रभर झोप येत नव्हती. वैजयंतीचे रूप त्याच्या डोळ्यासमोर पुन:पुन्हा येत होते.

दुसऱ्या दिवशी संन्यासी डामरनाथ पूर्ण एकाग्रतेने आरती करत होता. पण त्याने नक्की आरती कोणाची केली?  समोर होती ती कालरात्री चामुंडा देवीची मूर्ती नव्हती. त्याला समोर वैजयंती देवी दिसली, पुन:पुन्हा डोळे चोळत तो देवीच्या मुर्तीकडे एकटक पाहत होता. पुन:पुन्हा वैजयंती देवीची मुर्ती डोळ्यासमोर यायची. त्या तरुण संन्याशाला काय झाले होते माहित नाही, त्याला स्वतःलाही समजू शकले नाही. पूजा आरती संपवून तो पंचमुंडीच्या आसनाच्या दिशेने निघाला. तिथे एकांतात बसून मूकपणे ओक्साबोक्षी रडला.

“मला काय झाले आहे? देवी माझी परीक्षा घेत आहे कि मला फसवत आहे?”

डामरनाथ आयुष्यभर ब्रह्मचर्याचे पालन करणारा त्यांच्या गुरूंचा सर्वोत्तम शिष्य होता. विचित्र अशी मानसिक पतन अवस्था तो अनुभवत होता. मग तो पंचमुंडीच्या आसनावरून परतला आणि आजारी असलेल्या गुरुदेवांच्या पलंगाजवळ जाऊन बसला. गुरूंचे पाय धरून तो खूप रडला आणि म्हणाला,

“गुरुदेव, कृपया मला या मंदिराच्या जबाबदारीतून मुक्त करा.”

“ते होऊ शकत नाही, वत्सा. तुला ही परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. जर तू या परीक्षेत उत्तीर्ण झालास तर तु खरा साधक आहेस. एवढे जाणून घे की वैजयंतीच्या फुलांमुळे देवीमध्ये प्राणप्रतिष्ठा झाली होती.”

"मी सर्व ऐकले आहे गुरुदेव. पण मला क्षमा करा. मी हिमालयातल्या निर्जन मठात निघून जातो."

"डामरनाथ, ते शक्य नाही."

असेच दिवस जात राहिले.

एके संध्याकाळी डामरनाथ पंचमुंडीच्या आसनावर बसून श्याम संगीत छेडत होता, धुपद गायला आणि अचानक वसंत ऋतूचे आगमन झाल्यासारखे झाले. नकळत तो विरह कातर राधिकेची गवळण गायला आणि नंतर मीरेचे भजन.त्याचे चित्त कोणत्याच साधनेत स्थिर नव्हते. असे अनेक दिवस चालू होते.

असाच एक दिवस गायनाचा रियाझ सुरु असताना अचानक गरम पाण्याचा स्पर्श पायांना झाला आणि त्याला धक्काच बसला. त्याच्या पायाभोवती दाट काळेभोर केस होते? वैजयंती देवी त्याचे दोन्ही पायांना मिठी मारून रडत होती. संगीताच्या धुंदीने वैजयंती व्याकूळ झाली होती. त्या गीताने तिच्या मनातील सुप्त जाणीव जागृत केली होती.

"चला वैजयंती देवी, मध्यरात्र झाली आहे.”

"जाते. पण जाण्याआधी तेच गाणं पुन्हा एकदा ऐकवा, डामरनाथ. कृष्णाच्या वियोगामुळे कातर राधेची व्याकुळता..”

डामरनाथला धक्का बसला. वैजयंती त्याच्या साधनेत व्यत्यय आणण्यासाठी का आली आहे? आणि पुन्हा पुन्हा का येते? रागाने वेगात पावलं टाकत तो मंदिरात गेला. त्याने दरवाजा आतून लावून घेतला. महामायेच्या आसनावर डोके आपटून तो म्हणाला...

“हि अशी कसली सत्वपरीक्षा घेत आहेस, आई! सर्व रिपूंवर विजय मिळविलेल्या डामरनाथ कापालिकाचा पराभव केल्यावरच तुला समाधान मिळेल का? परमसन्यासी तंत्रसाधक कलिमलनाथ यांचा सर्वोत्तम मंत्र दीक्षा घेतलेला मी शिष्य आहे. त्यांना माझा अभिमान आहे. आई जगज्जननी, मला बळ दे.”

हळूहळू गावात कुजबुज सुरू झाली. ही बाब मोठ्या सरकारांच्या कानावरही गेली.

“मात्र, वैजयंती देवी असे वागेल यावर आमचा विश्वास बसत नाही, ती संपूर्ण राज्याची इष्टदेवता आहे. तिच्याबद्दल असे म्हणणे मन मान्य करत नाही.” मोठे सरकार

"महाराज, घटना खरी आहे. दररोज मध्यरात्री तर कधी कधी सकाळपर्यंत राणी वैजयंती पंचमुंडी आसनावर ध्यानस्थ बसलेल्या डामरनाथाच्या चरणांजवळ बसलेली असते.” बळी, त्यांचा जवळचा सेवक म्हणाला.

क्रमश:

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Listen to auto generated audio of this chapter
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel