**नेहपान ग्रह (४८४ लक्ष प्रकाशवर्षे दूर)**
**नगरनायक वीर नवकोट नेहपान यांचा राजवाडा. **
तिचे सौंदर्य अस्मानी ताऱ्यांपेक्षा वरचढ होते. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच आकर्षकता होती ज्यामुळे तिच्या चेहऱ्यावर नजर पडताच ती इतर दुसरीकडे हटवणे अवघड होते. उपस्थित पाचशे लोकांच्या गर्दीमध्ये प्रत्येक व्यक्ती तिच्याच चेहऱ्याकडे एकटक पाहत होता. पण तिचे लोभस बाहुलीसारखे दिसणारे डोळे मात्र कोणाच्यातरी शोधात आहेत हे मात्र कोणालाच ठाऊक नव्हते.
“ एक्सक्यूज़ मी, तू मला ओळखलेस का? मी तुमच्या आजोळचा शेजारी...तुर्वसू.....” एक सुंदर तरुण तिच्याकडे आला आणि म्हणाला. पण तिने त्याला साधी ओळखही दाखवली नाही याउलट तिने त्याला पाहून न पहिल्यासारखे केले आणि ती निघून गेली.
“ तुलापण तिने फाट्यावर मारले न?” तुर्वसूचा मित्र त्याला म्हणाला.
“खूपच माजल्ये आधी अशी नव्हती ही..”
“ साहजिक आहे.. ती नगरनायकाच्या मर्जीतल्या सल्लागाराची सुकरात यांची मुलगी आहे.”
“अच्छा बरं. मग ती आता माझ्याशी पूर्वीसारखी बोलायचा काही संबंधच नाही.” असे म्हणून तुर्वसू दुसरी कोणी पटते का हे पाहू लागला.
इतक्यात हंसरेखेचे डोळे चमकले. ती इतका वेळ ज्याची वाट पाहत होती ती व्यक्ती मुख्य द्वारातून प्रवेश करत होती. त्या तरुणाला पाहून तिचे हृदयाचे ठोके वाढले होते.
“ हे काय रे अजातरिपू? मी कितीवेळ तुझी वाट पाहत होते.” हंसरेखा त्याच्याजवळ जाऊन लटक्या रागाने म्हणाली.
“ अगं सॉरी. मी नगरनायकांसाठी भेटवस्तू खरेदी करत होतो.” अजातरिपु आपल्या हातातील खोका दाखवत म्हणाला.
“...आणि माझ्यासाठी भेटवस्तू?” हंसरेखेने हसत हसत विचारलं.
“ तुझा वाढदिवस पुढच्या महिन्यात आहे ना? तेव्हा मिळेल तुला काहीतरी.” अजातरिपुने अत्यंत बेफिकीरपणे उत्तर दिले. यावर हंसरेखेने त्याला रोखून पहिले.
पुढे ती काहीतरी बोलणार इतक्यात कोणीतरी माईकवर नाकातल्या आवाजात बोलू लागले त्यामुळे सर्वजण गप्प झाले. नगरनायक काहीतरी उद्घोषणा करत होते. नगरनायक त्यांच्या विशिष्ट स्थानावर आले. सर्वांनी त्यांचा जयजयकार सुरु केला.
काही वेळात हा जयजयकार थांबला कारण नगर नायकांचे खास सल्लागार सुकरात भाषण देण्यासाठी आपल्या जागी उभे राहिले.
“ माझ्या प्रिय नागरिकांनो आज आपण येथे आपले प्रिय नगरनायक वीर नवकोट नेहपान यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी एकत्र आलो आहोत. आजच्या या मेजवानीचा आपण यथेच्छ आस्वाद घ्या.” सुकरात
त्यांचे भाषण समाप्त होताच पायांना ताल धरण्यास भाग पाडणारे संगीत सुरु झाले आणि प्रत्येकजण आपापल्या परीने नृत्य करू लागले.
“ आपले नगरनायक आज किती वर्षांचे झाले आहेत?” अजातरिपूच्या बाजूला उभ्या असलेल्या हंसरेखेने विचारले.
“ तीनशे अठ्ठेचाळीस वर्षांचे!” अजातरिपू
तसेही नेहपान ग्रहावर तीनशे अठ्ठेचाळीस वर्षे वय असणे काही नवीन गोष्ट नव्हती कारण लोकांचे सरासरी वयच पाचशे वर्ष होते. नेहपान ग्रह सहस्त्रकोष्टक आकाशगंगेच्या एका कोपऱ्यात स्थित एका तारा मंडलातील २२ वा ग्रह होता.
क्रमश: