“हा श्लोक वगैरे ठीक आहे पण याचं नक्की म्हणणं काय आहे?" डॉ.सोनाली पर्रीकर म्हणाल्या.
अनंत महाकाल क्षणभर गप्प बसला आणि मग कोणतीही पूर्वसूचना न देता, तिथे उपस्थित लोकांच्या अपेक्षेविपरीत तो अचानक जागा झाला.
अनंतच्या जवळ बसलेल्या डॉ.सोनाली पर्रीकर घाबरल्या आणि दचकल्या. त्याच्यापासून दूर जाण्याच्या प्रयत्नात त्या त्यांच्या खुर्चीवरून खाली पडल्या. खोलीतील इतर सर्वजण सुद्धा आश्चर्यचकित झाले.
डॉ.सोनाली पुरत्या गोंधळून गेल्या होत्या
“हे कसं शक्य आहे? अजून एक तासही उलटून गेला नाही, हा माणूस अचानक कसा काय भानावर आला?”
त्यांनी आजवर ३०० हून अधिक असे रुग्ण हैंडल केले होते. या अनुभवानुसार, आजपर्यंत कोणतीही व्यक्ती शारीरिक अस्वस्थतेशिवाय इतक्या लवकर संमोहन निद्रेतून जागृत झाली नव्हती.
डॉ.मेहता यांनाही तितकाच धक्का बसला होता. त्याच्या औषधांबद्दलच्या ज्ञानावरून हे निश्चित होते कि नार्कोच्या औषधांचा डोस दिल्यानंतर ८ तास तरी रुग्ण शुद्धीवर येऊ शकत नाही. त्यांचा अभ्यास आणि इतक्या वर्षांची प्रॅक्टिस या सर्व पॅरामीटर्सचा काही मेळ बसत नव्हता. KGB लाही तिची भीती लपवता आली नाही. नक्की काय सुरू आहे ते त्यांच्यापैकी कोणालाच समजले नाही!
अनंत महाकाल स्वत:ला मुक्त करण्याचा प्रयत्नही करत नव्हता. त्याने स्थितप्रज्ञपणे विचारले,
“मला इथे का आणले आहे? तुम्हाला काय हवे आहे?” तो काहीसा निराश दिसत होता.
सोनाली पर्रीकर यांनी त्याच्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही. त्यांनी डॉ. चंदावरकरांकडे एक नजर टाकली. अनंतने हि त्यांच्याकडे पाहिले.
"तुम्ही येथे आहात कारण आम्हाला काही उत्तरे हवी आहेत. आम्हाला काय हवे आहे? काहीही नाही. फक्त तुमच्याकडे असलेली माहिती तेवढी आम्हाला हवी आहे .” डॉ.चंदावरकर यांनी आपल्या विशिष्ट शैलीत उत्तर दिले.
"तुम्हाला माझ्याबद्दल कितपत माहिती आहे?" अनंतने विचारले.
“वेsssल, सध्या फारसं काही नाही. फक्त अनंत महाकाल ही तुमची खरी ओळख नाही. तुम्ही सदाभाऊ बागडे आणि संजय यांना ओळखता. विदुर आणि विष्णूगुप्त ही इतर दोन खोटी नावे तुम्ही वापरता. इतकच.”
अनंत महाकालने डोळे घट्ट मिटले आणि त्याच्या चेहऱ्यावर दुःखाची लाट पसरली.
आता मात्र डॉ. चंदावरकर यांचा संयम संपला होता. ते आधिकारिक स्वरात म्हणाले
“माझे नाव डॉ. वैजनाथ चंदावरकर आहे. मी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स कम्युनिकेशन अँड इन्फॉर्मेशन रिसोर्सेसचा सेवा निवृत्त शास्त्रज्ञ आहे आणि आता मी या टीमचे नेतृत्व करत आहे.”
"तुम्ही कोण आहात हे मला माहीत आहे!" अनंत उत्तरला.
डॉ.मेहता अनंतला इंजेक्शन टोचण्यासाठी त्याच्या जवळ गेले.
अनंतने सुरुवातीला विरोध करण्याचा प्रयत्न केला आणि गरजला
“मी सोडियम पेंटोथल, स्कोपोलामाइन, सोडियम अमिटल या सर्व औषधांना इम्यून आहे. हि औषधे तुम्हाला जास्त वेळ कामी येणार नाहीत."
बेशुद्ध होण्यापूर्वी अनंतचे हे शेवटचे शब्द होते. त्याचा मोठा आवाज ऐकून दोन रक्षक त्याला धरायला आले.
नारको टेस्ट मध्ये वापरल्या जाणाऱ्या औषधांची नवे अनंतच्या तोंडून ऐकून डॉ. मेहता आश्चर्यचकित झाले. मात्र ते काही रीएक्ट झाले नाहीत. डॉ.सोनाली पर्रीकर यांनी अनंतवर ताबा मिळवण्यासाठी त्याच्याकडे पाहिले.
डॉ. सोनाली निवांतपणे त्याच्या समोर बसल्या आणि त्याच्या डोळ्यात खोलवर पाहत होत्या. डॉ सोनाली पर्रीकर यांच्या सुंदर डोळ्यांमध्ये जादू होती, एक वेगळीच शक्ती होती कोणत्याही व्यक्तीला संमोहित करण्याची. त्यांनी डोळे स्थिर ठेवले पापण्यांची आजीबात हालचाल न करता गोड आवाजात म्हणाल्या
“ तुम्ही आता माझी आज्ञा पाळणार आहात. शांत बसून राहा.”
असे म्हणून त्यांनी अनंतच्या खांद्याला स्पर्श केला. त्याने अंग टाकले होते तो एका बाजूला कलंडला.
“मला माहीत आहे तुम्ही कोण आहात!” ते विचित्र शब्द डॉ. चंदावरकरांच्या मनात अजूनही रुंजी घालत होते. डॉ चंदावरकर आश्चर्याने स्वत:शीच पण मोठ्याने म्हणाले
“HOW IS THAT POSSIBLE...”
“काय?” डॉ. पर्रीकर
" नाही…. काही नाही. हा पुन्हा चौकशीसाठी तयार आहे का?" डॉ. चंदावरकर यांनी विचारले.
डॉ. मेहता एका उपकरणाची स्क्रीनवर काहीतरी वाचून म्हणाले,
“नो नो. अजून नाही सर.”
"तो काय बडबडत होता?" KGB ने विचारले.
"काहीतरी संस्कृत मध्ये बोलला तो" रोहिदास म्हणाला.
डॉ. रोहिदास शितोळे हा ३८ वर्षांचा माणूस होता जो महाराष्ट्रातील कुसवडे नावाच्या गावातून आला होता. तो स्वभावाने अंतर्मुख होता. त्याने भारतीय इतिहास या विषयात पीएचडी प्राप्त केली होती. त्याचे त्याच्या विषयाचे ज्ञान सखोल होते, परंतु विचार व्यक्त करण्यासाठी जो आत्मविश्वास गरजेचा असतो तो त्याच्यात नव्हता. त्याच्या आत्मविश्वासाच्या कमतरतेचे कारण म्हणजे त्याचे बोबडे बोलणे, जे त्याच्यासाठी इतरांसोबत जुळवून घेण्यात सर्वात मोठा अडथळा होता आणि म्हणूनच लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करायचे. त्याच्या मौनामुळे त्याच्या असण्याने किंवा नसण्याने काहीही फरक पडत नसे.रोहिदास साधारण ५ फूट ७ इंच उंच होता. त्याची त्वचा सावळी आणि तुकतुकीत होती. त्याला एक छान ठसठशीत अशी मिशी होती. त्याने काळी जीन्स आणि तपकिरी रंगाचा चेक्सचा शर्ट घातला होता. पायात ट्रेकिंगचे खाकी शूज होते. त्याचे डोळे आणि केस दोन्ही काळे काळे होते. आणि त्याने केसांना खोबरेल तेल लावलेले होते. त्याच्या निरागस बोलण्यामुळे त्याला टीममध्ये हवे तसे महत्त्व दिले गेले नव्हते.
"संस्कृत भाषा? आजकालच्या जगात संस्कृतमध्ये कोण बोलतो?” KGB म्हणाली.
"तो." रोहिदास अनंत महाकालकडे बोट दाखवत म्हणाला.
"हो, पण आजकाल त्याची भाषा समजून घ्यायला कोणाला वेळ आहे?" KGB
"माझ्याजवळ." रोहिदास पुन्हा उत्तरला.
"सुषेण" अभिषेक हळूच स्वतःशीच पुटपुटला. तो कसलातरी विचार करत होता.
"काय?" KGB ने विचारले.
"नाही नाही...काही नाही." अभिषेक भानावर येत म्हणाला.
KGB म्हणाली “नाही, आता जस्ट त्या माणसाने सांगितलेलं नाव मी तुझ्या तोंडून ऐकलं. काय आहे ते? come again”
अभिषेकने उत्तर दिले, “सुषेण”
"हो हो , तेच ते. हे काय नाव आहे, मला याचा अर्थ सांग." KGB
या संभाषणात आता रोहिदास सामील झाला.
“ सुषेण हे अगदी क्वचितच वापरले जाणारे नाव आहे. माझ्या माहितीनुसार, सुषेण हे 'रामायणातील एका वैद्याचे नाव होते. लंकेचा राजपुत्र मेघनाद याच्याशी झालेल्या युद्धात प्रभू श्रीरामाचा धाकटा भाऊ लक्ष्मण जखमी झाला होता. तेव्हा त्याला संजीवनी नावाची औषधी दिली ती सुषेणने मागवली होती जी शोधणे फार कठीण होते. ती फक्त हिमालय पर्वत भागातच सापडत असे. सुषेण याच्या सल्ल्यानुसार श्रीरामाने हनुमानाला संजीवनी घेऊन येण्याची आज्ञा केली होती. हिमालय पर्वतावर पोहोचल्यानंतर, हनुमानाला संजीवनी वनस्पती आणि इतर औषधी वनस्पतींमध्ये ओळखता आली नाही आणि म्हणून त्यांनी संपूर्ण पर्वत आपल्या खांद्यावर घेऊन कन्याकुमारीच्या दिशेने उड्डाण केले, जेणेकरून सुषेण स्वत: ती ओळखू शकेल.”
“हो, मी ते पौराणिक चित्र पाहिले आहे. ज्यात हनुमान पर्वत खांद्यावर घेऊन उडतो.तेच ना ?"
"होय, पण रामायणात सुषेण याचा मृत्यू कसा झाला उल्लेख वाचल्याचं मला आठवत नाही."
“या माणसाबद्दलची प्रत्येक गोष्ट विलक्षण आहे. मी यापूर्वी पाहिलेले कोणतेही पेशंट हे असे नव्हते." डॉ.सोनाली पर्रीकर स्वत:शीच विचार करत हरवल्या होत्या.
मनातले विचार थांबवून त्या चंदावरकरांकडे वळल्या आणि त्यांनी नम्रतेने त्यांना विचारले,
“सर, आपण नक्की कोणत्या हेतूने तपास करत आहोत हे आपल्याला स्पष्टपणे कळायला हवे? नाही का?”
प्रत्येकजण उत्तराच्या अपेक्षेने डॉ. चंदावरकरांकडे पाहू लागला.
"तुम्ही इथे त्यासाठीच आहात." डॉ चंदावरकर म्हणाले,
"म्हणून, तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा आणि त्याबद्दल जास्तीत जास्त जाणून घेण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आम्हालाही आपण काय करत आहोत अधिक चांगल्या प्रकारे समजू शकेल!" डॉ.चंदावरकर डॉ.सोनाली यांच्याकडे रोखून पाहत म्हणाले.
त्यांचा स्वभाव अतिशय उद्धट होता आणि डॉ.सोनाली पर्रीकर यांच्या चेहऱ्यावरील भाव पाहता त्यांना त्यांचे हे वागणे आवडले नाही हे स्पष्ट जाणवत होते. नाईलाजाने सर्वजण परत कामाला लागले.
क्रमश: