ती सूर्यप्रकाश नसलेली जुलै महिन्यातील पावसाळ्यातील सकाळ होती. दहा वाजले होते. उभ्या रेषांचा हिरवा टीशर्ट आणि करड्या रंगाची जीन्स अशा पेहरावात "दामोदर दूधखुळे" हा महाराष्ट्रातील एका प्रसिद्ध हिल स्टेशनवरील "मज्जा पॉइंट" जवळ असलेल्या संरक्षक कठड्यावर निवांतपणे हात ठेऊन समोरचे निरीक्षण करत उभा होता. नुकताच पाऊस पासून गेलेला होता. आजूबाजूचे छोटे मोठे धबधबे वाहते झाले होते.
कॉलेज तरुण तरुणी, फॅमिली सर्वजण पर्यटनाला आलेले होते. आधीच लाँग विकेंड आणि त्यात आज रविवार असल्याने जास्त गर्दी होती. मोबाईल फोनमध्ये सेल्फी काढायची आणि ओठांचा विविध पद्धतीने चंबू करण्याची नुसती चढाओढ लागलेली होती.
मुली आपल्या सुंदर चेहऱ्याचा आकार नाक आणि ओठ वेडावून, वाकवून, गाल फुगवून किती जास्तीत जात पद्धतीने विचित्र आकारात रूपांतरित करता येऊ शकतो याचे जिवापाड प्रयोग करत होत्या. घोड्यावर रपेट मारणाऱ्यांची सुद्धा खूप गर्दी होती. रपेट मारल्यानंतर काही मुली घोडयासोबत सेल्फी काढत होत्या. एवढे बरे की, त्या घोड्याला ओठांचा चंबू करायला सांगत नव्हत्या.
सारखा घड्याळात बघत दामोदर मनाशी म्हणत होता, "कामिनीला उशीर का झाला? केव्हा येईल ती? एक तर चंद्रचूड साहेब आज पहिल्यांदा आम्हा दोघांना महत्त्वाचे काम सोपवणार आहेत आणि कामिनी? तिला काही प्रसंगाचं गांभीर्यच दिसत नाही! ती यायच्या आत ते आले तर?"
तेवढ्यात आकाशी निळी सलवार कमीज घातलेली "कामिनी कुरकुरे" घाईने चालत येताना दिसली.
"काय, काकू मॅडम! एवढं वेळ लागतो का तयारी करायला? मुंबईचे लोक तर किती धडपडे असतात. आणि तू? कपडे घालून तयारी करायला एवढा वेळ लागतो?"
"अहो पुणेरी दादू सर! त्याचं काय झालं ना, की माझ्या पिवळ्या सलवार वर घाईत कॉफी सांडली! बदलावा लागला."
"काय? सकाळीच हॉटेलमधल्या तुझ्या रूमवर आपण सोबत नाश्ता केल्यावर एक मोठ्ठा कप भरून मी चहा आणि तू कॉफी घेतली होती ना? मग मी लवकर इकडे आलो तेव्हा तू तिकडे परत कॉफी मागवलीस? बहुत नाइन्साफी है ये! अगं, किती कॉफी पितेस?"
"जाम टेन्शन आलेलं रे, म्हणून घेतली! आज आपलं पाहिलं असाईनमेंट आहे ना!"
"जाम, घेतली, असले शब्दप्रयोग नको करत जाऊस गं! त्याचा अर्थ वेगळा होतो! आपण दोघे सर्व प्रकारच्या व्यसनांपासून आयुष्यभर दूर राहायचे ठरवले आहे ना! मग घेतली काय म्हणतेस? आणि जाम काय जाम? खूप म्हणायचे! काय तुम्ही मुंबईकर आणि तुमची मराठी!"
"कुठेही जोक नको ना मारू! आला मोठा मराठी भाषेचा कैवारी पुणेकर!"
"कैवारी म्हणजे? आहोच आम्ही पुणेकर मराठी भाषेचे काळजी वाहक, पोषक, रक्षक आणि चालक!"
"माझा मराठीचा क्लास नंतर घे! हां, आणि हे खरं आहे की सिगारेट, दारूसारख्या व्यसनांनी आयुष्याची राखरांगोळी होते! घेतली, बसलो, जाम, शेंगदाणे, फरसाण असे शब्द निघाले की आपल्या काही मित्रांना दारू शिवाय काही सुचत नाही!"
"करेक्ट! त्यापैकी काहींना आपण व्यसनापासून परावृत्त केलेसुद्धा!"
ते दोघे तिथून गर्दीमध्ये एका दिशेने चालायला लागले. दोघांनी फॉरेन्सिक सायन्समध्ये सोबत शिकून स्पेशलायझेशन केले होते. दामोदरने "बॅचलर्स डिग्री इन क्रिमिनोलोजी" तर कामिनीने "क्रिमिनल लॉ" मध्ये डिप्लोमा केला होता. विविध परीक्षा देऊन त्यांनी नुकतेच प्रायव्हेट डिटेक्टिव्हचे म्हणजे खासगी गुप्तहेर बनण्यासाठीचे रितसर लायसन्स मिळवले होते.
दामोदर म्हणाला, "अगं पण मला सांग! या दूधखुळ्या गुप्तहेराची ओव्हर स्मार्ट आणि कुरकुरीत साथीदार पहिल्याच कामात इतकी "जाम" टेन्शन घेईल तर कसं होणार आपलं? सोबत शिक्षण घेतलं, ट्रेनिंग घेतली. आता काम करायची पाळी आली तर टेन्शन? रिलॅक्स रहने का? ए क्या बोलती तू? आती क्या..."
"ए! आती क्या वाला! येऊन गेलो तरी आती क्या काय विचारतोस? तुला एक गुप्तहेर बनायचे आहे की फिल्मी हीरो हे एकदा ठरवून ठेव! नाहीतर इथे आगपेटी शोधावी लागेल!"
"नको! मला जीभ जाळून घ्यायची नाहीए!"
कामिनी हसायला लागली. त्याने टाळीसाठी हात पुढे केला. तिने टाळी दिली आणि म्हणाली, "बाय द वे, तू हॅट आणि कोट नाही घातलास?"
"कशासाठी घालायचं ते? लोकांना दाखवण्यासाठी की मी गुप्तहेर आहे? त्या वेशात लोक मला गुप्तहेर समजण्याऐवजी हंड्रेड डेज मधला खुनी जॅकी श्रॉफ समजून पोलिसांना बोलवतील! ह्या ह्या ह्या!"
"व्वा रे! जोक तर लई भारी मारतोस, पण समोरच्याला हसू पण आलं पाहिजे ना?"
"विनोद समजण्यासाठी आणि हसू येण्यासाठी सेन्स ऑफ ह्युमर पण असावा लागतो, काकू उर्फ कामिनी कुरकुरे! आहे का विनोदबुद्धी तुमच्यात?"
"विनोद तर माझा बालपणापासूनचा मित्र आहे. तो हुशार आहे आणि त्याला बुद्धी सुद्धा आहे!"
"चूप बस, ते बघ! ते आलेत समोर इन्स्पेक्टर!"
इन्स्पेक्टर "चंद्रचूड चावला" हे पंजाबी शिख होते. ते साध्या वेशात चालत येत होते. महाराष्ट्रात नोकरी करत असल्यामुळे त्यांना मराठी भाषा चांगली बोलता येत होती.
त्यांनी जवळच्याच एका रेस्टॉरंटमध्ये दोघांना चलण्याची विनंती केली. बाहेरच्या बाजूला रंगीत छत्र्यांचे छत असलेल्या बाकड्यांवर ते तिघे बसले. थोडा थोडा पाऊस सुरू झाला होता. मग चंद्रचूड यांनी "चहा कॉफी घेणार का" असे विचारले.
कामिनी "कॉफी घेणार" म्हणाली. दामोदरने तिच्याकडे "कमाल आहे!" अशा अर्थाने पाहिले.
दामोदरला "स्पेशल गवती चहा" म्हणजे "लेमन ग्रास टी" हवा होता. चंद्रचूड यांनी तशी ऑर्डर दिली. त्यांनी स्वतःसाठी फक्कड मसाला चहा मागवला.
इन्स्पेक्टर चंद्रचूड म्हणाले, "दामोदर! तसं पाहिलं तर नवख्या गुप्तहेरांना डायरेक्ट तपासकार्यात आम्ही सहसा सामील करून घेत नाही. पण, तुझ्या वडीलांची म्हणजे रिटायर्ड फेमस क्राईम रिपोर्टर, पत्रकार आणि प्रसिद्ध गुन्हेगारी कथालेखक श्री. सागर दूधखुळे यांची आणि माझी जुनी मैत्री. त्यांचे वय माझ्यापेक्षा जास्त परंतु त्यांनी ते कधी जाणवू दिले नाही. त्यांचा मान ठेवून मी तुम्हाला दोघांना हे काम देत आहे!"
"धन्यवाद सर! आम्ही त्याबद्दल आभारी आहोत. आम्हाला खूप उत्सुकता आहे. कृपया ते काम आम्हाला सांगा चंचल सर!", दामोदर.
"चंचल?"
"सहज कोड नेम दिले मी तुम्हाला. तुमच्या नावाचे शॉर्ट फॉर्म बनवले! पुढे भविष्यात आपल्याला बरे पडेल!", दामोदर.
कामिनीने दामोदरला हाताच्या कोपराने ढकलले आणि खुणेने "त्यांच्यासोबत गंमत करू नकोस" असे सांगितले.
हसत हसत चंद्रचूड यांनी दामोदरच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले, "तुस्सी बडा मजाक कर लेते हो जी दादू! हैं ना, काकू? वैसे तुम्हारे पिताजी को हम सब मित्रमंडली साधू कहते थे. शॉर्ट फॉर्म!"
आता मात्र तिघेही हसायला लागले.
इन्स्पेक्टर चंद्रचूड यांची साधी कार दूर उभी होती. त्यात ड्रायव्हर बसलेला होता. त्याला त्यांनी खुणेने "येतोच" असे सांगितले, आणि खिशातून घडी केलेला एक कागद दोघांना देत ते हळूच म्हणाले, "हा कागद पट्कन खिशात ठेव आधी! इथे भरपूर लोक आहेत! भिंतीनाही कान असतात आणि इथे भिंती नाहीत पण आजूबाजूला खरोखरचे शेकडो कान आणि डोळे आहेत. मानवी डोळे आणि कृत्रिम डोळे म्हणजे सीसीटीव्ही सुद्धा!"
दामोदरने तो कागद घडी न उघडता खिशात ठेवला.
मग अगदी कुणाला संशय येणार नाही आणि ऐकू येणार नाही इतक्या हळू आवाजात इन्स्पेक्टर चंद्रचूड यांनी सांगायला सुरुवात केली, "त्या कागदावर जग्गू टोपीवाला असे टोपण नाव असलेल्या अट्टल गुन्हेगाराचे चित्र आहे! विविध गुन्ह्यातील साक्षीदारांच्या वर्णनावरून ते चित्र एआयने बनवलेले आहे. तो शार्प शूटर आहे. हे चित्र मी मोबाईलवरसुद्धा तुम्हाला पाठवीन. पण प्रत्येक वेळेस तुम्हाला खात्री करण्यासाठी मोबाईल उघडून इमेज गॅलरीत बघावे लागू नये म्हणून प्रिंटसुद्धा आणली आहे. खिशातून पटकन कागद काढून बघणे सोपे जाते!"
"आभारी आहे सर!", दामोदर म्हणाला आणि "बघितलंस, याला म्हणतात तेज दिमाग!" अशा अर्थाने डोळे मिचकावत कामिनीकडे पाहिले, तिने मात्र "चंद्रचूडकडे लक्ष दे चुपचाप!" अशा अर्थाने त्याच्यावर डोळे वटारले.
पुढे इन्स्पेक्टर चंद्रचूड म्हणाले, "आमच्या खबरींच्या माहितीनुसार जग्गू इथेच या हिल स्टेशनवर आलेला आहे. या हील स्टेशनवर मुंबईतील एक प्रसिद्ध हिरे व्यापारी कुटुंबासोबत फिरायला आलेला आहे. हिंमत हिरालाल. तुम्ही दोघे ओळखत असेलच त्यांना!'
"हिंमत भाईंना कोण नाही ओळखत? टीव्हीवर अनेकदा दिसतात ते, बातम्यांमध्ये!", कामिनी म्हणाली.
"करेक्ट! त्यांच्यासोबत घातपात होण्याची शक्यता आहे अशी खात्रीलायक खबर आमच्या काही खबरींकडून कळाली आहे आणि तो घातपात जग्गू करणार असल्याची दाट शक्यता आहे. त्यांच्या जीवाला धोका असू शकतो. आम्ही सर्वजण साध्या वेशात पाळत ठेवून आहोतच. हिंमत हिरालाल यांना आम्ही याबद्दल कल्पना दिली नाही कारण त्यांची फॅमिली ट्रीप आम्ही उगाच खराब करू इच्छित नाही, पण त्यांचे जे दोन्ही पर्सनल बॉडीगार्डस आहेत, त्यांना आम्ही सांगितले आहे. आता तुम्ही दोघांनी एक काम करा. अतिशय गुप्तपणे कुणाला कळणार नाही अशा ठिकाणी तो कागदावरचा चेहरा बघा, लक्षात ठेवा. या सर्व परिसरात पाळत ठेवा. पण एक अट आहे. जग्गू कुठे दिसला तर तडक मला फोन करा. माझा नंबर तुझ्याकडे आहे. तुम्ही स्वतः कोणतेच पाऊल उचलायचे नाही. अशी कोणतीच गोष्ट करायची नाही की ज्यामुळे जग्गूच्या लक्षात येईल की, त्याच्यावर कोणीतरी पाळत ठेवते आहे. समजा तुमच्याकडून काही चूक झाली तर मी माझे अधिकार वापरून तुमचे डिटेक्टिव्हचे लायसन्स काढून घेईन. आले लक्षात?"
बघता बघता इन्स्पेक्टर चंद्रचूड यांचा असा कठोर आणि कडक अवतार बघून दोघांनीही आदरयुक्त भितीने आवंढा गिळला.
दामोदर पुढे म्हणाला, "पण मग ते हिंमत हिरालाल कुठे आहेत त्याबद्दल काही माहिती?'
"ते आलिशान विरभॉय बंगल्यात उतरलेत. पण, आता ते फॅमिलीसहित इथून जवळच असलेल्या मेलोडी मॉलमध्ये खरेदी करायला गेले आहेत. सोबत त्यांचे पर्सनल बॉडीगार्डसुद्धा आहेतच!"
"त्यांच्या फॅमिली मध्ये कोण कोण आहेत? आणि त्यापैकी इथे कोण कोण आले आहेत?"
"ती माहिती मी तुला व्हॉट्सॲप वर पाठवतो! आता मला जायला हवं! तुमच्या दोघांची मला मदत झाली पाहिजे, मात्र आमच्या कामात अडथळा यायला नको! तुमच्याकडून चूक झाली तर तुझे वडील माझे मित्र आहेत हे मी विसरून जाईल! हीच्याकडून चूक झाली तरी ती जबाबदारी तुझी असेल! मी आता मेलोडी मॉल मध्ये जातो आहे." मसाला चहाचा शेवटचा घोट संपवत ते म्हणाले आणि दोघांचा निरोप घेऊन रेस्टॉरंटचे बिल भरून ते निघून गेले.
गवती चहा पीत पीत दामोदर काहीतरी आठवण्याचा प्रयत्न करू लागला.
चहा पिऊन झाल्यानंतर दामोदर अचानक उठून उभा राहिला आणि म्हणाला, "आटप काकू लवकर, तुझी दिवसातली तिसरी कॉफी!"
"अरे माझ्या कॉफीने तुझं काय घोडं मारलंय? मोजतो कशाला? पिऊ दे की पूर्ण!"
"ठीक आहे. मी तोपर्यंत वॉशरूमला जाऊन येतो! पित बैस कॉफी."
दामोदर वॉशरूमला जाऊन आला आणि कामिनीला म्हणाला, "ऐक ना कामिनी! आपण जरा मज्जा पॉईंटवर जाऊन सेल्फी काढू आणि तुझ्या कॉफीने माझं जे घोडं मारलंय, त्या घोड्याला जिवंत करून त्यावर रपेट मारू. मॉलजवळच्या मैदानातील फन फेयर मध्ये जाऊन!"
"ए बाबा! काय विचार काय आहे? मला पळवून नेणार आहेस की काय घोड्यावर बसून? त्या अक्षय कुमार सारखे? मी नाही बसणार तुझ्यासोबत घोड्यावर!"
"अक्षय कुमार? हा मध्येच कुठून आला? अच्छा, अच्छा! पृथ्वीराज चौहान आणि संयोगिताबद्दल बोलायचे आहे का तुला?"
"हां रे"
"अक्षय कुमारचा पृथ्वीराज सिनेमा रिलीज झाला का OTT वर?"
"कधीच झाला. तू पाहिला नाहीस?"
"नाही. मी डिटेक्टिव्ह वाले चित्रपट आणि मालिका जास्त पाहतो, पुस्तक वाचतो. तू पण बघत जा! जसे दूरदर्शनवरची रजित कपूरची व्योमकेश बक्षी सिरियल, करमचंद, मर्डर ऑन ओरियंट एक्सप्रेस, डेथ ऑन द नाईल, हौंटिंग इन व्हेनिस आणि बरीच पुस्तके जसे अगाथा ख्रिस्ती, शेरलॉक होम्स वगैरे!"
"मी पण वाचले आहे लहानपणी फास्टर फेणे आणि आता पिक्चर पण पाहिलाय. अमेय वाघ. काय एक्टर आहे! लाजवाब! आणि अक्षय कुमार डिटेक्टिव्हच्या भूमिकेत किती शोभून दिसेल, नाही का? डिटेक्टिव्ह खिलाडी और दुनिया अनाडी, असा एखादा चित्रपट येऊ शकतो! हाउसफुल मधल्या बाला सारखा दिसणारा, मोठी पिळदार मिशी आणि टक्कल पडलेला डिटेक्टिव्ह!", असे म्हणून तिने टाळी साठी हात पुढे गेला. दामोदरने तिला टाळी दिली नाही आणि तो म्हणाला, "अर्रे! सध्या कोणतेही मूव्ही चॅनेल लावले की अक्षय कुमार दिसण्याचे चान्सेस 80 टक्के झाले आहेत. आपण या विषयावर आणि अक्षय कुमारवर नंतर डिटेल बोलू. तू वेगळ्या आणि मी वेगळ्या घोड्यावर रपेट मारू, मग तर झालं! मधूनच कोणता विषय कुठे घेऊन गेलीस?"
"तूच विषय भरकटवला आहेस. मी नाही. इन्स्पेक्टरांनी दिलेले काम करायचे सोडून तू कुठे निघालास घोड्यावर रपेट मारायला?"
"घोड्यावर बसून मस्तपैकी सेल्फी काढू आपण! चल लवकर!"
दोघेही आता रस्त्याने चालायला लागले. व्हॉट्सॲपचा नोटिफिकेशन टोन वाजला. दामोदरने पाहिले. इन्स्पेक्टरचा मेसेज आलेला होता. चालता चालता त्याने वाचला. कामिनीला दामोदरच्या चालण्याचा वेगाशी बरोबरी करणे कठीण जात होते.
कामिनी म्हणाली, "काय एक सारखं सेल्फी घोडा, सेल्फी घोडा करतोस रे? येडावलास का?"
"अगं, सांगतो नंतर. आधी आपण मस्तपैकी एक छत्री विकत घेऊ! पाऊस वाढत चाललाय."
त्या दोघांनी एक मोठी छत्री विकत घेतली, तिने दोघांच्या डोक्यावर छत्री धरली आणि ते दोघे "मज्जा पॉइंट" जवळ आले. समोर काही अंतरावर मेलोडी मॉल होता.
"ती मुलगी कुठे गेली? मैत्रिणींसोबत आली होती, इथे फिरायला! त्या तिथे सेल्फी काढत होती घोड्यासोबत आणि तिच्या दोन मैत्रिणींसोबत", इकडे तिकडे घाईने बघत दामोदर म्हणाला.
"काय? तू माझ्या आधी इथे मुलींवर लाईन मारण्यासाठी लवकर आला होतास?", कामिनी ओरडली.
"हो! जळतेस का?", तिची फिरकी घेण्यासाठी तो सहज हो म्हणाला, पण त्याची गहन नजर त्या समोरच्या गर्दीत त्या मुलीला शोधत होती.
तो पुढे जाऊ लागला आणि त्याचा चालण्याच्या वेगाशी पुन्हा कामिनी जुळवून घेण्याचा प्रयत्न करू लागली.
"मी कशाला जळते? माझा बॉयफ्रेंड आहे! अंधेरीत!", नाक तिरपे करत कामिनी म्हणाली.
"अरे वा? छानच! काय नाव त्याचं? मला कधी बोलली नाहीस?", हे तिला जरी दामोदर विचारात होता तरी त्याची नजर त्या मुलीला शोधत होती.
"का? तुला माझी प्रत्येक खासगी गोष्ट सांगितलीच पाहिजे का?", त्याच्या वेगाशी बरोबरी करत, दोघांच्या डोक्यावर छत्री धरत वेगाने चालत ती म्हणाली.
समोर जीन्स आणि लाल टीशर्ट घातलेली मुलगी तिच्या दोन मैत्रिणींसोबत हसत खिदळत चालली होती. त्या तिघी भिजल्या होत्या पण त्याची त्यांना अर्थातच पर्वा नव्हती.
कामिनीकडे पूर्ण दुर्लक्ष करत, त्याला समोर दिसलेल्या मुलीला हाक मारत दामोदर म्हणाला, "तीच ती! सापडली. हॅलो मिस, लाल टी शर्ट वाली मुलगी! अहो इकडे! शुक शुक!"
ओले लांब केस बाजूला करत तिन्ही थांबल्या आणि लाल टीशर्टवाल्या मुलीने साशंक नजरेने मागे पहिले आणि म्हणाली, "एक्सक्युज मी? तुम्ही मला बोलवताय का? कोण तुम्ही?"
"हो. जरा तुमचा मोबाइल दाखवा. मला तुम्ही काढलेले काही सेल्फी बघायचे आहेत!"
"अहो आश्चर्यम! एक तर अनोळखी मुलीला थांबवता आणि आणखी मोबाइलमधले तिचे सेल्फी बघायला मागता?" मग कामिनीकडे बोट दाखवत ती म्हणाली, "आणि तू गं! तुझ्या बॉयफ्रेंडला काय इतकी सूट देवून ठेवलीस? येणाऱ्या जाणाऱ्या कुणाही मुलीला थांबवून तिच्या सेल्फी बघायला मागतो आणि तू बघत काय उभी आहेस? त्याच्या थोबाडीत मार!"
आता कामिनी हसायला लागली, "एक तर हा माझा बॉयफ्रेंड नाही आणि ..."
"मग पती आहे का?", लाल टीशर्टवाली हसून म्हणाली.
"नाही ...", कामिनी पण आता तिच्याकडे खाऊ का गिळू नजरेने बघू लागली.
या दोघी एकमेकांच्या झिंज्या उपटून मारामारी सुरु करतील त्यापेक्षा आपण खरे काय ते सांगावे असे वाटून दामोदरने त्याचे गुप्तहेर लायसेन्स आपल्या पाकीटातून बाहेर काढले आणि ते त्या मुलीला दाखवत म्हणाला, "मी डिटेक्टिव्ह दामोदर दूधखुळे! ही डिटेक्टिव्ह कामिनी कुरकुरे!"
"कशावरून?"
"कशावरून म्हणजे? या कार्डवरुन! हे घ्या कार्ड चेक करा!"
तिघी आळीपाळीने कार्ड बघत म्हणाल्या, "हं! वाटते तर आहे की, कार्ड खरे आहे, पण तुम्हाला मोबाइल कशासाठी हवा आहे? म्हणजे आमचे सेल्फी कशासाठी बघायचे?"
"तुम्ही तिघी जरा थोडे त्या मोठ्या झाडाखाली येता का?"
आधी थोडी संशयाने एकमेकांकडे बघत शेवटी तिघी तयार झाल्या. मग ते पाचही जण जवळच्या मोठ्या झाडाखाली आले. कामिनीने छत्री बंद केली आणि चिखलात रुतवली.
खिशातून हातरुमाल काढत तिघींना दामोदर म्हणाला, "पुसता का याच्याने तुमचे डोके जरा? सर्दी होईल नाहीतर!"
"अहो तुम्ही तुमचे काम करा ना! नका आमची काळजी करू! आमच्या बॅगमध्ये आहेत टॉवेल! आम्ही सोबत आणलेले आहेत! आम्हाला आधी सांगा आमचे सेल्फी कशाला बघायचे तुम्हाला?"
"मी सर्वच माहिती तुम्हाला सांगू शकत नाही कारण ती सांगणे धोकेदायक आहे. परंतु एवढे सांगू शकतो की त्या सेल्फीमध्ये, जो तुमचा युनिफॉर्म घातलेला घोडेवाला होता तो तुमच्यासोबत सेल्फी घ्यायला आधी नाही म्हणत होता बरोबर?"
"बरोबर! पण तुम्हाला हे कसे माहिती? तुम्ही आमच्यावर नजर ठेवून होता की काय? तुम्ही डिटेक्टिव्हच आहात ना? की आणखी कोणी?"
"हे बघा डिटेक्टिव्ह लोकांना नेहमी समोर चाललेल्या गोष्टींचे, वस्तूंचे, व्यक्तींचे, घटनांचे बारकाईने निरीक्षण करावे लागते. विशेषतः आपल्या आसपास वावरणारे अनोळखी चेहरे आपल्याला बऱ्याच काही गोष्टी सांगून जातात. त्यांच्या जीवनाबद्दल, त्यांच्या भूतकाळाबद्दल आणि कदाचित ते पुढे जे काही करणार असतील त्या घटनांबद्दल सुद्धा! बॉडी लँग्वेजचा अभ्यास असावा लागतो त्यासाठी. देहबोली!"
"माहिती आहे. येतं आम्हाला तेवढं इंग्लिश. पुढे बोला!"
"मला संशय आहे की तो घोडेवाला खरा घोडेवाला नाही आणि तो गुन्हेगार असू शकतो. आम्ही एका संशयित गुन्हेगाराला शोधतो आहे. त्यामुळे आम्हाला तुमच्या मोबाईल मधली फोटो गॅलरी बघू द्या आणि तो घोडेवाला तुमच्या सेल्फित किंवा अनवधानाने जितक्या जितक्या फोटोत आलेला आहे ते सर्व फोटो पाठवा प्लीज आणि हे सुद्धा सांगा की तो घोडेवाला तुमची रपेट मारून झाल्यानंतर नेमका कुठे गेला?"
पिवळ्या टी-शर्ट वाली मुलगी म्हणाली, "हो मला सुद्धा तो थोडा गडबड वाटला होता. माझे नाव संगीता. ही लाल टीशर्ट वाली आहे जया आणि निळा टीशर्ट वाली आहे निशिगंधा!"
संगीता पुढे म्हणाली, "पण या दोघींनी माझ्याकडे दुर्लक्ष केले. आणि तो अधून मधून सारखा विचित्र नजरेने आमच्याकडे आणि बाकी सगळीकडे बघत होता. घोडा चालवण्याकडे लक्ष कमी आणि गर्दीमध्ये इतर ठिकाणी त्याचे डोळे भिरभिरत होते! पण ही जया ऐकत नाही. उठसूठ कुठेही, कधीही प्रत्येक ठिकाणी, भेटलेल्या प्रत्येक व्यक्ती सोबत सेल्फी काढत राहते!"
"असू द्या आता. पण त्यामुळे नकळत का होईना आमच्या तपासाला मदतच होणार आहे ना?", दामोदर म्हणाला.
आता कामिनीला समजले की, इन्स्पेक्टरने दामोदरला दिलेले कागदावरचे चित्र, ती कॉफी घेत असताना वॉशरुममध्ये जाऊन पटकन दामोदर बघून आला होता कारण तिथे सिसीटिव्ही कॅमेरे नसतात आणि या सेल्फीमध्ये नक्की घोडेवाला हा या जग्गू टोपीवाला सारखा दिसत असावा. आणि मी यायचे बाकी होते तेव्हा सकाळी दामोदरने याच माणसाला पाहिले असावे. आणि म्हणूनच वॉशरूम मधून आल्यावर घाईघाईने दामोदर मला इथे घेऊन आला.
तिघींनी आपापले मोबाईल अनलॉक करुन दोघांना दिले. दोघांनी गॅलरीतील फोटो स्क्रोल करून, ठराविक फोटो सिलेक्ट करून व्हाट्सअप ने दामोदरच्या आणि कामिनीच्या मोबाईलवर पाठवायला सुरुवात केली. विशेष म्हणजे प्रत्येक फोटोवर डेट, टाइम आणि लोकेशन स्टॅम्प होता, त्यामुळे तपास सोपा जाणार होता. तसेच इमेज क्वालिटी चांगली असल्याने बरेच झूम करून सुद्धा आजूबाजूच्या गर्दीतले अनेक चेहरे नीट स्पष्ट दिसत होते.
"फक्त प्लीज एक करा. आमचे फोटो पर्सनल आहेत. त्यांचा दुरुपयोग होणार नाही याची हमी आम्ही आम्हाला तुमच्याकडून पाहिजे."
कामिनीने दोघांचे व्हिजिटिंग कार्ड तिघींना दिले आणि म्हटले, "तशी हमी आम्ही देतो तुम्हाला. आमच्यावर विश्वास ठेवा आणि खात्री बाळगा. हे असूद्या तुमच्याकडे. या फोटोंचा उपयोग संपला की ते आम्ही आमच्या मोबाईलमधून डिलीट करू याबद्दल खात्री बाळगा!"
निशिगंधा म्हणाली, "माझे एक निरीक्षण आहे! तो घोडेवाला दोन जुळ्या मुलांकडे सारखे लक्ष ठेवून होता. दोन हट्टेकट्टे माणसंसुद्धा घोड्याच्या मागे मागे चालत होते, पण त्यांना ती मुलं ओळखत असावी असे वाटत होते."
मोबाईलमध्ये बघत बघत दामोदर म्हणाला, "हो, ते या फोटोमध्ये दिसते आहे. मला जी शंका होती ती खरी ठरते आहे!"
"कोणती शंका?"
"ते मी आत्ताच तुम्हाला सांगू शकत नाही. या कामिनीलासुद्धा ते अजून माहिती नाही. पण सगळं सेटल झाल्यानंतर आम्ही तुम्हाला सांगू. लागलं तर तुम्ही काही दिवसांनी आम्हाला कॉल करा. पण आत्ता नाही!"
तिघींनी संमतीदर्शक मान डोलावली.
त्यांचे मोबाईल दोघांनी परत दिले, त्यांना धन्यवाद म्हटले आणि बाय केले.
मातीत रोवलेली छत्री घेऊन, ती उघडून कामिनीने पुन्हा दामोदरच्या डोक्यावर धरत ते दोघेजण चालू लागले, आणि मोबाईल मधले फोटो आणि त्यांच्या काढलेल्या वेळेनुसार मनातल्या मनात विशिष्ट घटनाक्रम तयार करता करता दामोदर तिच्या सोबत चालू लागला, तेव्हा कामिनी म्हणाली, "आता मला कळलं की, तो घोडेवाला हा वेष बदलून आलेला जगू टोपीवाला असू शकतो, ज्याचे चित्र तू वॉशरूममध्ये जाऊन माझ्या नकळत पाहिले आणि दामोदर एक लक्षात ठेव. अनोळखी चेहरे वाचता तर आलेच पाहिजेत परंतु ओळखीचे चेहरेसुद्धा वाचले पाहिजेत. बरेचदा ओळखीचे चेहरे आपण गृहीत धरतो आणि त्यांची बॉडी लँग्वेज काय सांगण्याचा प्रयत्न करते आहे हे बघत नाही!"
"अरे वा! आज एकदम फिलॉसॉफी?"
"अरे, मी तुला हे सांगण्याचा प्रयत्न करते आहे की तू वॉशरुममधून परत आलास तेव्हा माझ्या ओळखीचा चेहरा म्हणजे तुझा चेहरा वाचून मी ओळखून घेतले की तू कागदावरचा जग्गूचा चेहरा पाहून आलास आणि मला अंदाज आलाच आहे की, हिंमत हिरालाल यांच्यासोबत घातपात होणार आहे याचा अर्थ त्यांना किंवा त्यांच्या कुटुंब सदस्याला सुद्धा धोका असू शकतो. म्हणजे त्यांच्या जुळ्या मुलांचं अपहरण सुद्धा होऊ शकतं! कारण पोलिसांचे खबरी अनेक असतात. काही खबरींकडे अर्धवट किंवा चुकीची माहिती असते, तर काहींकडे अचूक माहिती असू शकते. तर काहींकडे जुनी माहिती असू शकते. त्यामुळे आपण सगळ्या शक्यतांचा विचार केला पाहिजे. एकाच बाजूने विचार करून चालत नाही. आपण इथे येत असताना तुझ्या मोबाईलवर इन्स्पेक्टर आणि हिम्मत हिरालाल यांच्या कुटुंबाची माहिती पाठवताना नक्की त्यांना जुळे मुलं आहेत हे सांगितले असेल बरोबर?"
"झाली बुकिंग! कन्फर्म अगदी!", मोबाईलकडे बघत तो म्हणाला.
"कसली बुकिंग झाली? काय बोलतो आहेस हे? मी इतक्या पोटतिडकीने माझे विश्लेषण सांगते आहे आणि तू कसली बुकिंग करत होतास?"
दामोदर हसायला लागला आणि म्हणाला, "बुकिंग म्हणजे तू यापुढे माझी कायमची डिटेक्टिव्ह जोडीदार असणार याचं बुकिंग कन्फर्म झालं. कारण तू अगदीच अचूक ओळखले आहेस! मान गये आपको!"
"या गोष्टीवर पार्टी पाहिजे तुझ्याकडून!"
"पार्टी देईल तुला नक्की! पण आता या सर्व फोटोतून मी जो निष्कर्ष काढला आहे तो सांगू दे. ते जुळे मुलं आता घराच्या आकाराचे काचेचे बॉक्स असलेल्या गोल फिरणाऱ्या राईडमध्ये बसले आहेत. त्यांच्यामागे असलेल्या बॉक्समध्ये दोन बॉडीगार्ड आणि पुढच्या बॉक्समध्ये तो जग्गू टोपीवाला त्याच्या आणखी एका साथीदारासोबत बसला आहे. प्रत्येक फोटोत जग्गू सोबत एक झोळीसारखी पिशवी आहे. जग्गू जरी शार्प शूटर असला तरी यावेळेस तो कुणाला शूट करायला नाही तर किडनॅप करायला आलेला आहे आणि दोन बॉडीगार्ड मुलांपासून दूर जाण्याची तो वाट बघतोय. दोन बॉडीगार्ड मुलांसोबत आणि पोलीस मेलोडी मॉलमध्ये हिंमत हिरालाल आणि त्यांच्या पत्नीवर लक्ष ठेऊन असणार! आपण जो निष्कर्ष काढला आहे तोच पोलिसांनीसुद्धा काढलेला असणार. फक्त जग्गूसोबत त्याचा साथीदारपण आहे हे पोलिसांना माहिती नसावे. आता फक्त आपण चंद्रचूड यांना कॉल करून आपला निष्कर्ष सांगून मोकळे व्हायचंय!"
बोलता बोलता ते त्या राईड जवळ येऊन पोचले होते. राईड आणि इतर खेळ जिथे होते त्या भागात पाऊस लागू नये म्हणून वरच्या बाजूला उंचावर तात्पुरते पण भक्कम छत बांधलेले होते.
दामोदरने गर्दीपासून थोड्या दूर जाऊन इन्स्पेक्टरला कॉल केला आणि थोडक्यात सर्व काही सांगितले.
इन्स्पेक्टर चंद्रचूड म्हणाले, "बरोबर आहात तुम्ही. तुमचे खूप आभार. आणि अजून एक! पर्यटकांना खाली दरीमध्ये वाहत्या धबधब्याजवळ एक प्रेत मिळाले आहे ज्याची खबर नंतर आम्हाला मिळाली. ते प्रेत नक्की त्या ओरिजनल घोडेवाल्याचं असावं! एनी वे, तुम्ही आसपास रहा. मी साध्या वेषातील पोलीस फौज घेऊन येतो. लगेच आम्ही त्या दोघांना ताब्यात घेऊ!"
लवकरच पोलीस हिंमत हिरालाल आणि त्यांची पत्नी या दोघांसोबत तिथे आले. राईड ऑपरेटरला विनंती करून त्यांनी राईड वेळेआधीच थांबवली. जग्गू आणि त्याच्या साथीदाराला उतरतांना पकडणार तेवढ्यात ते शंका आल्याने पळू लागले.
दोन बॉडीगार्ड, दोन्ही जुळी मुलं, हिंमत हिरालाल आणि त्यांची पत्नी हे सर्व राईडजवळच थांबले आणि साध्या देशातील पोलिसांनी दोन्ही गुन्हेगारांचा पाठलाग सुरू केला. रस्त्यांवर पळापळ सुरू झाली. जवळ असलेली गर्दी दूर जाऊन पळाली.
कामिनी आणि दामोदरसुद्धा आवश्यक तेवढे अंतर ठेवून पोलिसांच्या मागे मागे पळू लागले. छत्री राईडजवळ राहिली.
सगळीकडे थोडा थोडा चिखल होता. वरून पाऊस पडत होता. पळताना सावध राहण्याची गरज होती. सगळेजण पळतांना मध्ये मध्ये साचलेल्या पाण्याच्या डबक्यातून शिंतोडे उडत होते.
जग्गू टोपीवाल्याने पळता पळता खांद्यावर लटकवलेल्या झोळीसारख्या पिशवीतून अचानकपणे स्निपर रायफल काढली आणि ती मागे वळून पोलिसांवर रोखली आणि झटकन एक गोळी झाडली.
चंद्रचूड यांनी ती गोळी शिताफीने चुकवली. पोलिसांना त्या दोघा गुन्हेगारांना मारायचे नव्हते, तर जिवंत पकडायचे होते, कारण हा सगळा घातपात नेमका कोणाच्या इशाऱ्यावर होणार होता, ही सगळी माहिती दोघांकडून काढायची होती. पण आता प्रसंग मोठा बाका होता.
इन्स्पेक्टर चंद्रचूड यांनी आपल्या होलस्टरमधून विद्युत वेगाने रिव्हॉल्वर काढली, जग्गूच्या रायफल धरलेल्या हातावर बरोबर नेम धरून गोळी मारली. रायफल त्याच्या हातातून खाली चिखलात पडण्यापूर्वी त्यातून आणखी एक गोळी निघून वरच्या दिशेने हवेत निघून गेली कारण दुसऱ्या गोळीसाठी जग्गू ट्रिगर दाबून चुकला होता.
जग्गू टोपीवालाचा साथीदार बग्गू टक्कलवाला हा ती जमिनीवर पडलेली रायफल उचलायला धावणार तेवढ्यात वेगाने त्या ताफ्यातील एका पोलिसाने ती उचलून आपल्या ताब्यात घेतली आणि बग्गूला जोराने लाथेने दूर ढकलले. तो कमरेला हात लावत कळवळत गडाबडा लोळत जाऊन दूर चिखलात जाऊन पडला. त्याचा पूर्ण चेहरा चिखलाने माखला. नंतर जग्गूच्या उजव्या पायाच्या गुडघ्याखाली चंद्रचूड यांनी गोळीबाराच्या दोन फैरी झाडल्या. त्यामुळे जखमी होऊन तोल जाऊन तो खाली पडला.
कामिनी आणि दामोदर तिथे आले. दोघांनी प्रामाणिकपणे त्यांना दिले गेलेले करियरमधले पहिले वहिले काम पार पाडले होते. थोडक्यात पोलीस आणि त्यांच्या टीमला भेटून चंद्रचूड यांच्या सांगण्याप्रमाणे दोघेजण आपापल्या रूमवर हॉटेलमध्ये निघून गेले. चंद्रचूड व पोलिसांची टीम उद्या त्यांना पुन्हा भेटणारच होती.
कामिनीने रात्री दामोदर सोबत जेवण केल्यानंतर आपल्या रूममध्ये जाऊन त्या तिन्ही मुलींचे सर्व फोटो आपले मोबाईल मधून डिलीट केले. फक्त गर्दीचे तिन्ही मुली नसलेले फोटो राहू दिलेत ज्यात जग्गू आणि त्याचा साथीदार होता.
आपल्या रूममध्ये रात्री झोपण्यापूर्वी दामोदर ते सर्व फोटो डिलीट करताना एका फोटोवर येऊन थांबला. त्याने तो फोटो झूम केला. तो फोटो निशिगंधाचा होता. ती त्याला आवडली होती. त्या तिघीजणी मला खरंच कॉल करतील का? केला तर निशिगंधाशी माझी भेट होईल का? हा विचार करत तो झोपेच्या अधीन झाला..