त्या बेटावर गेलो. चार-सहा महिने तेथे काम केले. तेथील मंडळी बरी वाटली. मी तुम्हांला आणण्यासाठी म्हणून एका गलबतात बसून आलो. तो तुमचे दर्शन नाही. ज्या बेटात तुम्ही राहत होतात, अकस्मात एका रोगाची साथ आली. शेकडो माणसे मेली. तुझी आई मेली असे कळले. तुझा पत्ता लागेना. मी निराश झालो. संसार माझ्यासाठी नाही असे वाटले. परंतु मरावे असे वाटेना. मी जगाचा यात्रेकरू झालो. पैशाची मला इच्छा नव्हती. परंतु लाखो रुपयेही न मागता, न इच्छिता मला काम मिळाले. अनेक धंदे केले. अनेक कारखान्यांत काम केले. कधीकधी वाचनालयात जाऊन वाचीत बसे. कधी शेतकरी प्रयोगात काम केले. या शास्त्राचे ज्ञान, त्या शास्त्राचे मला वेड लागले. ज्ञानाचे वेड, खगोलशास्त्राचा मी अभ्यास केला. आकाशातील तार्‍यांकडे मी दुर्बिणीतून रात्ररात्र बघत असे. हे मी सारे करीत होतो. परंतु माझा आत्मा कायमचा असा कशातच रमला नाही. सारे क्षणिक खेळ होते. माझ्या दु:खी निराश मनाच्या लहरी होत्या. परंतु मी व्यसनांकडे वळलो नाही. दुर्गुणांकडे वळलो नाही. माझे सारे नाद निरुपद्रवी होते ! ज्ञानाचे होते. विज्ञानाचे होते, तारे, वारे, फुले यांची मी कोडी उलगडीत होतो. या विश्वात रमू बघत होतो.

असे करता करता एकदा एक महत्त्वाची घटना घडली. मी एकटाच एका जंगलातून जात होतो. रात्र झाली. जंगलात एक जुनाट देऊळ होते. त्या देवळात मी झोपलो होतो. तो एक चोर माझ्या उशाखालचे गाठोडे सोडीत होता. मी जागा झालो. त्या चोराला मी पकडले. मी माझ्या देहाची काळजी घेत नसे. तरीही मी सशक्त होतो. त्या चोराच्या छातीवर मी बसलो.

'तुला पोलिसांच्या ताब्यात देतो. तुला असा धरून मीच नेतो.' मी त्याला म्हटले.

'मला सोडा. माझ्याजवळचे सारे घ्या. परंतु मला सोडा.'

'काय आहे तुझ्याजवळ ?'

'ही एक अंगठी आहे.'

'दे ती अंगठी. कोठून आणलीस ती ?'

'ती माझ्या आईजवळ होती. माझी आई एका खलाशाची बायको होती. एका बेटावर ती काम करीत असे. एकाकी साथ आली. शेकडो माणसे मेली, माझी आई, दुसर्‍या एका खलाशाची बायको, सारी आजारी होती. त्या दुसर्‍या खलाशाची बायको मेली. तिची लहान मुलगी होती. त्या खलाशाच्या बायकोच्या हातात अंगठी होती. तिच्याजवळ काही पैसे होते. 'माझ्या मुलीला तुम्ही सांभाळा' असे ती मरताना म्हणाली. तिने तिला ती अंगठी दिली. आईने तिच्या लहान मुलीचा सांभाळ केला. आईच्या नकळत तिच्या पेटीतील ही अंगठी मी चोरली. ही अंगठी मला आवडते. घ्या ही अंगठी, हया अंगठीला इतिहास आहे.'

'ती मुलगी कोठे आहे ? तुझी आई कोठे आहे ?'

'मला माहीत नाही. काही वर्षांपूर्वी मी घरी गेलो होतो. आईने माझे लग्न केले. मला एक मुलगा झाला. परंतु मी पुन्हा घर सोडले. चोरीचा धंदा मला आवडतो. एके ठिकाणी राहणे मला आवडत नाही. मी पुन्हा एके ठिकाणी लग्न केले. काही दिवस संसार केला. पुन्हा त्या पत्‍नीला सोडून मी जगाचा यात्रेकरू बनलो. नका, कठोरपणे माझ्याकडे बघू नका.'

'किळसवाणे आहे तुझे जिणे.'

'काही म्हणा; परंतु मला माझे स्वातंत्र्य द्या.'

'तुझ्या आईने ज्या लहान मुलीला वाढवले ती कुठे आहे ?'

'आमच्या गावातील एका आंधळया बाईने तिला आधार दिला. एकदा माझ्या आईने त्या मुलीला मारले. मिरी तिचे नाव. मिरी घरातून निघून गेली. म्युनिसिपालिटीच्या दिवे लावणार्‍याने तिला पाळले. पुढे तो मेला. तेव्हा आंधळीने तिला आधार दिला.'

'ती आंधळी आहे का जिवंत ?'

'सहा वर्षांपूर्वी तरी होती. तिचा म्हणे कोणी प्रियकर होता. त्याचे स्मरण करीत ती जगते. लोक तिला देवता मानतात. सोडा मला. तुम्ही सारे हे का विचारता ? तुम्ही कोण ?'

'मीही एक यात्रेकरू आहे.'

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel