शबरीच्या मनांत मृत्यूसंबंधी असेच विचार येत होते का ? त्या आश्रमांत ती आता एकटीच बसे; परंतु मनुष्य कितीहि विचारी असला, तरी त्याला पूर्वीच्या अनेक प्रेमळ स्मृति, शेकडो सुखदु:खप्रसंग आठवतात आणि त्याचें हृदय भरून येतें, नव्हे येणारच. शबरीचें असेंच होई. ती सकाळीं गोदावरीचें पाणी आणी. तथापि गोदेच्या तीरावर पाणी भरण्याऐवजी तिचा भरलेला हृदयकलश नयनद्वारा गोदेच्या पात्रांत रिता होई; परंतु मोरांच्या केकांनी ती सावध होई व जड पावलांनी आश्रमांत परत येई.
शबरींचे लक्ष्य आता कशांतहि लागेना. आश्रमांतील हरिणें, मोर, यांना तिने इतर आश्रमांत पाठवून दिलें व आपण एकटीच रानावनांत आता ती विचरत राही. झाडेंमाडें हे तिचे मित्र, पशुपक्षी हेच सखेसवंगडी. ती कधी सुंदर गाणी गाई, स्तोत्रें म्हणे; कधी आकाशाकडे पहात बसे, कधी हसे, तर कधी रडे. शबरी एक प्रकारें शून्यमनस्क झाली होती.
एक दिवस शबरी भारद्वाज ऋषींच्या आश्रमांत गेली होती. तेथे पुष्कळ ऋषिमंडळी जमली होती. बोलतांबोलतां भारद्वाज ऋषि म्हणाले, 'ऐकलेंत का ? अयोध्येच्या दशरथाचा प्रतापी पुत्र रामचंद्र, पित्याच्या वचनपालनार्थ राज्यवैभव सोडून बारा वर्षे वनवासांत घालविण्यासाठी निघाला आहे. त्याची पत्नी सीता व बंधु लक्ष्मण हींहि त्याच्याबरोबर आहेत. केवढें हें धीरोदात्त व त्यागमय वर्तन !'
दुसरे ऋषि म्हणाले, 'हेच परमेश्वराचे अवतार होत. परमेश्वराचें स्वरूप अशाच थोर विभूतींच्या द्वारा प्रकट होत असतें. केवढी सत्यभक्ति, केवढा त्याग !'
शबरी ऐकत होती. ती म्हणाली, 'खरेंच, पूर्वी गुरूदेवांनी मला असेंच सांगितलें होतें. 'जेथे जेथे विभूतिमत्व दिसेल तेथे तेथे परमेश्वर आहे, असें समज,' असें ते म्हणत. हा प्रभु रामचंद्र, त्याची पत्नी व त्याचा भाऊ सर्व वनवास पत्करतात, खरोखर देवांचेच हे अवतार-मला केव्हा बरें त्यांचें दर्शन होईल ? खरेंच, केव्हा बरें दर्शन होईल ?'
शबरीचे डोळे तेजाने चमकत होते. तपश्चर्येने, शोकाने व वयाने ती आता वृध्द दिसूं लागली होती. तिचे शब्द ऐकून ऋषि मोहित झाले; परंतु एकाएकीं शबरी तेथून 'कधी बरें रामचंद्र पाहीन ? कधी ती मूर्ति पाहीन ?' असें म्हणत वेडयासारखी पळत सुटली व बावरलेल्या हरिणीप्रमाणे रानांत निघून गेली !
"राम, राम, केव्हा बरें तो नयनाभिराम राम मी डोळयांनी पाहीन व त्याचे पाय माझ्या आसवांनी भिजवीन ? काय रे वृक्षांनो, श्रीरामचंद्राच्या येण्याची वार्ता तुमचा मित्र जो वायु, त्याने तुम्हांस कानांत सांगितली आहे का ? सांगा ना ! केंव्हा येईल तो रामचंद्र, केव्हा दिसेल ती सीतादेवी ?'