त्यांची राजकीय मतें व विचार जे लेखांत प्रदर्शित करण्यांत आलेले आहेत, ते केवळ विद्वत्तनिदर्शक नव्हते. ज्यावेळेस त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीस प्रारंभ केला त्यावेळेस ते खेडयांतील लोकांत वावरत असत. त्यांच्याबरोबर विचार करीत, त्यांच्या भावना समजून घेत. त्यांच्या उणीवा, त्यांची सुखद:खे त्यांची राहणी या सर्वांशी त्यांचा चिरपरिचय झाला होता. म्हणून त्यांचे राजकीय ज्ञान पुस्तकी नव्हते. तें अनुभवाच्या भक्कम पायावर उभारलें होतें. जनतेमध्यें जे खरे मत आहे तेंच सरकारच्या डोक्यांत उतरविण्यासाठी त्यांचे लिखाण असे. त्यांच्यापूर्वी राजकीय चळवळ अशी लोकांत नव्हती. शिशिरबाबूंनी काँग्रेसच्या पूर्वीच इंडियन लीग स्थापन करुन लोकांस विचार विनिमय करण्यास शिकविले. आपणांस काही राजकीय आकांक्षा आहेत. हक्क आहेत. एकंदर स्थिती कशी आहे, आपण कोठों वाहवत आहोंत या गोष्टींचा विचार करण्यासा शिशिरनें शिकविले. राजकीय गुलामगिरीची जाणीव. या गुलामगिरीपासून मुक्तता करुन घेण्याची महत्वाकांक्षा खरोखर शिशिरनेंच जागृत केली. आज ज्या कांही चळवळी निरनिराळया ठिकाणी दिसताहेत, त्या स्थापण्यास कारणीभूत असलेले जे कांही पुरुष होऊन गेले त्यांत शिशिरबाबूंची गणना आहे.
खरोखर ज्या वेळेस शिशिरबाबू कलकत्यास आहे त्या वेळेस त्यांना अनंत यंत्रांशी झगडावयाचे होते. या संकटाच्या ठिक-या उडवून आपल्या बुध्दीला व विचाराला मार्ग तयार करुन घेणें हें त्यांच्या सारख्या माणसांचे काम. येथे गबाळांना तें काय होय! त्यांनी जो मार्ग चोखाळला तो अशा स्वरुपाचा होता की तेणेंकरुन देश सुशिक्षित व्हावा. वर्तमानपत्रकार या नात्याने त्यांची फार मोठी थोरवी आहे. त्यांचा दर्जा फार वरचा आहे. स्वंतत्र बाणा, निर्भीड वृत्ती, धाडस, हिकमत प्रामाणिकपणा या सर्व गुणांची त्यांनी परीक्षा दिली. ते व्यक्तिचे बंदे गुलाम नव्हते. ते तत्वनिष्ठ व तत्वप्रिय होते. आपणांस प्रिय वाटणा-या व्यक्तिवरही ते कडक टीका करण्यास कसूर करीत नसत. जेथें जेथें अन्याय, जुलुम दृष्टोत्पतीस येईल तेथें तेथें त्या त्या अधिका-यांची खरडपटटी काढण्यास ते कमी करीत नसत. मग व्यक्ति केवढी का असेना, सार्वजनिक हिताचा प्रश्न आला की व्यक्ति ते बाजूला ढकलून देत असत. त्यांच्या लिहिण्यांतही विनोद व कोटी यांचे किरण इतस्तत:चमकत असत. ज्यांच्यावर टीका केलेली असावी.
त्यांनी ती विनोदपूर्ण मांडणी पाहून पोट भरुन हंसावे. एकंदर वस्तुस्थितीची खडा्न खडा माहिती ते गोळा करीत व मग लिहावयास घेत. साधें परंतु झणझणीत लिहिंणे ज्यांत मध्येंच उपरोध व विनोद ही मिसळून दिली आहेत. असे त्यांचे लेख केवळ निरुपम आहेत. त्याच्या तोडीचे थोडेच असतील. वरचढ तर विरळा!त्यांची देशभक्ति ही वरपांगी बोलघेवडी नसे. अगदी लहानपणी सुध्दां देशाच्या दीनदशेसंबंधीचे विचार त्यांच्या मनांत गोंधळ उडवून देत व त्यांत ते मग्न असत. त्याची देशभक्ती इतकी सोज्वल होती. इतकी बावन कशी होती कीं लोकांची कष्टप्रद स्थिती पाहून व ऐकून त्यांचे डोळयांत अश्रू उभे राहातांना पुष्कळानी पाहिलें आहे. हेच विचार परिपक्क झाले आणि स्वार्थाचा ससेमिरा कायमचा सुटला. देश व देशबंधू यांच्यासाठी आपला जन्म आपण वाहिला आहे असें त्यांनी मनांत ठरवून टाकलें. असा आयुष्याचा एकहि दिवस गेला नाहीं. ज्या दिवशीं त्यांनी देशांसंबधी विचार केला नाही. असा एकहि दिवस गेला नाही. कीं ज्यादिवशीं त्यांनी देशासाठी कांही लिहिलें नाही. लोकांची दु:खे हलकी होण्यासाठीं कांही काम केलें नाही. शिशिरबाबूंचे राजकीय जीवन इतक्या विविध प्रसंगानी सजलेलें आहे कीं, त्याच्यावर एक मोठा ग्रंथ लिहितां येईल. पार्लमेंटचे एक सभासद डब्ल्यू. एस्. येन यांनी शिशिरबाबूंचे एक छोटेखानी पुस्तक लिहिले आहें त्यांत ते म्हणतात. “Babu Shishir Kumar Moulded that new India which has given birth to those patriotic aspirations finding their mouth piece and interpreter in the Indian National Congress. ”
या देशांत प्रचंड जाहिर सभा भरवून आपली सुखद:ख सरकारास कळविण्याची पध्दति त्यांनीच सुरु केली. कलकत्याच्या इंडियन लीगच्या विद्यमानें जिल्होजिल्हीं त्यांनी संस्था स्थापन केलय. आणि जगांतील प्रत्येक देशाचा केवळ जीव असा जो मध्यम वर्ग त्याचें अस्तिव्त भासवूं दिलें. झिंकरगच्छ येथें त्यांचया अध्यक्षतेखालीं भरलेली प्रचंड जाहिर सथा म्हणजे केवळ चिरस्मरणीय होय. अमेरिकेंतील वृतपत्रानीही या सभेविषयी लिहिलें होते. लॉर्ड रिपन, लॉर्ड डफरिन यासारख्यांजवळ त्यांचें वजन असें त्यांना तेथे मान असे. ज्या वेळेस लॉर्ड रिपन यांस स्थानिक स्वराज्याचे बिल आणावयाचें होतें त्या वेळेस शिशिरबाबू त्यांचा उजवा हात असत. कलकत्यांत आल्यापासून पांच वर्षाच्या आंतच शिशिरबाबू एक प्रमुख राजकीय पुढारी समजण्यांत येऊं लागले. या सर्वांस कारण काय, तर त्यांचे स्वत:चे लोकोत्तर गुण. फक्त प्रेमळ भावांच्या मदतीशिवाय दुस-या कोणाचीही त्यांस मदत नसे.