'भूत बंगला नको. माहीमच्या बाजूस एक प्रचंड वाडा आहे. तिथं आपण सारे जमू. कामगारांची सारी पथकं तिथं न्यावी. वाडा पडला तर जवळच दुसराही आहे त्यात घुसू. त्याची गढी करू व लढू.'
'कोणता दिवस?'
'वर्षप्रतिपदेचा दिवस. त्या दिवशी शालिवाहन राजानं जय मिळवला. दंतकथा आहे की, त्या राजानं कुंभाराच्या मडक्यांचे घोडेस्वार केले व लढाई जिंकली. दंतकथेचा अर्थ इतकाच, लोकांची डोकी मडक्यासारखी झाली होती. डोक्यात ना तेजस्वी विचार, ना भावना; परंतु शालिवाहन राजानं त्यांच्यात तेज फुकलं. तसे आपण शेतकरी, कामगार आजपर्यंत धुळीत पडलो आहोत. आता उठू. झुंजार बनू. वर्षप्रतिपदेचा दिवस, त्या दिवशी क्रांतीचा झेंडा उभारू.'
सर्वांनुमते तो दिवस ठरला. गुप्त बैठकी होऊ लागल्या. कामगार संपावर गेले. वातावरण विजेने भरल्यासारखे झाले. सरकारी पलटणी व घोडेस्वार रस्त्यांतून हिंडू लागले. लोक भयभीत होऊन पाहू लागले. काही तरी भयंकर होणार, असे वाटू लागले. भित्र्या श्रीमंतांनी आपली मुलेबाळे, बायकामाणसे परगावी पाठवली; परंतु गरीब कोठे जाणार?
दिलीप त्या क्रांतीत होता. त्या झटापटीत त्याला मरण आले तर? गोळी लागली, लाठी बसली तर? फाशी गेला तर? लिलीला शेवटचे भेटावे असे त्याला वाटत होते, परंतु त्याला वेळ नव्हता. त्याने लिलीला पत्र लिहिले; परंतु पत्र कोण नेऊन देणार? त्याने बाहेर पडणे धोक्याचे होते. छबी होती ती एकदम त्याच्यासमोर आली.
'काही काम आहे?' तिने विचारले.
'लिलीला हे पत्र नेऊन द्यायचं.' तो म्हणाला.
'किती कठीण काम!' ती म्हणाली.
'तू केलं पाहिजेस.'
'करीन; परंतु पुढच्या जन्मी तरी मला प्रेम द्या. या जन्मी लिली, पुढच्या जन्मी मी. पुढच्या जन्मी मला विसरू नका, दूर लोटू नका, माझा उपहार करू नका हो.'
छबी पत्र घेऊन गेली. दिलीपकडे किती तरी तरुण येत होते, जात होते. लिलीची तो वाट पाहात होता. रात्र पडली तर लिलीचा पत्ता नाही.