आतां या सर्व कथेतील अद्भुत भाग दूर सारला तर काय उरते? असे दिसते कीं द्रौपदीची कीर्ति, व स्वयंवराचा पण कळल्यावर तो जिंकणे फक्त अर्जुनालाच साधणार आहे हे स्पष्ट होते. सर्व पांडवांना तिचा मोह पडला आहे हे कुंतीला दिसत होते. युधिष्ठिराचा व तिचा प्रथमच विचार ठरला असावा कीं अर्जुनाने पण जिंकला की पांचही पांडवांनी तिच्याशी विवाह करावा. व्यास स्वयंवरापूर्वी भेटले तेव्हांच याची चर्चा झाली व पांडवांची पूर्वपीठिका माहीत असल्याने व्यासानी मान्यता दिली. अर्जुनाने पण जिंकल्याबरोबर युधिष्ठिर, नकुल व सहदेव घाईघाईने परत आले ते आता पुढे कसे-काय करावे हे कुंतीशी ठरविण्यासाठी! कुंतीला भीम-अर्जुन द्रौपदीला घेऊन आले आहेत हे माहीतच होते. तेव्हां भिक्षा पांचांत वांटून घ्या वगैरे संवाद हा द्रौपदीला राजी करण्यासाठी होता. अर्जुनहि मुकाट्याने तयार झाला त्याअर्थी सर्व बेत आधीच ठरला होता हे उघड आहे. मोठ्या भावाचा प्रथम विवाह झाला पाहिजे ही अडचण हिडिंबेच्या वेळी आली नव्हती. हिडिंबा ही सर्वांच्या मनात भरण्यासारखी नव्हती वा भीमाची पत्नी होऊन राजवाड्यात येणार नव्हती!. पण द्रौपदीची गोष्ट वेगळी होती. ती आपल्या बेताला प्रतिकूल नाही हे दिसल्यावरच युधिष्ठिराने आपला बेत द्रुपदाला सांगितला. त्याने तो अखेर कां मानला? युधिष्ठिराचा मुख्य भर, हा आमच्या पूर्वजांचा प्राचीन आचार आहे यावर होता. कुरुकुळाच्या इतिहासात बहुपतित्वाच्या आचाराची कोणतीहि कथा महाभारतात नाही. मग युधिष्ठिराच्या विधानाच अर्थ काय व व्यासांनी काय सांगून द्रुपदाला राजी केले व द्रौपदीहि कां तयार झाली? याचे मूळ पांडवांच्या खऱ्या जन्मकथेत शोधावे लागते. पांडव हे पांडुचे पुत्र नव्हते असें महाभारतच म्हणते. पांडव मनुष्य, तेव्हा त्यांचा देवांपासून जन्म ही अद्भुत कल्पना सोडून दिली तरच या गोष्टीची संगति लागते. आपल्याला संतति होणार नाही हें नक्की कळल्यावर पांडु कुंती व माद्री उत्तर दिशेला गेलीं. कुरुवंश हे सोमवंशीय आर्य व त्याचा उगम या भागातील. भारताच्या या अति उत्तर भागामध्ये काही जमातींमध्ये बहुपतित्वाची चाल अद्यापहि प्रचलित आहे. त्या काळी ती असणारच. जेव्हा नियोगमार्ग पत्करण्याची वेळ आली तेव्हां पांडूला आपल्या मूळ पूर्वजांच्या या आचाराची आठवण आली असावी. म्हणून कुंती व नंतर माद्री यांनी कुरुकुळाशी संबंधित अशा एकाच कुटुंबातील ४ किंवा ५ भावांपासून पुत्रप्राप्ति करून घेतली असावी. युधिष्ठिर मोठा, तेव्हां त्याला या गोष्टीची थोडीफार कल्पना असेल. हा पूर्वीचा आचार स्वत: कुंतीने पाळला असल्यामुळे आपल्या पांच पुत्राना एकत्र ठेवण्यासाठी द्रौपदीसारखी एक समान पत्नी उपयुक्त ठरेल या विचाराने तिने व पांच पांडवानी हा बेत एकविचाराने घडवून आणला. पांडवजन्माची ही खरी कथा व्यासांना माहीत असल्यामुळे, एकांतात ती द्रुपदाला सांगून, युधिष्ठिर म्हणतो आहे त्याप्रमाणे हा त्याच्या खऱ्या पूर्वजांचा आचार आहे व त्याप्रमाणे त्यांना करावयाचे असेल तर करूं दे असे पटविले असावे. द्रौपदीची संमति कोणी विचारली नाही हे खरे पण विवाहानंतर सर्व आयुष्यात तिने एकदाही या अपवादात्मक विवाहाबद्दल असंतोष, राग वा नाराजी व्यक्त केली नाही. त्याअर्थी तिलाही तो मान्य होता. याचाही उलगडा सहजीं होत नाही. तिच्या (खऱ्या) आजोळच्या (कदाचित अनार्य) कुळातही असा बहुपतित्वाचा आचार अपवादाने कां होईना पाळला जात असेल तर व्यासांनी तीहि पूर्वपीठिका तिला व द्रुपदाला सांगितली असेल असा तर्क करावा लागतो. बुध्हिमती, सडेतोड व निर्भीड द्रौपदीने तिला पटले नसते तर कर्णाला झिडकारले तसा युधिष्ठिराचा विचारही झिडकारला असता व मग युधिष्ठिरालाही आपला हेका चालवतां आला नसता! तेव्हा द्रौपदीहि आनंदाने तयार झाली असे मानले पाहिजे. कुरुकुळातील कोणीहि, खुद्द दुर्योधनहि, (द्यूतोन्माद सोडल्यास), या विवाहाबद्दल कुत्सित बोलले नाहीत. यादवांनीहि गैर मानले नाही. त्याअर्थी त्याना पांडवांची खरी जन्मकथा ठाऊक असावी व हे मागील पानावरून पुढे चालू आहे तेव्हा हरकत नाही असे त्यानी मानले असावे. पांच पांडव व द्रौपदी यांच्या या अपवादात्मक विवाहाची ही माझ्यामते खरी कथा आहे. पुढील अखेरच्या भागात त्यांच्या वैवाहिक आयुष्यातील काही घटनांचा विचार करणार आहे.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.