कृष्णाने राजसूय यज्ञ करण्याची कल्पना उचलून धरली. पण पांडवांना जरासंधाच्या सम्राट पदाची माहिती सांगून त्याला हरवल्याशिवाय युधिष्ठिराला राजसूय यज्ञ करण्याचा अधिकार नाही असे दाखवून दिले. जरासंध व यादव यांच्यामधील वैराचा सर्व इतिहास सांगितला. जरासंधाच्या बाजूने असलेल्या राजांची नामावळी सांगितली. एक युधिष्ठिराचा मामा पुरुजित कुंतिभोज सोडला तर इतर सर्व राजे, त्यांत पांडूचा मित्र असलेला राजा भगदत्त, कृष्णाचा सासरा भीष्मक, शिशुपाल वगैरे सर्व, जरासंधालाच सम्राट मानतात ही वस्तुस्थिति ऎकवली. ’थोडादेखील विसावा न घेता घोर अस्त्रांनी तीनशे वर्षे लढलो तरी जरासंधाचा पराभव करणे शक्य नाही’ या कारणास्तव भोजांच्या अठरा घराण्यांनी व नंतर इतर यादव घराण्यांनीहि, मथुरा सोडून द्वारकेला नवीन शहर वसवून, बंदोबस्तात राहणे पसंत केले हा इतिहास सांगितला. जरासंध व त्याचे दोन सेनापति हंस व डिंभक यांच्या पराक्रमामुळे त्याने अनेक राजे युद्धात हरवून, त्याना तुरुंगात टाकले आहे व शंभर राजे पकडल्यावर त्यांचा यज्ञात बळि देण्याचा त्याचा विचार आहे, तेव्हा त्याला हारवल्याशिवाय वा मारल्याशिवाय तुम्ही राजसूय यज्ञ कसा करणार असा प्रष्न उपस्थित केला. वास्तविक, यादवांबरोबरच्या युद्धात हंस व डिंभक मरण पावले होते. तरीहि युद्धामध्ये जरासंधाला हरवण्याची उमेद यादवांना राहिली नव्हती. तेव्हा, द्वंद्वामध्ये गाठून जरासंधाला एखाद्या महान वीराने मारले तरच त्याचे पारिपत्य शक्य होते. यासाठी अर्थातच भीमाशिवाय दुसरा कोण समर्थ होता? वास्तविक कुरूंचे व जरासंधाचे वैर नव्हते. भीष्माशी वैर वा युद्ध जरासंधालाहि परवडले नसते! युधिष्ठिराने सरळ दूत पाठवून राजसूय यज्ञ करण्याचा प्रस्ताव जरासंधासमोर मांडला असता तर युधिष्ठिराबद्दलच्या आदरापोटी व भीष्माच्या धाकाने जरासंधाने कदाचित त्याला मान्यता दिलीहि असती. पण या पर्यायात कृष्णाला रस नव्हता! त्याला या निमित्ताने जरासंधाचा काटा काढावयाचा होता व त्याच्या कैदेत पडलेले आपले बांधव सोडवावयाचे होते! कृष्णाने हा हेतु कसा साध्य केला हे अखेरच्या भागात पाहू.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.