महाभारत म्हणते, शकुंतला पुत्रासह निघाली तेव्हा अशरीरिणी वाणी झाली कीं ’दुष्यंता, हा तुझाच पुत्र आहे तेव्हां याचा स्वीकार करणे तुझे कर्तव्य आहे.’ तेव्हा दुष्यंताने मान्य केले व पुत्र व भार्या यांचा स्वीकार केला. अशरीरिणी वाणी झाली म्हणजे माझ्या मते, उपस्थित ऋत्विज, पुरोहित, आचार्य, व अमात्य यानी दुष्यंताची कान उघाडणी केली असेल, समजूत घातली असेल, तुझ्या आश्रमभेटीना आम्हीहि साक्षीदार आहोत असे बजावले असेल. स्वीकार केल्यावर मात्र आपल्या वर्तणुकीच्या समर्थनासाठी दुष्यंत शकुंतलेला म्हणाला कीं तुझा माझा संबंध नगरात कोणाला माहीत नव्हता. पुरुषाला मोहात पाडणे हा स्त्रियांचा स्वभाव असल्यामुळे तूं तसेच केले असशील व वर आपल्या पुत्राला राज्य मिळाले पाहिजे असा आग्रह धरून बसली आहेस असेंच सार्या लोकाना वाटले असते. म्हणून मी तुझा उतावळेपणाने स्वीकार केला नाही. तुला अनावर क्रोध यावा असे मी वागलो हे खरे आहे.’ हे सर्व म्हणून झाल्यावर मग त्याने उच्चारलेले वाक्य मात्र आश्चर्यकारक आहे! तो म्हणतो ’त्यानंतर तू मला जे कटु शब्द ऐकवलेस त्याबद्दल, लाडके, मी तुला क्षमा केली आहे.’ खासा न्याय! अपराध कोणाचा व क्षमा कोणाला!
महाभारतातील या मूळ कथेमध्ये दुष्यंताच्या चित्रणाला उजाळा देण्यासाठी कालिदासाने घुसवलेला दुर्वासाचा शाप, मेनकेने दुष्यंताच्या दरबारातून शकुंतला-भरत याना थेट स्वर्गात घेऊन जाणे, दुष्यंताला माशाच्या पोटातली अंगठी पाहून स्मृति येणे, त्याची विरहावस्था, दुष्यंताने इंद्राच्या मदतीसाठी स्वर्गात जाणे, तेथे भरताला अचानक पाहणे, मग शकुंतलेची भेट व स्वीकार, यातील काहीहि नाही! तेव्हा दुष्यंताचे कालिदासकृत उदात्तीकरण बाजूला ठेवून, त्याच्या वर्तणुकीचा स्वतंत्रपणे विचार केला पाहिजे.
ज्याअर्थी, आपला पुत्र युवराज व्हावा ही शकुंतलेची मीलनापूर्वीची मागणी दुष्यंताने बेलाशक मान्य केली होती त्याअर्थी त्याला पत्नी असली/असल्या तरी पुत्रलाभ झालेला नसावा असे मानण्यास हरकत नाही. (भीष्मपिता शंतनु याला सत्यवतीची अशीच मागणी मान्य करता आली नाही.) भरताच्या जन्माआधी काही काळ दुष्यंताचे शकुंतलेला भेटणे बंद झाले असावे. त्यामुळे भरताच्या जन्माची त्याला कदाचित माहिती नसेल. त्याच्या प्रथम आश्रमभेटीला अनेक साक्षीदार होते. नंतरच्या भेटीहि गुप्त थोड्याच राहिल्या असणार? पण शकुंतला भरताला घेऊन दरबारात उपस्थित झाल्यावर, खुद्द दुष्यंत मान्य करीत नाही तोवर अमात्य वा पुरोहित स्वत:हून काय करणार? शकुंतलेने निकराच्या गोष्टी बोलल्यावर अखेर त्यानीच राजाला सत्य परिस्थितीची जाणीव करून दिली असणार व अन्यायापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला असेल. दरबारातील मंडळींचे मत अनुकूल आहे असे दिसल्यावर मग दुष्यंतालाही शकुंतलेचा स्वीकार करण्याचा धीर आला! या सर्व प्रसंगवर्णनात, इतर राजस्त्रिया वा राजकुमारांचा उल्लेख कोठेहि नाही. दुष्यंतामागून भरताला निर्विघ्नपणे राज्य मिळाले, त्याअर्थी दरबारी राजकारणाचा वा वारसांचा प्रश्न नव्हता, तरीहि सुरवातीला दुष्यंताने शकुंतलेचा स्वीकार न करता उलट असभ्यपणे तिचा अपमान केला तो कां याचा खरेतर पुरेसा उलगडा होत नाही. दरबारी लोक वा जनमत यांचा कौल होईपर्यंत सत्य स्वीकारण्याचा त्याला धीर झाला नाही हे खरे.
या महाभारतातील मूळ कथेमध्ये शकुंतलेचे चित्रण अतिशय ठसठशीत व मनोज्ञ आहे. तिने पति व पिता यांची कर्तव्ये, पितृत्वाचे अवीट सुख व सत्याची असाधारण महति याचे केलेले वर्णन सुंदर आहे. स्वमनाची साक्ष असत्य भाषण करणाराला धुडकावून लावणे अशक्य असते हे प्रतिपादन अप्रतिम आहे. दुष्यंताचा दोष सौम्य करण्यासाठी कालिदासाने त्याला व शकुंतलेला दुर्दैवाची शिकार बनवले आहे यात तिच्यावर अन्यायच केला आहे असे मला वाटते.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.