या सर्व घटनांचा सुसंगत व तर्कशुद्ध कालानुक्रम माझ्या मते असा आहे. १ शिष्टाई संपल्यावर कृष्ण कुंतीला भेटून लगेच परत गेला. २ पांडवांकडे सर्व युद्धबेत ठरून सैन्यासह ते पुष्य नक्षत्रावर वा आधी कुरुक्षेत्रावर गेले. ३ कौरव सैन्यहि दुर्योधनाच्या आदेशाप्रमाणे पुष्य नक्षत्रावर कुरुक्षेत्री गेले त्यापूर्वीच कुंतीने कर्णाची गुप्तपणे गाठ घेऊन त्याचे मन वळवण्याचा असफल प्रयत्न केला. कदाचित तिने कृष्णाला गुपित सांगून कर्णाचे मन वळवण्याची त्याला सूचना केलीहि असेल पण कृष्णाने मात्र लगेचच तसे केले नव्हते. ‘तूंच त्याला भेट, तेच जास्त उचित’ असेच त्याने कुंतीला म्हटले असावे. मात्र कर्ण कौरव शिबिरात उपस्थित झालेला असल्यामुळे कुंतीचा प्रयत्न असफल झाल्याचे उघड झाले. ४ त्यामुळे कृष्णाने अखेरच्या क्षणी (मघा वा पूर्वा नक्षत्रदिनी, शिष्टाईच्या दिवशीं नव्हे,) युद्ध टाळण्याचा निर्वाणीचा प्रयत्न म्हणून कर्णाची गुप्त भेट घेतली. मी कुंतीपुत्र आहे हे मला माहीत आहे’ असे या भेटीत कर्ण कृष्णाला म्हणाला असा स्पष्ट उल्लेख आहे. कुंती भेटली तेव्हां मात्र तो असे काही म्हणाला नव्हता!. कुंती त्याला कृष्णाचे आधीच भेटली असेल तर कर्णाने कृष्णापाशी केलेले ते विधान सुसंगत आहे. मात्र दुर्योधनाची बाजू सोडण्याचे कर्णाने मानले नाहीच. उलट,‘तुझी-माझी भेट व माझे जन्मरहस्य गुप्तच राहूदे’ असे त्याने कृष्णाला विनविले. ५ तेव्हा, हाही प्रयत्न विफल झाल्यावर मात्र, कृष्णाने त्याला ‘तर मग आठ दिवसानी अमावास्येला युद्ध सुरू करूं’असे म्हटले व त्याप्रमाणे ते झाले ६ त्यानंतर मात्र कुंती, कर्ण व कृष्ण यानी कुंतीचे गुपित अखेरपर्यंत सांभाळले. कौरवांना ते कधीच कळले नाही. कृष्णाने ‘हे मला माहीत होते’ असे कोणाही पांडवापाशी वा इतर कोणाशीं कधीहि म्हटले नाही व अखेर कुंतीलाच ते युधिष्ठिरापाशी उघड करावे लागले. त्यावेळीहि कृष्णाने ‘हे मला माहीत होते’ असे युधिष्ठिराला म्हटले नाही! नाहीतर युधिष्ठिराने कुंतीप्रमाणेच त्यालाही दोष दिला असता. या घटनाक्रमामध्ये कोणतीहि अनैसर्गिक वा अतार्किक गोष्ट नाही. या संदर्भातील उल्लेख केलेल्या विसंगति महाभारतात कालांतराने भर पडताना अनवधानाने आल्या असाव्या असे वाटते.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.