त्याला कोणी डिग्री देणार नव्हते याची त्याला पर्वा नव्हती पण आपले काम कोणातरी विद्वानाने पहावे, चर्चा करता यावी यासाठी तो आसुसला होता. भारतात हे कसे जमावे हे कळत नव्हते. पोटाचा प्रष्न होताच. प्रथेप्रमाणे बालवयातच लग्न झालेले होते. पत्नी खूप लहान व अजून माहेरीच होती. मित्रांच्या मध्यस्थीने त्याचे काही संशोधन ‘भारतीय गणित संस्थे’च्या प्रकाशनात छापले गेले होते एवढेच! रामचंद्रराव नावाच्या एका मित्राने एक वर्ष त्याचा खर्च चालवला.
अखेर त्याची लायकी ओळखणाऱ्या कही वजनदार मित्रांच्या मध्यस्थीने त्याला मद्रास पोर्ट ट्रस्ट मध्ये कनिष्ठ कारकुनाची नोकरी लागली व पोटाचा प्रष्ण काहीसा सुटला. मोकळा वेळहि मिळू लागला कारण त्याने झटून काम करावे अशी कचेरीतहि कोणाची अपेक्षा नव्हतीच! नोकरी मिळाल्यावर पत्नी घरी आली व संसार कसाबसा सुरू झाला. सासूसुनेचे पटत नव्हते व सासू सुनेचा, प्रथेप्रमाणे, छळ करत होती. शिक्षण अर्धवट राहिल्यामुळे कार च्या जुन्या झालेल्या पुस्तकाच्या नंतरच्या गणित विषयातील नवीन घडामोडी त्याला अज्ञात होत्या. मात्र त्याची प्रतिभा स्वयंभू होती व इतरांनी शोधलेली कित्येक प्रमेये त्याला स्वतंत्रपणे सुचली होती व त्याच्या वहीत सिद्धतेशिवाय लिहिलेली होती. पण एक प्रकारे त्याची प्रगति खुंटली होती व पुढचा मार्ग दिसत नव्हता.