३७

महात्माजी देशातील दरिद्रीनारायणाला पोटभर अन्न कसे देता येईल, या चिंतेत असत. या देशात कोट्यावधी लोक. त्यांना घरीच कोणता धंदा देऊ, कोणते काम देऊ? विचार करता करता त्यांना चरखा भगवानाचे दर्शन झाले. त्यांचे पुतणे श्री. मगनलाल यांनी सर्वत्र हिंडून गांधीजींना चरखा आणून दिला. देशात पुन्हा चरख्याचे गूं गूं सर्वत्र सुरू झाल्याशिवाय तरणोपाय नाही अशी त्यांची खात्री झाली. लोकांना या क्षणी दोन घास मिळू देत. या क्षणी आणा-दोन आणे मिळू देत. पावसाचे थेंब पडताच जमीन हिरवीगार दिसते, त्याप्रमाणे चरखा थोडे थोडे देत गेला तरी संसारात थोडा राम येईल, असे त्यांना वाटले आणि चरखा, खादी यांचा प्रचार सुरू झाला. ओरिसात इतकी गरिबी, की खरोखरच चरख्यावर गरिबांना दोन आणे जेव्हा मिळू लागले, तेव्हा त्यांचे डोळे कृतज्ञतेने भरून आले. चरख्याने राष्ट्रात कोठे किती आशा उत्पन्न केली, ते आपणांस कळणार नाही. चरख्याचे इतर उपयोग आहेतच. आपण काततो म्हणजे श्रमाची प्रतिष्ठा करतो. आपण श्रमणा-या जनतेशी जोडले जातो. मनातही निर्मलता येते. एकाग्रता होते. एक शांत आनंद वाटतो.

कर्नाटकात गांधी सेवासंघाचे हुदली गावी अधिवेशन होते. त्या ठिकाणी महात्माजी म्हणाले : माझ्या देवाचं नाव मी चरखा ठेवलं आहे.’ थोर उद्गार, थोर श्रद्धा. देवाची अनंत नावे आहेत. चरखा अन्न देतो. आधार देतो. चरखा स्वाभिमान शिकवतो. म्हणून चरखा देव. आधार देणारी जणू देवता. आणि महात्माजी या देवाचे महान उपासक.

एकदा बोलता बोलता गांधीजी म्हणाले, ‘या चरख्याच्या आसक्तीत मी गुंतून तर नाही ना जाणार? मरताना ओठांवर रामनाम येण्याऐवजी चरखा....चरखा असं तर नाही ना येणार?’ जवळ जमनालालजी होते. ते म्हणाले, ‘बापू, चिंता करू नका. चरख्याची काळजी नका करू, त्याला जनता मरू देणार नाही.’

महात्माजींना स्मरून आपण रोज थोडे कातले तर किती छान होईल? पू. विनोबाजी म्हणाले, ‘महात्माजींची मूर्ती खादीत आहे.’ खरं आहे, नाही?’

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel