महात्माजींनी बोरसद, खेडा या जिल्ह्यांतून सत्याग्रह केले. परंतु व्हाइसरायला त्यांनीं आधी पत्र पाठविलें होतें ते त्यांत म्हणाले, ''मी साम्राज्याची सेवा केली आहे. मी युध्दांत लोकांनी भाग घ्यावा म्हणूनहि प्रचार केला. राजनिष्ठा दाखविली. आज कायदे मोडून राजनिष्ठा दाखवीत आहें. कायदे पाळून राजनिष्ठा प्रकट होते. कधीं कधीं कायदे मोडून राजनिष्ठा प्रकट होते. ब्रिटिश कितीहि अन्यायी असले तरी सत्याग्रहीसमोर ते नमतात, ही गोष्ट लोकांना कळली तर ती चांगली ! सत्याग्रह करून मी ब्रिटिश साम्राज्याची सेवाच करीत आहें'' असे महात्माजी म्हणत. सत्याग्रही लहान सेवा करो; वा मोठी करो; ती सेवा एक प्रकारें समाजाची, राष्ट्राची, जगाची असते. कारण ती सर्वांच्या हिताशीं अविरोधी असते. कायदे मोडूनहि मी साम्राज्यसेवाच करीत आहें असें महात्माजी म्हणत, याचा अर्थ काय, भावार्थ काय? मी राजनिष्ठा दाखवीन असें ते म्हणत, यांतील अर्थ असा कीं, जोंपर्यंत सेवेचें, कर्तव्याचें, पालन मला कायदे पाळूनहि करतां येत असेल तोंवर मी राजनिष्ठ राहीन. लोकांनाहि राहायला सांगेन. परंतु कर्तव्यकर्में पार पाडतां येत नसतील  तर मी एकटाच नाहीं, तर जनतेलाहि जागृत करून मी कायदे मोडीन. कायदे मोडा नि कर्तव्यें पार पाडतां येतील अशी परिस्थिति निर्मा असें मी सांगेन. लोकांची सुप्त शक्ति जागृत करीन. कर्तव्यांच्या आड येणार्‍या राजसत्तेविरुध्द अप्रीति उत्पन्न करणें हा तर मी माझा धर्म मानतों. आणि हा माझा वा सर्वांचा सत्याग्रह कशासाठीं? सत्ताधारि लोकांनाहि सत्य पटवण्यासाठीं. सत्तावाल्यांची सुप्त न्यायबुध्दि, सुप्त मानवता जागृत करण्यासाठीं, त्यांना माणसें बनवण्यासाठीं. सत्याग्रही व्यक्तिहिंसेचा मार्ग न पत्करतां आत्मक्लेशाचा मार्ग पत्करील. महात्माजी म्हणत, ब्रिटिशांना उद्देशून म्हणत, ''माझा हा सत्याग्रह माझा हा असहकार तुमच्याहि हिताचा आहे. माझ्या हितासाठी जसा तो आहे, तसाच तुमच्याहि. मी अन्याय सहन करीन मुकाटयानें, तर माझाहि अधःपात, आणि तुम्हांला करूं देईन, तुमची मनोभावना, सद्भावना जागृत न करीन तर तुमचाहि अधःपात. अन्याय करणारा नि मुकाटयानें अन्याय सहन करणारा, दोघे अधःपतित होत असतात. सत्याग्रह दोघांना उन्नत करतो. पुन्हा आत्मक्लेशाच्या मार्गानें म्हणून यांत सर्वभूतहितबुध्दि आहे. मला जी सत्यसंवेदना होते, ती मी पुन्हां पुन्हां संशोधून पाहीन. चले जावच्या वेळेस महात्माजी अनेकदां म्हणाले,'' मी ब्रिटिशांना सत्ताधारी म्हणून येथून जा असें म्हणतों. तसें म्हणतांना माझ्या मनांत द्वेष नसतो. त्यांनी मित्र म्हणून येथें रहावें. माझ्या अंतःकरणांत मी पुनःपुन्हा शोधून पाहतों की, कोठें द्वेष लपलेला नाहीं ना? जर ब्रिटिश हिंदुस्थानवरची सत्ता सोडतील तर त्याचा नैतिक परिणाम जगावर होईल. त्यांना हें करायला लावणें माझें काम आहे.'' महात्माजी अशा रीतीनें सत्याग्रहांत इतरांच्याहि उध्दाराचा विचार करीत. ते त्या वेळेस पुनः पुन्हां म्हणत कीं, ''माझें मन मोकळें आहे. मला येऊन पटवा.'' सत्याग्रही हा मताग्रही नसतो. आपल्या त्या त्या क्षणींच्या विचाराचा तो आत्यन्तिक प्रचारक असतो. परंतु तसे करीत असतांहि त्याचें आत्मचिंतन सुरू असतें. आपलें कुठें चुकत तर नाही ना, खोटया कल्पना उराशी नाहीं ना धरलेल्या, हें तो पडताळून पहात असतो. ज्या क्षणीं चूक कळली, त्या क्षणीं मग ती हिमालयासारखी का असेना, तो ती सोडतो, दुरुस्त करतो, कबूल करतो. सत्याचा तो उपासक, मताचा नाहीं. सत्यसंशोधन तो कधींहि सोडीत नाही. एखादी गोष्ट इतरांना मान्य असली आणि सत्याग्रहीला नसली तर तो एकटाहि त्या मार्गाचा त्याग करील.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel