५१.
वाटेवरल शेत आल्यागेल्यान मोडल
सावळ्या बंधुजीन भाग्यवंतान पेरलं
५२.
बांधच्या कडेला भिकार्याची दाटी
सावळा कंथ माझा सुपान धान्य वाटी
५३.
वाटेवरली लक्षुमी आली शेताच्या काठोकाठी
धान्य भरायाला कणगींत होई दाटी.
५४.
वाटेवरली लक्ष्मी आली दडत लपत
धान्याची ग रास पडली सोप्यात.
५५.
शेताची राखण कंथ उभा माळयावरी
धान्य पडे खळयावरी.
५६.
बारा बैलाचा नांगुर शेत काजळाची वडी
घरधनी ग राबती संग घरच बारा गडी.
५७.
शेताच्या बांधावरी कोन हिरव्या बनातीचा
धनी चावर्या जिमीनीचा.
५८.
वाटेवरली इहीर , पानी लागल वरवंट्याला
लई जिमीन मराठयाला
५९.
वाटेवरल शेत आल्यागेल्यानं पेंड्या
बंधुजीला माझ्या शाळू झाल्याती तीन खंड्या.
६०.
वाटेवरल शेत गडी मानक राबतात
नाव थोराच सांगतात
६१.
खळामंदी उभा हातामंदी पाटी
बाळराज माझा आल्या गेल्या धान्य वाटी.
६२.
पाभरबाईला चाडदोर रेशमाचा
पाठचा बंधुजी पेरनार नवशाचा.
६३.
वाटवरल शेत आल्यागेल्याला सोलाना
बंधु भिडेचा, बोलना.
६४.
वाटेवरचा मळा नार मागती पुंडा ऊस
बंधुजी माझा पान्यावानी पाजी रस.
६५.
वाटेवरला मळा आल्यागेल्या ऊसरस
धनी मळ्याचा राजस
६६.
वाटेवरला मळा नार झटते ताटाला
बंधु आलाया हटाला माळा घालीतो वाटंला
६७.
वाटेवरला मळा कुना हौशान केला
रंग माचानाला दिला.
६८.
माळ्याच्या मळ्यामंदी केली उसाची लावण
वडील मामाजीनी भरली गाईनी दावण
६९.
माळ्याच्य मळ्यामंदी केळी पेरुला काय तोटा
माझ्या मामाजीच्य़ा, एका इहिरीला बारा मोटा.
७०.
माळ्याच्या मळ्यामंदी चाक वाजत कुईर्याच
गुजर बंधुजीच नंदी गेल्यात पहिर्याच.
७१.
माळ्याच्या मळामंदी भाजी तोडीन पानपान
माझ्या मामाजीन पेरलि चारी वान.
७२.
माळ्याच्या मळ्यामंदी मोटेला नवा नाडा
पानी जात फुलझाडा.
७३.
माळ्याच्या मळ्यामंदी पेरीते खसखस
चुडीया राजसाची एकादस
७४.
मळ्याच्या मळ्यामंदी माळीणी जावाजावा
फुलांचा बाग लावा.
७५.
पाटान जात पानी उसासंगट गाजराला
मळी शोभते गुजराला