१
पान्यापावसान टाकली लांब दोरी
नक्षत्र गेली चारी
२
पड पड तू पावसा, माळामुरडाच्या झाल्या वाती
कुनवी आल्याती काकुळती
३
पड पड तू पावसा, पिकूंदे मूगराळा
बंधू माझा लेकुरवाळा
४.
पड पड पवसा, नको बंघू तालामाला
माझा कुनबी अट्टाल्याचा भ्याला
५.
पड पड पावसा काय पडूस वाटना ?
पाप धरतीला साठवेना
६.
पड पड पावसा सारी करावी ओली माती
जीव येतो काकुळती.
७.
पड पड पावसा नको बघू तालमाला
व्हईल दुबळ्या भाजीपाला
८
मिरगाच्या महिन्यात काय आभाळ उठयेल
कुना कुणब्याच बाळ पेराया नटयेल.
९
पावसाची वाट पहात्याल भलंभलं
देव मेघाजीन सुर्यासमोर डेर दिलं.
१०
पड पड पाऊसा कोकन धरतील
पानी येतय खडूळ कृष्णाबाई गरतीला
११.
मेघरायाच लगीन ढगांच वाजे डफ
ईजबाई नवरी आली झपझप
१२
मेघरायाच लगीन ढगाच्या मांडवात
नवरी ईजबाई आली चकाकत
१३
मेघरायाच लगीन ईजबाई करवली
भाऊच्या शेतावर त्यांची वरात मिरवली.
१४
पडूंदे पाऊस पिकूंदे माझा मका
बहिणा करीन तुझ्या डोरल्याला टिक्का.
१५
पडुंदे पाऊस पिकूंदे माझा ऊस
बहिणा करीन तुझ्या डोरल्याच घोस