५१
निर्माळ माझं मन, गंगेच्या पान्यावानी
माझ्या माऊलीचा, कुसवा राजध्यानी
५२
नऊ महिन्याचं वझं, बया वागविलं माझं
काशी गंधारी नाव तुझं
५३
माझा अंगलोट; जाईच्या फोकावानी
बया माऊलीनं, जोपा केलाया ल्येकावानी
५४
बया म्हनु बया, अशा नांवाच्या बया किती ?
एक जल्म दिल्याली भागीरथी
५५
बया म्हनु बया, बया कुनीच व्हईना
माऊलीची सर, शेजीबाईला येईना
५६
बया म्हनु बया, बया साखरेची पुडी
तिच्या ध्याईमंदी माझी जलमली कुडी
५७
बया म्हनु बया, मला बयाचं लई सुख
बया सपनी दाव मुख
५८
बया म्हनु बया, बया इक्तं गोड काई
साखरबाईला कडूपनाचा लेश न्हाई
५९
नऊ महिने हुते, अंधार बारीला
माझ्यापायी कष्ट पडलं नारीला
६०
नऊ महिन्याचं वझं, बया वागवीलं मला
आज शेजारीन झाले तुला
६१
अंगनांत उभ्या चुलत्या माझ्या सया
त्यात दुसरी माझी बया
६२
दंडीच्या तोळबंद्या न्हाई म्या घरी केल्या
माझ्या बयानं मला दिल्या
६३
सात सर्जाची नथ मोराची चिलीपिली
माझ्या बयानं मला दिली
६४
भावाबहिनीचं भांडन, मेळा मिळनां पाखराचा
माझी मायबाई पुडा सोडावा साखरेचा
६५
वाटंवरला वड पारंब्या वाववाव
माझ्या माऊलीचा विस्तार गांवगांव
६६
अग्नीच्या पुढं जळतं ओलंचिलं
बयावाचुनी कुनी म्हनंना काम केलं
६७
भुकेलं तान्हेलं मला कोन ग म्हनलं ?
माय एक माझी तोंड कोमेलं जानील
६८
वढ्याखुड्याच्या पान्यानं न्हाई भागली तहान
माझी तू मायबाई गंगासमान !
६९
वढ्याखुड्याच्या पान्यानं, न्हाई भागली तहान
बयाबाईला माझ्या बघुन समाधान
७०
बया म्हनु बया, तोंडा सुटलं पाझर
बया मधाची घागर
७१
बया म्हनु बया, पडे तोंडाला मिठी
बया खडीसाखर पिठी
७२
सुख सांगताना, दुःखाची हुते सई
बया नगं, अवघड मानु लई
७३
अंतरीचं गुजु ह्रदय केलं पेवं
बया म्हनते, खोलून मला दाव
७४
अंतरीची गोष्ट ह्रदया झाली जाळी
येवं बया, गुजाला येरवाळी
७५
बयावाचुनी, कुना येतुया मायाजाळु ?
चैताचं ऊन तापली ओढ्याची वाळु